वडाळा भागात पैसे वाटप करताना एकास अटक

निवडणूक कोणतीही असो ‘लक्ष्मी दर्शन’ तसे ठरलेले असते. नोटा बंदीच्या काळात झालेल्या नगरपालिका निवडणुकीत त्याचे प्रत्यंतर पाहावयास मिळाले होते. त्याची पुनरावृत्ती महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या तीनही निवडणुकीत येत आहे. महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३० मधील वडाळा येथे शिवसेना पुरस्कृत उमेदवार संजय चव्हाण यांच्या समर्थकाला मतदारांना पैसे वाटताना पकडण्यात आले. हे प्रकार रोखण्यासाठी यंत्रणेची करडी नजर असली तरी उमेदवार व समर्थकांकडून वेगवेगळ्या पद्धतीने मतदारांचे समाधान करण्याच्या क्लृप्त्या शोधण्यात येत आहे.

जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक एकाच वेळी होत आहे. प्रत्येक निवडणुकीत उमेदवार मतदारांना पैसे वा मद्याचे प्रलोभन दाखवत असल्याचे निवडणूक आयोगाला तसेच पोलीस यंत्रणेलाही ज्ञात असल्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी खास पथकेही कार्यान्वित करण्यात आली आहे. कोणत्याही निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवशीची रात्र महत्त्वाची मानली जाते. जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर उमेदवार छुप्या पद्धतीने प्रचार करताना मतदारांना आमिष दाखविण्याचाही संभव असतो. ही बाब लक्षात घेऊन पोलीस व निवडणूक यंत्रणेने अशा गैरप्रकारांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याच अंतर्गत एका उमेदवाराच्या समर्थकाला वडाळा गावात रोख रक्कम व मतदार यादीसह पकडण्यात आला. सौरभ घुमरे (३३) असे या संशयिताचे नाव असून तो सेना पुरस्कृत उमेदवार संजय चव्हाण यांचा कार्यकर्ता असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. चव्हाण यांच्या कार्यालयाच्या मागील वडाळा भागात ही कारवाई करण्यात आली.

यंदा महापालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. प्रचार संपुष्टात आल्यानंतर उमेदवारांचे लक्ष मतदारांचे समाधान करण्यावर आहे. नोटा बंदीच्या काळात झालेल्या पालिका निवडणुकीत उमेदवारांनी जुन्या नोटा मतदारांना दिल्याची चर्चा झाली होती. मागील काही निवडणुकींचा विचार केल्यास झोपडपट्टीतीलच नव्हे तर सुशिक्षित मतदारही मतदानाला लवकर बाहेर पडत नसल्याचे दिसून येते. मतदानाच्या पूर्वसंध्येला होणारी आर्थिक उलाढाल नेहमीच चर्चेचा विषय ठरते. त्या अनुषंगाने काही उमेदवारांकडून प्रयत्न सुरू झाल्याचे उपरोक्त कारवाईवरून समोर आले आहे. झोपडपट्टी परिसरात या काळात प्रलोभने दाखविण्याचे प्रकार घडतात. या वेळी चार सदस्यीय प्रभाग रचना असल्याने मतदारांचा भावही चांगलाच वधारल्याचे बोलले जाते. या घडामोडींचा मतदानावर काय परिणाम होणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे.