नाशिकमधील सातपूर औद्योगिक वसाहतीतील ज्योती स्ट्रक्चर कंपनीसमोर आज (बुधवारी)सकाळी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. दुचाकीस्वार ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने एक दुचाकीस्वार कामगार जागीच ठार झाला. अपघातात कामगाराच्या डोक्यावरून ट्रेलरचे चाक गेल्याने त्याच्या चेहरा विद्रूप झाला. त्यामुळे त्याची ओळख पटवण्यास बराच वेळ लागला. रुपेश सोनवणे असे मृत कामगाराचे नाव असून, तो ज्योती स्ट्रक्चर याच कंपनीत काम करत होता.

रुपेश सोनवणे कंपनी समोरुन जाणाऱ्या ट्रेलरच्या डाव्या बाजूने स्कुटी पेप या दुचाकीने जात असताना अचानक खाली पडून ट्रकच्या मागील चाकाखाली सापडला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश सोनवणे व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी ट्रेलर चालक दलबीर सिंग (वय ५२, रा. छत्तीसगड) विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर पोलिसांनी ट्रेलर ताब्यात घेतला आहे.