राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे सलग दुसऱ्या दिवशी ऐन दिवाळीच्या हंगामात प्रवाशांची दैना झाली.  तर दुसरीकडे बुधवारी आगारात खासगी बसमध्ये प्रवासी घेण्यास आंदोलकांनी विरोध दर्शविला. एसटी प्रशासनाने स्थानकातील विश्रामगृह बंद करत कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. चिघळत चाललेल्या संपामुळे गावोगावीच्या प्रवासाला करकचून ब्रेक लागला आहे.  वेगवेगळ्या आगारात मुक्कामास असलेल्या वाहनचालक व वाहकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तुटपुंज्या पगारात निभावायचे कसे, हा त्यांचा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे.

जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारात सध्या हजारहून अधिक वाहक व चालक मुक्कामी आहेत. त्यात महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. सणासुदीच्या काळात रास्त मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाकडे प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली. परिवहन मंत्री कामगार नेते असले तरी त्यांची कामगारांशी नाळ जोडलेली नाही. त्यांच्या विधानामुळे कर्मचाऱ्यांच्या रोषात अधिक भर पडली. या आधी झालेल्या बैठकांमध्ये त्यांना वस्तुस्थिती मांडता नाही आली का, असा प्रश्न आरिफ मन्सुरी यांनी केला.  तोटय़ाचे कारण पुढे करत कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत ठेवण्यात आले. दुसरीकडे ग्रामीण भागात किंवा दुर्गम परिसरात वायफायची गरज नसताना बसमध्ये ती व्यवस्था करण्यात आली. भ्रष्टाचाराला वाव असणाऱ्या सुविधा प्रवाशांना दिल्या जातात. मात्र कामगारांच्या मूलभूत मागण्यांना बगल दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाशांप्रमाणे एसटी चालक व वाहकांचे हाल होत आहेत

परतीच्या प्रवासात अडकले

मूळचे नागपूरचे असणारे जनार्दन आव्हाड सध्या पालघरला राहत आहेत. दिवाळीसाठी दोन दिवस रजा घेऊन ते घरी जाणार होते. पण सोमवारी रात्री परतीच्या प्रवासात नाशिकमध्ये अडकले. बँकेचे एटीएम, काही रोख रक्कम खिशात आहे. घरी मात्र गरजेपुरते पैसे ठेवल्याने कुटुंबीय दिवाळी कशी साजरी करणार ही त्यांना भ्रांत. नवीन कपडे घेण्यासाठी

मुलांचा फोन येतो. पत्नी विचारणा करते. यामुळे वैतागून भ्रमणध्वनी बंद करून कुटुंबीयांशी संपर्क तोडून टाकल्याची व्यथा आव्हाड यांनी कथन केली.

महामंडळातील गैरकारभाराबाबत संताप

चिपळूण आगारातील प्रल्हाद राणे यांनी   मंडळात सर्वच स्तरावर मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. कामात काही चूक झाल्यास वरिष्ठांची बदली तर कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाते. दहा वर्ष काम करूनही पगार जेमतेम १५ हजाराच्या घरात आहे. त्यात मुलांचे शिक्षण, घर खर्च, कर्ज, दवाखाने निभावायचे कसे,  हा प्रश्न मनात घर करून असतो, असे ते म्हणाले.

महिला कर्मचारी असुरक्षित

अनिता तरटे यांनी महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षितता नसल्याची तक्रार केली. प्रवासात काही गुन्हेगारी मंडळींकडून त्रास होतो. इतर कर्मचारी समज देतात. पण आम्हाला सुरक्षितता नाही. लांब पल्ल्याच्या प्रवासात महिलांसाठी स्वच्छतागृह नसतात.

गरोदरपणात बैठे काम करू द्या, या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने अनेक जणींना गर्भपाताला सामोरे जावे लागते. पण या विषयी कोणी बोलायला तयार नसल्याचे तरटे यांनी सांगितले.

उसणवारीवर दिवाळी

सुभाष जाधव यांनी कुटुंबीयांना उधार उसणवारीवर दिवाळी साजरी करावी लागणार असल्याचे सांगितले. बहुसंख्य चालक व वाहकांना वडापाव, भजी खाऊन दिवस काढावे लागत आहेत.

एरवी आंदोलन काळात कळवळा येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी ना विचारपूस केली, ना आमच्या खाण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. उलट कामावर रुजू होत नाही म्हणून महामंडळाने आम्हाला विश्रामगृहातून बाहेर काढून देत स्वच्छतागृहाचे पाणी बंद केल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली.

संपकऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न

परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप सलग दुसऱ्या दिवशी कायम राहिल्याने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आगार परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. संपाबद्दल माहिती झाल्याने अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले. यामुळे बहुतांश बस स्थानकांवर शुकशुकाट होता. काही प्रवाशांनी खासगी बसने मार्गस्थ होणे पसंत केले. दुपारी काही खासगी बसेस स्थानक परिसरात आल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांना विरोध करत प्रवाशांना उतरवून दिले. प्रशासनाने स्थानकातील विश्रामगृह बंद करत आंदोलकांनी त्याचा वापर करू नये असा प्रयत्न सुरू केला. प्रसाधनगृहातील पाणी बंद करण्यात आले. महामंडळाने कर्मचाऱ्यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न चालविले असून त्याबद्दल रोष प्रगट होत आहे.