खऱ्या अर्थाने वर्षभराच्या कालावधीचा असणारा, परंतु, प्रारंभीचे वाद विवाद आणि मुख्य पर्वणी काळात भाविकांना भेडसावलेल्या अडचणींमुळे अधिक्याने चर्चेत राहिलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वकाळ ऑगस्ट महिन्यात संपत आहे. सिंहस्थ पर्वाच्या समारोपानिमित्त त्र्यंबक व नाशिक येथे उभारण्यात आलेली धर्म ध्वजा अर्थात ध्वजावतरण सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. ११ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजुन २७ मिनिटांनी हा सोहळा त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थ व नाशिक येथे गोदा काठावर पार पडणार आहे. त्र्यंबक येथील सोहळ्यास मुख्यमंत्र्यांनीही हजेरी लावावी यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. या निमित्त दोन्ही ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू झालेले सिंहस्थ कुंभ पर्व ११ ऑगस्ट रोजी संपत आहे. या दिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास गुरू कन्या राशीत प्रवेश करणार असल्याने कुंभकाल समाप्त होत आहे. यावेळी हा ध्वजावतरण सोहळा होईल. सिंहस्थ समाप्ती सोहळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर आखाडा परिषद, त्र्यंबक नगरपालिका, पुरोहित संघ, सिंहस्थ नागरी समितीच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी आखाडा परिषदेचे स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, महामंत्री महंत हरिगिरी महाराज, त्र्यंबक पालिकेचे संतोष कदम, पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी आदी उपस्थित होते. महंत हरिगीरी महाराज यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांना निमंत्रण दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहू असे आश्वासन दिल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या कार्यक्रमाचे नियोजन सुरू आहे. ध्वजपर्व समाप्ती निमित्त त्र्यंबक शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. ज्या शासकीय अधिकारी, संत महंतानी सिंहस्थ काळात उल्लेखनीय योगदान दिले, त्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.

दरम्यान, नाशिक येथे पुरोहित संघाच्या पुढाकारातून या सोहळ्याचे नियोजन सुरू आहे. या सोहळ्यास संत महंताना निमंत्रीत करण्यात येईल. राजकीय मंडळीना निमंत्रण देण्याची जबाबदारी आ. बाळासाहेब सानप यांच्यावर देण्यात आली आहे. ध्वजावतरणाचे औचित्य साधत सोहळ्यास सुरत पीठाचे वैष्णव संप्रदायाचे षष्ठपीठाधीश्वर जगद्गुरू वल्लभाचार्य महाराज, नाणीज् पीठाचे नरेंद्राचार्य महाराज यांच्यासह अन्य काही संत महंताना निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी धार्मिक विधीनंतर ध्वजावतरण होईल. तत्पुर्वी, सायंकाळी परिसरात शोभायात्रा काढण्यात येईल. तसेच जाहीर सभेसह अन्य कार्यक्रमांचे नियोजन सुरू असल्याचे नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी सांगितले.