महिलांच्या विक्रमी उपस्थितीने रविवारचा सकल मराठा कुणबी मुकमोर्चा चांगलाच यशस्वी ठरला. व्यासपीठावरून ‘मूक आहोत, मूकच राहू द्या, मुकाटय़ाने मागण्या मान्य करा’ असा आवेश व्यक्त करीत जिजाऊ वंदना झाल्यानंतर मोर्चास प्रारंभ झाला. सुमारे दोन किलोमीटरच्या लांबीच्या या मोर्चाची सांगता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केल्यानंतर झाली.

तब्बल दोन तास उशिरा येथील मोर्चास प्रारंभ झाला. दुपारी १२ वाजता आयोजित या मोर्चाच्या तासाभरापूर्वी आरटीओ पटांगण रिते पाहून आयोजकांमध्ये अस्वस्थता पसरली होती, परंतु अखेर शहरातील विविध भागातून महिलांची गर्दी सभास्थळी उसळू लागल्यानंतर पटांगणाच्या गर्दीला आकार आला. त्यात बाहेरगावाच्या तीन किलोमीटरवर रोखून धरलेल्या गाडय़ा पोलिसांना विनंती केल्यानंतर सोडण्यात आल्याने गर्दी वाढत गेली. व्यासपीठावरील युवतींची आवेशपूर्ण भाषणे सुरू झाली. आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून प्रामुख्याने प्रमुख तीन मागण्यांसह शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आले. शेती करणाऱ्या समाजाची शेती प्रकल्प, रस्ते धरणांमध्ये गेली, परंतु पुढे उत्तर मिळाले नाही. धरणातील पाणीही मिळेनासे झाले. संकटे आली. शेतकरी आत्महत्यांकडे वळू लागला. समाजाचा पोशिंदा असलेल्या या शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करावा, असा सूर उमटला. राष्ट्रीय प्रसिध्दी माध्यमे दुर्लक्ष करीत असणाऱ्या या मोर्चाची ताकदच समाजाचा मूक हुंकार आहे, त्याची दखल व्यवस्थेला घ्यावीच लागेल, असेही बोल उमटले.

आरटीओ पटांगणापासून ते पुढे आर्वी नाका, बजाज पुतळा, सामान्य रुग्णालय आणि शेवटी आंबेडकर पुतळा, असा मोर्चाचा प्रवास झाला. वाटेत या मोर्चेकऱ्यांना व्यापारी बांधवांनी थंड पाणी देऊन साथ केली. मोर्चापूर्वी शहरातील रस्त्यांवरील शुकशुकाट पाहून, यापूर्वी इंदिरा गांधींच्या मृत्यूच्या वेळीच असा शुकशुकाट पाहायला मिळाल्याची दुकानदारांची प्रतिक्रिया होती. मोर्चेकऱ्यांनी विविध मागण्यांसह डॉ.दाभोळकर, डॉ.कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना त्वरित शासन करण्याचे फ लक उंचावले होते. ते लक्षवेधी ठरले. मोर्चाचे ठळक वैशिष्टय़ म्हणजे, महिलांची विक्रमी उपस्थिती ठरली. युवतींपेक्षाही महिलांचा सहभाग आयोजकांना उत्साह द्विगुणित करणारा ठरला. वृध्द महिलांनी स्वयंसेवकांच्या मदतीने वाटचाल केली. शेवटी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना युवतींनी मागण्यांचे निवेदन दिले. या दरम्यान उर्वरित युवतींनी प्रहार करणाऱ्या भाषणांनी गर्दी रोखून धरली. संपूर्ण मोर्चादरम्यान पोलिसांचा बंदोबस्त होता. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पूर्ण वेळ देखरेख ठेवली. येथील आजवरचा हा सर्वात मोठा मोर्चा ठरण्याची शक्यता ज्येष्ठ पोलिसांनी व्यक्त केली.