दिवसा चटके बसतील असे टळटळीत ऊन अन् रात्री काहीसा गारवा.. हे वातावरणातील बदल ‘ऑक्टोबर हीट’ची जाणीव करून देत असताना दुसरीकडे येणाऱ्या थंडीच्या हंगामाची वर्दी देणारे ठरले आहे. पावसाचा हंगाम संपुष्टात आल्यानंतर २५ अंशाच्या आसपास असणाऱ्या तापमानात गेल्या काही दिवसांत सहा ते सात अंशांची वाढ झाली आहे.  रात्री हा पारा थेट १५ अंशापर्यंत खाली उतरतो. या महिन्यात वातावरण अशा दोन टोकांवर हिंदोळ्या घेताना पाहावयास मिळत आहे.

जिल्ह्य़ात  पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने थंडीचा हंगामही तसाच  राहील, असा सर्वसाधारण समज.  एरवी, उन्हाळ्यात जसे उन्हाचे चटके बसतात, तशीच सध्या काहीशी स्थिती ऑक्टोबर महिन्याची आहे.  काही दिवस कायम राहिलेली ही स्थिती ७ ऑक्टोबरनंतर बदलली. या दिवशी तापमानात ३ ते ४ अंशांनी वाढ होऊन ते २८-२९ पर्यंत जाऊन पोहोचले. या महिन्यात सर्वाधिक म्हणजे ३२.२ अंशाची नोंद १८ ऑक्टोबर रोजी झाल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली. तापमानाचा पारा सध्या ३१ अंशाच्या आसपास असला तरी पुढील काळात त्यात वाढ होण्याची धास्ती आहे. रात्री दहा ते सकाळी सात या काळात गारव्याची सुखद अनुभूती मिळते. थंड हवेसाठी प्रसिद्ध असणारे नाशिक सध्या दिवसा तापत असताना रात्री जाणवणाऱ्या गारव्याने आगामी थंडीची चाहूल लागली आहे. ‘ऑक्टोबर हीट’मधील ऊन उन्हाळ्यासारखे आरोग्यास घातक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास होतो, तसाच या काळातही होऊ शकतो, याकडे ते लक्ष वेधतात.