कांदा प्रतवारी करून गोणीमध्ये विक्रीसाठी आणावा, हा व्यापाऱ्यांचा निर्णय अमान्य करत या विरोधात सोमवारी कळवण बस स्थानकासमोर शेतकऱ्यांनी रास्तारोको केला. आडतीच्या मुद्यावरून ११ जुलैपासून व्यापाऱ्यांनी लिलावावर टाकलेला बहिष्कार रविवारी रात्री मागे घेण्याचा निर्णय झाला. परंतु, हा निर्णय घेताना शेतकऱ्यांनी कांदा गोणीत आणावा, ही अट टाकली आहे. त्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.
शेतकऱ्यांची आडतीतून मुक्तता करत शासनाने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून ती घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून
जिल्ह्यातील बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी लिलाव बंदचे हत्यार उपसल्याने बाजार समितीतील कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार बंद आहेत. या संदर्भात असंतोष असताना व्यापारी वर्गाने रविवारी शेतकऱ्यांनी कांदा प्रतवारी करून व गोणीत बंद करून आणावा असे सांगत लिलावात सहभागी होण्याची तयारी दर्शविली. व्यापाऱ्यांच्या या भूमिकेविरोधात कळवण बस स्थानक परिसरात रास्ता रोको करण्यात आला. कांदा गोणीत आणण्यासाठी एक गोणीची किंमत २६ रुपये आहे.
ट्रॉलीत ३० क्विंटल कांदा विक्रीसाठी येतो तर या मालासाठी ६० गोणी लागणार आहेत. ६० गोणींची किंमत १५६० रुपये, ट्रॅक्टरचे भाडे एक हजार रुपये अधिक मजुरी एक हजार रुपये असा तीन हजार ६० रुपयांचा खर्च शेतकऱ्यांच्या माथी पडणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी गोणीत कांदा भरण्याचा आग्रह करू नये. मोकळ्या मालाचा पूर्वीप्रमाणे लिलाव करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी कळवणचे पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात शेतकरी संघटनेचे गोविंद पगार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ, शिवसेना कळवण शहरप्रमुख साहेबराव पगार आदी सहभागी झाले होते.