मनमाड – मालेगाव मार्गावर मोटारसायकलने बसला धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या अपघातामध्ये मोटार सायकलमधून झालेल्या इंधन गळतीमुळे स्फोट झाला आणि या स्फोटात बसनेही पेट घेतला. आगीत बसही जळून खाक झाली असून  जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मनमाड – मालेगाव राज्यमार्गावर कुंदलगावमध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोटारसायकलने समोरुन येणा-या बसला धडक दिली. धडक दिल्यावर मोटारसायकलच्या इंधनाची टाकी फुटली आणि अचानक स्फोट झाला. या स्फोटात बसनेही पेट घेतला. मात्र बसचालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवत बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर पडण्याची सूचना केली. प्रवाशांनीही तातडीने बसबाहेर उडी मारल्याने पुढील अनर्थ टळला. भर रस्त्यात बस पेटल्याने राज्यमहामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल तीन तास ठप्प होती.

दरम्यान, या अपघातात मोटारसायकल चालक राहुल बर्डे आणि नितीन निकम (दोघेही रा. वाहेगाव ता. निफाड) यांचा जागीच मृत्यू झाला. पेटलेल्या बसमधून बाहेर उडी मारताना दहा प्रवासी जखमी झाले. जखमींवर मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मनमाड पालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली. पेट घेतलेली खासगी बस ही नंदूरबारवरुन पुण्याला जात होती. बसमध्ये एकूण ३२ प्रवासी होते. तर मोटरसायकलवरील दोघेही मालेगावकडे जात होते.