पारपत्र आणि चारित्र्य पडताळणीची आतापर्यंत काहीशी दिरंगाईने होणारी कामे आता जलदपणे होणार आहेत. शहरातील सर्व पोलीस ठाणी, उपायुक्त व आयुक्त कार्यालय यांना जोडणारी यंत्रणा कार्यान्वित झाली असून नागरिकांशी संबंधित उपरोक्त कामांचा निपटारा ऑनलाइन पद्धतीने करणे दृष्टिपथास आले आहे.
सद्य:स्थितीत शहरात १३ पोलीस ठाणे आहेत. सर्व पोलीस ठाणी, पोलीस आयुक्तालय आणि उपायुक्त कार्यालय हे परस्परांना सव्‍‌र्हरच्या माध्यमातून जोडण्यात आले आहेत. या सव्‍‌र्हरच्या कक्षाचे उद्घाटन मंगळवारी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या हस्ते करण्यात आले. आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात हा सव्‍‌र्हर कार्यान्वित झाला आहे. या वेळी उपायुक्त विजय पाटील, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकांत धिवरे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते. या नव्या व्यवस्थेमुळे पोलीस आयुक्तालयांतर्गत माहितीची देवाणघेवाण जलदपणे होईल. त्याचा प्रामुख्याने उपयोग दैनंदिन गुन्हे अहवाल, पारपत्र पडताळणी, चारित्र्य प्रमाणपत्र देण्याच्या कामात होणार असल्याचे जगन्नाथन यांनी नमूद केले. या शिवाय सतर्क पोलीस, पोलीस मित्र, प्रतिसाद हे अ‍ॅपही सव्‍‌र्हरमध्ये कार्यान्वित राहतील. नागरिकांना जलदपणे सेवा मिळण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार असल्याचे जगन्नाथन यांनी नमूद केले. या कक्षासाठी अपूर्व हिरे यांच्या आमदार निधीतून निधी देण्यात आला आहे.
स्थानिक पोलीस ठाण्यातून पारपत्र पडताळणी आणि चारित्र्य प्रमाणपत्र मिळविणे हे सर्वसामान्यांसाठी जिकिरीचे काम ठरते. त्यात बराच कालापव्यय होतो. नागरिकांना अनेकदा चकरा माराव्या लागत असल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. तथापि, या त्रासातून नागरिकांची नव्या यंत्रणेमुळे सुटका होईल. कारण, या संबंधीचा अर्ज पोलीस आयुक्तालयास प्राप्त झाला की, ऑनलाइन तो संबंधित पोलीस ठाण्याला जाईल. पडताळणीच्या कामात इतर पोलीस ठाण्यांचीही परस्परांना मदत होईल. अर्जदारावर काही गुन्हे दाखल आहेत की नाही, याची पडताळणी होऊन ऑनलाइन पद्धतीने मुख्यालयास त्याचा अहवाल पाठविला जाईल.
या प्रक्रियेत कागदपत्रे हाताळणी व इतर बाबींमध्ये जो कालापव्यय होतो, त्यास पूर्णविराम मिळणार आहे. त्यामुळे पारपत्र पडताळणी वा चारित्र्य प्रमाणपत्र जलदपणे अर्जदारास मिळणार आहे.

हॉटेलमधील निवासाची ऑनलाइन नोंदणी
नोकरी, पर्यटन, तीर्थाटन वा अन्य कोणत्याही कारणांनी नाशिक शहरास भेट देणाऱ्या व्यक्तीची डिजिटल स्वरूपात नोंद करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने ‘सिटी व्हिजिटर्स इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड रेकॉर्ड मॅनेजमेंट सिस्टीम’ विकसित केली आहे. याचा लाभ शहरातील हॉटेल व लॉज व्यावसायिकांना होणार आहे. सद्य:स्थितीत हॉटेल व लॉजधारकांकडून लिखित स्वरूपात ही माहिती संकलित केली जाते. स्थानिक पोलीस ठाण्यांमार्फत त्याची पडताळणी होते. नव्या आज्ञावलीद्वारे लेखी स्वरूपात अर्ज भरण्याची गरज पडणार नाही. सर्व हॉटेल व लॉजधारक आपल्या ग्राहकांची माहिती संगणकीय आज्ञावलीत ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात. पोलीस यंत्रणेशी ही आज्ञावली संलग्न असल्याने हॉटेल व लॉज मालकांना रेकॉर्ड जतन करण्याची गरज भासणार नाही. ऑनलाइन भरलेला अर्ज त्याच वेळी पोलीस यंत्रणेला पाहावयास मिळेल. शहरात येणाऱ्या व्यक्तींची डिजिटल पद्धतीने नोंद होणार असल्याचे जगन्नाथन यांनी सांगितले. हॉटेल व लॉजधारकांना नाममात्र एक हजार रुपये भरून ही आज्ञावली उपलब्ध करण्यात येणार आहे. भ्रमणध्वनीवरदेखील हे अ‍ॅप उपलब्ध राहील. पुढील काही दिवसांत याच आज्ञावलीत भाडेकरू नोंदणी, वाहन विक्री, सीम कार्ड विक्री आणि सायबर कॅफेतील ग्राहकांची नोंद करण्यात येणार आहे.