नवजात बालकांच्या मृत्यूनंतर खडबडून जाग आलेल्या आरोग्य विभागाने संदर्भ सेवा रुग्णालयात नवजात अतिदक्षता कक्ष (एनआयसीयू) आणि जिल्हा रुग्णालयातील विशेष नवजात बालक उपचार कक्षात अतिरिक्त खाटा वाढविण्याचे निश्चित केले आहे. हे स्वागतार्ह जरी असले तरी  संपूर्ण जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ६८ पदे रिक्त आहेत. याचीही शासनाच्या आरोग्य खात्याने गांभीर्याने विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नाशिक येथील अर्भक मृत्यू व राज्यातील उपजत मृत्यूंची कारणमीमांसा करण्यासाठी नियुक्त तज्ज्ञांच्या समितीच्या बैठकीत नाशिकच्या विशेष नवजात उपचार कक्षाचे (एसएनसीयू) श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक एसएनसीयूमध्ये सध्या २० खाटा असून अतिरिक्त २८ खाटांची भर पडणार आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात अतिदक्षता केंद्र (एनआयसीयू) प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचे ठरवण्यात आले. जंतुसंसर्ग कमी करण्यावर भर देण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. नवजात बालकांच्या मृत्यूनंतर बैठका व निर्णयांचे सत्र लावले असले तरी आरोग्य विभागासमोर सध्या मनुष्यबळाचा गंभीर प्रश्न उभा आहे. बाल मृत्यूच्या घटनाक्रमाने जे कर्मचारी आहेत, तेदेखील धास्तावलेले आहेत. नाशिक जिल्ह्याचा विचार करता महत्त्वाची जवळपास निम्मी पदे रिक्त आहेत.

सोयीसुविधांचा अभाव असणाऱ्या ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णालयात डॉक्टरांची अधिक्याने गरज भासते. डॉक्टरच नसतील तर रुग्णांवर उपचार तरी कसे होणार, असा प्रश्न आहे. परिचारिकांसह अन्य पदांची वेगळी स्थिती नाही.

नवजात बालक उपचार केंद्रात बालकांच्या तुलनेत परिचारिकांचे प्रमाण अल्प आहे. आरोग्य विभाग सध्या युद्धपातळीवर उपाय योजण्याची धडपड करीत आहे. त्या अंतर्गत अतिरिक्त खाटा वा नवजात अतिदक्षता केंद्राची उभारणी करण्यात येईल. व्यवस्था विस्तारीत करताना मनुष्यबळाची कमरता दुर्लक्षित राहिल्याचे चित्र आहे.

केवळ ८४ अधिकारी, कर्मचारी सेवेत

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ वर्ग एकची २४७ पैकी १६५ पदे भरलेली नाहीत. म्हणजेच केवळ ८४ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आरोग्य यंत्रणा सुरू आहे. त्यात नाशिकमध्ये ६८ पैकी ३८ पदे रिक्त आहेत. वर्ग दोनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची वेगळी स्थिती नाही. मंजूर १९३ पदांपैकी ३० पदे रिक्त आहेत. मालेगावचे सामान्य रुग्णालय, लासलगाव, नगरसूल, नामपूर, उमराणे व येवला ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी दोन पदे रिक्त आहेत.जिल्हा रुग्णालयात तीन विशेष डॉक्टरांची वानवा आहे. त्यात शल्यचिकित्सक, अस्थीरोगतज्ज्ञ, त्वचा व गुप्तरोग तज्ज्ञ यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालयात जवळपास ६८ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.