विभागवार स्वाक्षरी मोहीम राबविणार

घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये महापालिकेतील सत्ताधारी भाजपने वाढ केल्याच्या विरोधात शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादीही मैदानात उतरली आहे. या करवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे विभागवार स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी भाजपने घरपट्टीत १८ टक्के तर पाणीपट्टीत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला. या शिवाय नळ जोडणी शुल्क, या जोडणीसाठी रस्त्याची तोडफोड झाल्यास दुरुस्ती खर्च, टँकरने दिले जाणारी पाणी आदी शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या संदर्भात जनजागृतीची भूमिका घेऊन शिवसेना लवकरच महापालिकेवर मोर्चा काढणार आहे. कर वाढीवरून भाजप-शिवसेनेत जुंपल्याचे दिसत असताना राष्ट्रवादीने करवाढीला विरोध दर्शविला आहे. स्मार्ट सिटी व अमृत योजनेतील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी करांत वाढ आवश्यक असल्याचे कारण देत प्रशासनाने सुचविलेल्या करवाढीला स्थायी समितीने मंजुरी दिली. स्थायी समितीच्या बैठकीत नाशिकरांवर लादलेली मालमत्ता व पाणीपट्टीतील वाढ निषेधार्ह असल्याचे राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले. महागाई व बेरोजगारीने सर्वसामान्य त्रस्त असताना करवाढ करणे अयोग्य आहे. महापालिकेतील तिजोरीत भर घालण्यासाठी कर वाढ हाच एकमेव पर्याय होवू शकत नाही. महापालिका मालकीच्या मोक्याच्या ठिकाणी जवळपास ९०३ मिळकती आहेत. त्या ताब्यात घेऊन त्यातून उत्पन्न कमविणे हा उत्तम पर्याय असताना करवाढ लादली जात असल्याची तक्रार त्यांनी केली.

महापालिका आपल्या जागा भाडेतत्वावर देऊ शकते. घरपट्टी लागू नसलेल्या मिळकतींवर कर आकारणी करावी, कर थकबाकीदारांविरोधात वसुलीची मोहिमी राबवून त्यांच्यावर कारवाई केल्यास पालिकेचे उत्पन्न वाढविता येईल. इतर पर्यायांवर विचार न करता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्यासाठी ही करवाढ केली जात असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे. या संदर्भात विभागवार स्वाक्षरी मोहीम राबवून जनतेच्या भावना सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या जाणार असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

नगरसेवकांनी करवाढ हाणून पाडावी

महापालिकेच्या इतिहासात आजवर झाली नव्हती, तितकी करवाढ नाशिककरांवर लादली गेली असून नगरसेवकांनी कठोर भूमिका घेऊन पालिका प्रशासनाचा डाव हाणून पाडावा, अशी मागणी माजी महापौर दशरथ पाटील यांनी केली आहे. नगरसेवकांना प्रत्येकी ७५ लाखाचा निधी देण्याचे अमिष दाखवत प्रशासनाने घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांच्या मदतीने मंजूर करवून घेतला. हा विषय सर्वसाधारण सभेत मांडला जाईल. पालिकेतील सर्व नगरसेवकांनी करवाढीला विरोधाची ठाम भूमिका घेऊन प्रशासनाचा डाव हाणून पाडणे आवश्यक आहे. पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर पाटील यांनी शरसंधान साधले. बांधकाम व्यावसायिकांच्या सत्कार सोहळ्यांना हजेरी लावणारे आयुक्त नाशिककरांसाठी काही करतील, अशी अपेक्षा नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

दशरथ पाटील