पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी आरक्षणाबाबत नाशिकमध्ये केलेल्या विधानामुळे वादाचा धुरळा उडाला आहे. आरक्षणामुळे ब्राम्हण समाजातील मुलांना परदेशी जाण्याची वेळ येते, असे विधान त्यांनी केल्याचे सांगण्यात येते. मात्र त्याबाबत खुद्द आयोजकांनी कानावर हात ठेवले असून, असे कोणतेही वक्तव्य त्यांनी केले नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे टिळक यांच्या विधानाचा सामाजिक समता अभियानाने निषेध केला आहे.

येथील चित्पावन ब्राह्मण संघाच्यावतीने आयोजित परशुराम वेद पुरस्कार वितरण सोहळा पुण्याच्या महापौर टिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यांनी कथितरीत्या ‘आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी परदेशात जावे लागते,’ असे नमूद करत शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी-व्यवसाय-उद्योगासाठी देशात पूरक वातावरण असणे गरजेचे असल्याकडे लक्ष वेधले होते.

टिळक यांच्या या विधानाचे स्थानिक पातळीवर पडसाद उमटले. मात्र या सोहळ्याचे संयोजक विजय साने यांनी टिळक यांनी असे कोणतेही विधान केले नसून त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचा दावा केला. वास्तविक त्यांनी नोकरीच्या संधी कमी झाल्या असल्या तरी ब्राह्मण समाजातील तरुणांनी नवीन वाटा शोधाव्यात, असे सूचित केले. समाजात तेढ निर्माण होईल अशी कोणतीही कृती त्यांनी केली नाही. किंबहुना टिळक यांनी आरक्षण या विषयाला स्पर्शच केला नसल्याचे साने यांनी सांगितले.

दरम्यान, सामाजिक समता अभियानचे सरचिटणीस संदीप डोळस यांनी टिळक यांच्या विधानाचा निषेध केला. हे वक्तव्य जातीय उतरंडीतून आले आहे. आरक्षण कोणत्याही समाजाच्या प्रगतीच्या आड आरक्षण येणार नाही. जो समाज मुख्य प्रवाहापासून वंचित आहे, त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घटनाकारांनी आरक्षण आणले. भारतीय जाती व्यवस्था नष्ट होत नाही, तोवर आरक्षण राहील.  टिळक यांनी आरक्षणावर बोलण्याऐवजी जातीय व्यवस्था कशी नष्ट होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे डोळस यांनी सांगितले.