जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक

राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून काहिशा दुर्लक्षित राहिलेल्या, परंतु, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या जिल्हा परिषदेच्या ७३ गट आणि पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी मंगळवारी ग्रामीण भागातील तब्बल २६४६ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. गटांसाठी ३३८ तर गणांसाठी एकूण ६७६ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान होणार आहे.

जिल्ह्यातील २४ लाख २६ हजार ७८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी प्रथमच मतदान केंद्रांबाहेर प्रत्येक उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, त्याची आर्थिक स्थिती, दाखल गुन्हे ही माहिती पाहावयास मिळणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणेने तब्बल पाच हजारहून अधिक फलक तयार केले असून ते मतदान केंद्रांबाहेर झळकत आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भीड वातावरणात पार पडावे, याकरीता कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या गटासाठी पांढरी तर पंचायत समिती गणासाठी गुलाबी रंगाच्या मतपत्रिकेचा यंत्रात वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदाराला गट व गणाकरिता प्रत्येकी एक मतदान करावे लागेल. या निवडणुकीत मतदारांना प्रथमच मतदार चिठ्ठींचे वाटप करण्यात आले. ज्या मतदारांपर्यंत चिठ्ठी पोहोचली नाही, त्यांच्यासाठी केंद्रातच खास कक्ष कार्यान्वित राहील.

या कक्षामार्फत मतदारांना उर्वरित चिठ्ठय़ा दिल्या जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले. सोमवारी तालुकानिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वितरण केले.

यावेळी संबंधितांनी मतदान यंत्र चालविण्याचे प्रात्यक्षिक केले. निवडणुकीत मतदानासाठी प्रत्यक्षात वापरण्यात येणारी तसेच राखीव अशा एकूण ६ हजार २०० मतदान यंत्राचा वापर होत आहे. मतदानावेळी यंत्रात कधीकधी तांत्रिक बिघाड होण्याचे प्रकार घडतात. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी दोन याप्रमाणे राखीव यंत्रांची उपलब्धता करण्यात आली आहे.

मतदान यंत्र, शाई व तत्सम साहित्य घेत आणि मतदान प्रक्रियेची नव्याने उजळणी करत अधिकारी व कर्मचारी पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्राकडे शासकीय वाहनातून रवाना झाले. उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली. मतदान केंद्रांचा ताबा घेतल्यानंतर विहित प्रक्रियेनुसार तयारी सुरू झाली. केंद्राच्या दर्शनी भागात नमुना मतपत्रिका चिकटविणे, प्रत्यक्ष केंद्रातील टेबल व्यवस्था, केंद्राबाहेर उमेदवारांच्या माहितीचे फलक उभारणी व तत्सम कामे पूर्ण करत सर्व मतदान केंद्र मतदानासाठी सज्ज झाल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात १२३ केंद्र संवेदनशील तर १५ केंद्र अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्ताच्या दृष्टिने अधिक दक्षता घेण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी सुक्ष्म पातळीवर नियोजन करण्यात आले आहे.

मतदान केंद्र परिसरातील घडामोडींचे छायाचित्रण करण्यात होणार आहे. दरम्यान, जाहीर प्रचाराची मुदत संपुष्टात आल्यानंतर उमेदवारांनी छुप्या पध्दतीने प्रचाराला सुरूवात केली. मतदानाची आदली रात्र खऱ्या अर्थाने महत्वाची मानली जाते. मतदारांना प्रलोभन दाखविण्याचे प्रकार या काळात अधिक्याने घडत असल्याने पोलीस व निवडणूक यंत्रणेने संशयास्पद हालचालींवर नजर ठेवली आहे.

तालुकानिहाय मतदान केंद्र

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वाधिक म्हणजे ३३९ केंद्र निफाड तालुक्यात तर सर्वात कमी म्हणजे ८३ केंद्र पेठ तालुक्यात आहेत. बागलाण तालुक्यात २४६, मालेगाव २७७, देवळा ८९, कळवण १५५, सुरगाणा १५८, पेठ ८३, दिंडोरी २०८, चांदवड १५३, नांदगाव १४७, येवला १६७, निफाड ३३९, नाशिक १३०, त्र्यंबकेश्वर ११५, इगतपुरी १६६, सिन्नर २१३ अशा एकूण २६४६ केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यातील २४८ झोनमधील १८७७ ठिकाणी केंद्र आहेत.

काही गावे बहिष्काराच्या तयारीत

निवडणूक आयोग मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करत असताना विकासापासून वंचित राहिलेल्या काही गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव गणातील चार आदिवासी पाडे मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. वीज, पाणी, रस्ता आदी समस्यांनी त्रस्त टाकेदेगावच्या बागवाडी, डोंगरवाडी, धाराची वाडी, देवगावचा रायपाडा येथील ग्रामस्थ वारंवार मागणी करुनही दुर्लक्ष केले जात असल्याने या निर्णयाप्रत आल्याचे सांगितले जाते. शासकीय यंत्रणेने संबंधितांची मनधरणी सुरू केली आहे.