वेळुंजे शाळेत नामदेव बेलदार यांच्या संकल्पनेनुसार शिक्षण
प्राथमिक शिक्षण प्रणालीतंर्गत जिल्हा परिषदेच्या राज्यातील सर्व शाळांमध्ये सध्या ‘ज्ञानरचनावाद’ पध्दतीनुसार अध्ययन व अध्यापन केले जाते. ही पध्दत बऱ्यापैकी लोकप्रिय झाली असली तरी तिच्यातील काही त्रुटींमुळे ग्रामीण भागात शिक्षकांसमोर निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे येथील शाळेतील शिक्षक नामदेव बेलदार यांनी ज्ञानरचनावाद अध्ययन अध्यापन पध्दतीस पर्याय म्हणून ‘स्मार्ट ज्ञानरचनावाद’ ही संकल्पना मांडली आहे. वेळुंजे शाळेत सध्या या पध्दतीने शिक्षण देण्यात येत असून त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची नैसर्गिक पद्धत, त्याच्या विचारांना चालना देणाऱ्या कृतीयुक्त सहभाग असणाऱ्या अध्ययय अनुभवांची रचना आणि ताणरहित वातावरणात आनंददायकपणे शिक्षण देण्याची पध्दत म्हणजे ज्ञान रचनावाद होय. या पध्दतीत विद्यार्थ्यांला शिकवण्याकडून शिकण्याकडे वळविण्यात येते. सातारा जिल्ह्य़ातील कुमठे बीटाने सर्वप्रथम ज्ञानरचनावाद पध्दतीस चालना दिली. या पध्दतीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीत लक्षणीय बदल झाल्याचे लक्षात आल्यावर नाशिक जिल्ह्य़ात निफाड तालुक्यातील अकरा शाळांमध्ये या पध्दतीनुसार शिक्षण देणे सुरू झाले. या पध्दतीची उपयोगिता पाहून मार्गील शैक्षणिक वर्षी राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये ज्ञान रचनावाद पध्दत अनिवार्य करण्यात आली. त्यानुसार त्र्यंबकेश्वरच्या आदिवासी भागातील वेळुंजे येथील जिल्हा परिषद शाळेत नामदेव बेलदार यांनी ज्ञान रचनावादानुसार फरशीवर आरेखन करून अध्यापनास सुरूवात केली. परंतु, या पध्दतीत अध्यापन करताना एकाच शिक्षकाकडे दोन वर्ग असल्यामुळे निर्माण होणारी समस्या, विद्यार्थ्यांना गटागटाने बसविताना येणारी अडचण या त्रुटी त्यांना जाणवल्या. तसेच पावसाळ्यात त्र्यंबकेश्वरसारख्या भागात निर्माण होणारी परिस्थिती त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिली. पावसाळ्यात या भागात संततधार असते. त्यामुले भिंतींना व फरशींना ओल येते. त्यात मुले फरशीवर बसून कसे अध्ययन करणार, असा प्रश्न त्यांना पडला.
या प्रश्नाचे उत्तर त्यांना ‘स्मार्ट ज्ञानरचनावाद’ या संकल्पनेत सापडले. या संकल्पनेनुसार बेलदार यांनी विविध ज्ञानरचनावादी आरेखन प्लायवूडवर कल्पकतेने साकारले. हे ज्ञानरचनावादी ‘स्मार्ट’ फलक प्रात्यक्षिकासह लेखन सरावासही उपयोगी येतात. काही स्मार्ट फलक बहुउद्देशीय असून त्याव्दारे भाषा, गणित, इंग्रजी असे तीनही विषय व त्यांचे किमान तीन ते चार घटक सहज शिकवता येतात. हे फलक विद्यार्थ्यांना हाताळण्यास सुलभ आहेत. विद्यार्थी आपल्या आवडीनुसार व्हरांडय़ात, बाकडय़ावर, झाडाखाली, शाळेच्या बागेत कुठेही व कोणत्याही गटाला घेऊन अध्ययन करू शकतात. या फलकांच्या दोनही बाजूने आरेखन करण्यात आलेले असून ते वेगवेगळ्या विषयांचे असल्याने एका बाजूचे अध्ययन झाल्यास आवडीनुसार ते बदल करू शकतात. त्यामुळे हे फलक अध्ययनासाठी मुलांच्या आवडीचे झाले. याच्या वापरास कोणतीही मर्यादा नाही. काही फलक हे पूर्णत: प्रात्यक्षिकास वाव देणारे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्याची क्रिया पुन्हा पुन्हा करण्यास मिळते. त्यातून अभ्यास दृढ होण्यास मदत होते. काही फलक प्रात्यक्षिकासह लेखन सरावासही उपयुक्त असल्याने प्रात्यक्षिकांबरोबर लेखन सरावही होण्यास मदत झाली आहे. उदा. मणी टाका संख्या तयार करा या फलकात एक एकक, दशक, शतक हे दर्शविणाऱ्या उभ्या लहान दांडय़ा असलेल्या पट्टीची व्यवस्था करण्यात आली आहे.
विद्यार्थी प्रत्येक दांडय़ात मणी टाकून पटकन दशलक्षपर्यंत संख्या अगदी पटकन तयार करतात. ती संख्या फलकावर अंकी आणि अक्षरी लिहितात. ‘अर्धे तुझे अर्धे माझे ’ म्हणजेच ‘५०-५०’ या फलकाव्दारे विद्यार्थी भाषा, गणित, इंग्रजी हे विषय शिकतात. बेलदार यांनी अत्यंत कल्पकतेने तयार केलेल्या या शैक्षणिक पध्दतीची शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष राऊत यांनीही दखल घेतली असून कार्यशाळांव्दारे या पध्दतीची माहिती इतर शाळांपर्यंत पोहचविण्याचा त्यांचा मानस आहे.