अंबड येथील बैठकीत खा. राजू शेट्टी यांचा विश्वास

तब्बल अडीचशे कोटी रुपयांची थकबाकी निफाड सहकारी कारखान्यावर आहे. देणेकरी घटकांनी काही अंशी त्यागाची भूमिका स्वीकारल्यास कारखाना नव्याने सुरू करता येईल, असा विश्वास खा. राजू शेट्टी यांनी केले.

निसाका सुरू करण्यासाठी ग्रामसमृद्धी फाऊंडेशनच्या वतीने बुधवारी अंबड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी निसाका सभासदांना शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. मागील चार वर्षांपासून निसाका बंद आहे. कारखान्याची एकूण स्थिती समजावून घेतल्यानंतर शेट्टी यांनी तो कोणत्या पद्धतीने सुरू करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. नाशिक जिल्हा बँकेचे दीडशे कोटींचे कर्ज, कामगारांची थकीत देणी व तत्सम बाबींची सुमारे ७० कोटी आणि राज्य शासनाचे जवळपास ४० कोटी असे अडीचशे कोटी रुपयांची थकबाकी निफाड सहकारी कारकान्यावर आहे. सद्यस्थितीत पाच हजार मेट्रिक टन क्षमतेचा नवीन कारखाना उभारण्यासाठी जवळपास ३०० कोटी रुपये भांडवल लागते. त्यामुळे निसाकावरील कर्ज ही फार गंभीर बाब नाही. कारखाना सुरू होण्यासाठी प्रथम शेतकरी व कामगार यांनी एकदिलाने एकत्र येणे गरजेचे आहे. ही एकजूट झाल्यास कारखाना सुरू करण्याची प्रक्रिया गतिमान करता येईल. निसाकाशी संबंधित घेणेकऱ्यांनी त्यागाची भूमिका स्वीकारायला हवी. जिल्हा बँकेच्या थकीत कर्जाबाबत तडजोडीच्या अनुषंगाने चर्चा करायला हवी.

बँकेने थकीत कर्जापैकी निम्म्याहून अधिक रकमेची सवलत देणे आवश्यक आहे. कामगारांची देणी ७० कोटीच्या घरात आहे. कारखाना सुरू झाला नाही तर कामगारांना ही देणी कशी मिळू शकतील, असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला गेला. कारखाना सुरू होईल याकरीता कामगारांनी त्यागाची भूमिका स्वीकारणे गरजेचे आहे. राज्य शासनाला देय असणाऱ्या रकमेबाबत सवलत घेता येईल. देणेकरी घटकांच्या विषयावर चर्चात्मक मार्गाने तोडगा काढल्यास निसाका भागीदारी तत्त्वावर चालविण्यात देता येईल. या सर्व प्रक्रियेत शेतकरी हितासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही शेट्टी यांनी दिले. या घडामोडीत कारखाना खासगी व्यक्तीच्या हाती जाऊ दिला जाणार नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी कोणत्या पध्दती अवलंबिता येतील याची माहिती त्यांनी मेळाव्यात दिली. फाऊंडेशनचे योगेश पाटील, युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, कारखान्याचे सभासद उपस्थित होते.