तीन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मनसेचा शहर सरचिटणीस सत्यम खडांगळेला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याची पाच दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली. या प्रकरणात एका वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यालाही अटक होण्याची शक्यता आहे. जागेच्या प्रकरणात संशयित वकिलाने ३० लाखांची मागणी केली होती. या वसुलीची जबाबदारी खडांगळेवर सोपविल्याचे समोर आले. राजकीय वर्तुळात गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या अनेक व्यक्ती कार्यरत आहेत. राजकीय वरदहस्ताने काही वर्षांपूर्वी शहरात गुन्हेगारी फोफावल्याचे समोर आले होते. मनसे पदाधिकाऱ्याच्या कार्यशैलीने राजकीय झूल पांघरत चाललेल्या गुन्हेगारीवर नव्याने प्रकाश पडला आहे. खडांगळेवर याआधी हाणामारीसह अनेक गुन्हे दाखल आहेत.

या संदर्भात संतोष तुपसाखरे यांनी तक्रार दिल्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तुपसाखरे यांची घोटी व पाडळी येथे वडिलोपार्जित एकूण १८ एकर जमीन आहे. त्यांचे वडिलोपार्जित जमिनीबाबत वाद असल्याने तक्रारदाराच्या वडिलांनी अनंत तुपसाखरे यांच्याविरुद्ध १९९२ मध्ये दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्यात तक्रारदाराच्या वडिलांनी वकीलपत्र राजेंद्र खंदारे यांना दिले होते. या दिवाणी दाव्याचा निकाल १९९६ मध्ये तक्रारदार याच्या बाजूने लागला. तेव्हा वडिलांनी ठरल्यानुसार राजेंद्र खंदारे यांना सर्व शुल्क दिले होते. या निकालानंतर अनंत तुपसाखरे यांनी उच्च न्यायालयात अपील केले. तेव्हा वडिलांनी राजेंद्र खंदारे यांना वकीलपत्र दिले नव्हते.

२००० मध्ये संबंधित अपील नाशिक न्यायालयाकडे वर्ग झाले. तेव्हा परत वडिलांनी हा दावा चालविण्यासाठी खंदारे यांना वकीलपत्र दिले. २००४ मध्ये हा दावा निकाली निघाला. तेव्हा वडिलांनी निश्चित झाल्यानुसार अ‍ॅड. खंदारे यांना शुल्क दिले. त्यानंतर तक्रारदार आणि त्यांचे नातेवाईकांनी लोक अदालतीत सर्व वाद मिटवून एक कोटी १० लाख रुपयांत समझोता झाला. राजेंद्र खंदारे यांचे वकीलपत्र काढून घेतल्याने आणि तक्रारदाराला दाव्यापोटी मोठी रक्कम मिळाल्याने खंदारे यांनी वेळोवेळी तक्रारदाराकडे ३० लाख रुपयांची मागणी करत खोटय़ा गुन्ह्य़ात अडकविण्याची दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

संशयित वकिलाने ही रक्कम वसूल करण्याची जबाबदारी मनसेचा पदाधिकारी सत्यम खडांगळेवर सोपविली. १३ सप्टेंबर २०१७ रोजी दुपारी तक्रारदाराच्या भ्रमणध्वनीवर खडांगळेने संपर्क साधून दमदाटी केली. खंदारे वकिलांनी सांगितल्यानुसार तीन लाखांची रक्कम लगेच आपल्या कार्यालयात आणून जमा कर अन्यथा हातपाय तोडण्याची धमकी दिली.

यामुळे भयभीत झालेल्या तक्रारादाराने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी संशयितांविरुद्ध कारवाईचे निर्देश दिले. पोलिसांनी संशयित खडांगळेला अटक करत दुसरा संशयित अ‍ॅड. खंदारेला ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलिसांनी ही कारवाई केली. मनसेच्या पदाधिकाऱ्याला खंडणीच्या गुन्ह्य़ात अटक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गुन्हेगारांना राजाश्रय मिळत असल्याने गुन्हेगारी वाढल्याचे शहरवासीयांनी याआधी अनुभवले आहे. गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या व्यक्तींना उमेदवारी देण्यासही अनेक पक्ष मागे-पुढे पाहात नाही.

संशयित खडांगळेने मनसेतर्फे महापालिकेची निवडणूक लढविली होती. त्यात तो पराभूत झाला. अशोक स्तंभ परिसरातील ‘नाशिकचा राजा’ गणेश मंडळाचा तो संस्थापक आहे. यापूर्वी त्याच्यावर मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.