विजयी, पराभूत उमेदवारांच्या समर्थकांमध्ये धुडगूस;  मारहाण, दगडफेकीचे प्रकार

महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी विजयी तसेच पराभूत उमेदवार समोरासमोर भिडले. त्यामुळे तोडफोड व तणावाची स्थिती निर्माण झाली. अनेकांचा संयम सुटला. काही पराभूत व विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी धुडगूस घातला. नाशिकरोड भागात अपक्ष पराभूत कुख्यात पवन पवारच्या समर्थकांनी दगडफेक तर याच भागात विजयी उमेदवाराला मारहाण झाली. भद्रकाली परिसरात पराभूत उमेदवाराच्या घरावर हल्ला करण्यात आला तर जुने नाशिकमधील बागवानपुरा भागात समर्थकांनी दगडफेक केल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी तातडीने धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. इतरही काही भागात असे प्रकार घडल्याचे सांगितले जाते.

नाशिकरोड भागात विजयी झालेले केशव पोरजे हे मतमोजणी केंद्रातून बाहेर पडत असताना प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या समर्थकांनी त्यांना धक्काबुक्की केली. अकस्मात घडलेल्या या प्रकारामुळे केंद्र परिसरात गोंधळ उडाला. पोरजे हे माघारी फिरले. पोलिसांनी धाव घेऊन त्यांना नंतर सुरक्षितपणे बाहेर नेले. प्रभाग क्रमांक १८ मधून पराभूत झालेल्या पवन पवारच्या समर्थकांनी जेलरोड भागात दगडफेक केली. पवारविरुद्ध अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. निकाल समजल्यानंतर समर्थकांनी धुडगूस घातल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. महापालिकेने जाहीर केलेल्या संवेदनशील केंद्रात जुन्या नाशिकमधील काही प्रभागांचा समावेश होतो. या ठिकाणी प्रदीर्घ काळ सत्तेत राहणाऱ्या खैरे यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्याची किंमत एकाला मोजावी लागली.

प्रभाग क्र. १३ मधून शाहू खैरे यांनी भाजपचे गणेश मोरे यांना पराभूत केले. निकाल जाहीर झाल्यानंतर दुपारी खैरे समर्थक सर्वसाक्षी मंदिर येथील मोरे यांच्या घराजवळ पोहचले. त्यांनी मोरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निवडणूक का लढविली, असा जाब विचारत धमकावण्याचा प्रयत्न केला. या वादाचे पर्यवसान तोडफोडीत झाले. संतप्त जमावाने घरावर दगडफेक करत साहित्याची नासधूस करण्याचा प्रयत्न केला. अंगणात लावलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगविले. या संदर्भात पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी माहिती दिली. पराभूत उमेदवार मोरे यांच्या घरावर दगडफेक झाली नसून संतप्त जमावाने त्यांच्या घरासमोरून जाताना घोषणाबाजी व शिवीगाळ केली. या गदारोळात तेथील वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी मोरे यांनी वाहन तोडफोड झाल्याची तक्रार केली असल्याचे पाटील यांनी सांगितले. असाच प्रकार जुने नाशिकमधील बागवानपुरा, चौक मंडई व परिसरात घडला. या ठिकाणी कार्यकर्त्यांची वाहनाची तोडफोड व दगडफेक केली. अकस्मात घडलेल्या घटनेमुळे नागरिकांची धावपळ उडाली. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी धाव घेतली. परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पराभूत उमेदवारांच्या समर्थकांनी हा धुडगूस घातल्याची स्थानिकांची भावना आहे. शहरातील अन्य संवेदनशील भागातही असे प्रकार घडण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी दक्षता घेतली.