जिल्हा बँकेतील प्रकरणाबाबत पालकमंत्र्यांचा इशारा

५०० व एक हजारच्या नोटा रद्दबातल ठरविल्यानंतर तीन दिवसांनी जिल्हा बँकांना जुने चलन स्वीकारण्यास प्रतिबंध घालण्यात आले. या तीन दिवसांत या बँकेत तब्बल ३२४ कोटी रुपयांचे जुने चलन जमा झाले आहे. त्यात काही संशयास्पद आहे काय, बँकेशी संबंधित कोणी नोटांची अदलाबदल केली काय याची छाननी प्राप्तीकर विभागाने हाती घेतली आहे. त्यासाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेतून नोटा बदलाची संगणकीय माहिती घेण्यात आली. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, जिल्हा बँकेत नोटांची अफरातफरी करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिला. शेतकऱ्यांच्या बँकेतील हा प्रकार वाईट असल्याचे त्यांनी सांगितले.

चलननिश्चलनीकरणात जिल्हा बँकांना दूर ठेवण्यात आले. प्रारंभीच्या तीन दिवसात या बँकांना तसे र्निबध नव्हते. त्यामुळे इतर बँकांप्रमाणे या बँकांनीही जुने चलन स्वीकारले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विचार करता या तीन दिवसात जिल्हा बँकेत तब्बल ३२४ कोटींचे जुने चलन जमा झाले होते. जिल्हा बँकांच्या माध्यमातून काळ्याचे पांढरे करण्याचा प्रयत्न होईल, असा सरकारला संशय होता. त्यामुळे संबंधितांना तीन दिवसानंतर जुने चलन स्वीकारण्यास मज्जाव करण्यात आला. या तीन दिवसात जिल्हा बँकांकडे जुने चलन किती व कसे जमा झाले याची छाननी प्राप्तीकर विभागाने सुरू केली आहे. त्यासाठी बँकेच्या मुख्यालयातून उपरोक्त काळातील नोटा बदलीची माहिती या विभागाने संकलित केली. त्यास बँकेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. बँकेचा व्यवहार संगणकीय पद्धतीने चालतो. नोटांबाबतची माहिती त्यात समाविष्ट असते. नियमित कामात काही विपरीत घडले की नाही, याची छाननी विभागाने करावी, असेही बँकेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्हा बँकेतील या घडामोडींवर कालवा समितीच्या बैठकीनिमित्त येथे आलेल्या पालक मंत्र्यांनी भाष्य केले. बँकेत नोटांची अफरातफरी झाल्याची साशंकता व्यक्त होत आहे. प्राप्तिकर विभागाच्या चौकशीत याबाबतची स्पष्टता होईल.

या प्रकारात ज्यांचा सहभाग असेल त्यांची गय केली जाणार नाही. शेतकऱ्यांची ही बँक आहे. तिथे असा प्रकार घडणे वाईट आहे. काळे धन पांढरे करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबद्दल पंतप्रधान व मुख्यमंत्री गंभीर असल्याचे त्यांनी सूचित केले.

नोकरदार, शेतकरी सर्वाची कोंडी

जिल्हा बँकेतील नोटा बदलीविषयी साशंकता व्यक्त होत असताना दुसरीकडे रिझव्‍‌र्ह बँक चलन देत नसल्याने या बँकांमधून होणारे शिक्षकांचे वेतन, दूध, कुक्कुटपालन, विविध शासकीय योजनांचे अनुदान असे सर्व घटक कोंडीत सापडले आहे. बँकेच्या दैनंदिन व्यवहारांसाठी रिझव्‍‌र्ह बँक चलन देत नसल्याची तक्रार केली जात आहे. नाबार्डकडून जिल्हा बँकांना चलन देण्याचे जाहीर झाले. परंतु, ही रक्कम अद्याप प्राप्त झालेली नाही. नाशिक जिल्हा बँकेतून दर महिन्याला शिक्षकांचे वेतन होते. ही रक्कम ६५ कोटी इतकी आहे. बँकेकडे चलन उपलब्ध झाले नाही तर हे वेतन कसे होईल, असा प्रश्न अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी उपस्थित केला. या शिवाय, दूध, कुक्कुटपालन, शासकीय योजनांचे अनुदान, पीक कर्ज आदींचे पैसे देता येत नसल्याने शेतकरी वर्ग भरडला आहे. जिल्हा बँकेला दैनंदिन कामकाजासाठी निधी मिळावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्याचे दराडे यांनी सांगितले.