शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी दिवाळीतील सुटय़ांमध्ये कपातीची सूचना
कुंभमेळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नाशिकच्या शाळांना प्रत्येक पर्वणीवेळी काही सुटय़ा दिल्या होत्या. दैनंदिन व्यवहारात मिळालेली ही सुटी शिक्षण विभागासाठी डोकेदुखी ठरली आहे. पर्वणी काळातील या सुटीमुळे शैक्षणिक कामकाजातील १२ दिवस कमी झाल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हे दिवस दिवाळीच्या सुटीत भरून काढावेत, अशी सूचना शिक्षण आयुक्तांनी केली आहे. शहरातील शाळांच्या दिवाळी सुटीवर त्यामुळे कपातीचे सावट दाटले आहे. शिक्षण विभागाच्या या सुचनेला शिक्षकांनी विरोधाची भूमिका घेतली आहे.
दर बारा वर्षांनी नाशिक-त्र्यंबक येथे भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या पातळीवर नियोजन केले होते. शाही स्नानाला होणारी गर्दी लक्षात घेऊन या काळात शहरात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी पर्वणीच्या दिवसासह आधीचा व नंतरचा असे सलग तीन दिवस शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्याचे नियोजन करण्यात आले. त्यात दिलासादायक बाब म्हणजे एक पर्वणी शनिवारी आणि एक रविवारी होती. शालेय विद्यार्थी व शिक्षकांना सिंहस्थानिमित्त मिळालेली सुटी म्हणजे एक पर्वणी ठरली होती. परंतु, आता कुंभमेळ्यातील सुटय़ांमुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान यावर शिक्षण विभागाने गांभीर्याने विचार सुरू केला आहे. सिंहस्थ सुटीमुळे सहामाहीपूर्व सर्व अभ्यासक्रम पुर्ण करून घेण्यात अडचणी उद्भवल्या. त्यात गणेशोत्सव, नवरात्र यासह अन्य काही सणवारांच्याही सुटय़ा आल्या. पूर्व प्राथमिक गटात तर शनिवार, रविवार सुटी असल्याने त्यांचाही अभ्यास पूर्ण करण्यात अडचणी आल्या. सहामाही परीक्षेपूर्वी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांनी जादा तासाचा पर्याय निवडला. त्या माध्यमातून अभ्यासक्रम पुर्ण केला असला तरी सुटय़ांची कसर भरून काढण्यासाठी राज्य शिक्षण आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी दिवाळीच्या सुटीवर बोट ठेवले आहे.
कुंभमेळ्यात देण्यात आलेल्या सुटय़ांची कसर भरून काढण्यासाठी नाशिक शहरातील शाळांच्या दिवाळी सुटीतील १२ दिवस कमी करण्यात यावे, अशी सूचना करणारे पत्र महापालिकेच्या शिक्षण मंडळाला आधीच प्राप्त झाले आहे. मंडळाने शहरातील सर्व शाळांना हे पत्र पाठविल्याने दिवाळीतील एकंदर सुटीवर कपातीचे सावट गडद झाले आहे. मुळात, सिंहस्थाची पहिली पर्वणी शनिवारी २९ ऑगस्ट, दुसरी रविवारी १३ सप्टेंबर आणि तिसरी शुक्रवारी म्हणजे २८ सप्टेंबर तर त्र्यंबक येथे शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी होती. तिन्ही पर्वण्यांसाठी शनिवार तसेच रविवार आल्याने सलग सुटीत चार दिवस कमी झाले. उर्वरित आठ दिवसांचा कालावधी फार नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. याबाबत शनिवारी पूर्ण वेळ शाळा घेऊन हे दिवस भरून घेता येईल, असा पर्याय समोर ठेवण्यात आला. मात्र शाळा शनिवारी पूर्ण वेळ होतील, त्यावर अंकुश कोणाचे राहील, विद्यार्थी तसेच शिक्षकांची मानसिकता काय, आदी प्रश्नांची मालिका शिक्षण मंडळासमोर उभी आहे.
नाशिक महापालिका शिक्षण प्रशासनाधिकाऱ्यांनी दिवाळीची सुटी कमी करण्यास पसंती दिल्याने शिक्षकांमध्ये संतप्त भावना आहे. महापालिका शाळा सुटी कमी करून शिक्षण विभागाच्या सूचनेचे पालन करणार असले तरी खासगी शाळा काय निर्णय घेतात, याकडे सर्वाचे लक्ष आहे. शिक्षकांनी दिवाळीची सुटी कमी करण्यास विरोध केला असून दिवाळी समीप येत असल्याने हा विषय ऐरणीवर आला आहे.