बहुमजली सदनिकांचा प्रस्ताव रखडला

शहर पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील शासकीय निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी ३५ लाख रुपयांच्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली आहे. जुन्या निवासस्थानांच्या दुरुस्तीला हिरवा कंदील दाखविला असला तरी शहर पोलीस मुख्यालय व नाशिकरोड पोलीस वसाहतीतील बिकट अवस्थेतील बैठय़ा चाळी पाडून त्याजागी बहुमजली १००९ सदनिका बांधण्याचा प्रस्ताव अद्याप रखडलेला आहे. जुन्या बांधकामांच्या दुरुस्तीवर आजवर मोठा खर्च झाला आहे. त्यात बदल करणे अपेक्षित असताना दुरुस्तीची परंपरा पुढे नेली जात असल्याचे शासन निर्णयावरून अधोरेखीत होत आहे.

पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्या संख्याबळाच्या तुलनेत उपलब्ध सेवा निवासस्थानांची संख्या निम्म्याने कमी आहे. यामुळे निम्म्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना इतरत्र आपल्या निवासाची व्यवस्था करावी लागते. शासकीय निवासस्थानांची कमतरता असल्याने आयुक्तालयाने बहुमजली इमारतीत नव्याने सदनिका बांधण्याचा प्रस्ताव पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत शासनाला सादर केला आहे. पोलीस मुख्यालय आणि नाशिकरोड पोलीस वसाहतीत बैठय़ा चाळीची जागा आणि विहितगाव येथे उपलब्ध असणारा भूखंड यावर बहुमजली सदनिका बांधण्याचे नियोजन आहे. पोलीस मुख्यालयातील बैठय़ा चाळीत एकूण ४८७ निवासस्थाने आहेत. त्यांचे बांधकाम होऊन बराच कालावधी लोटला आहे. त्यातील काही सदनिकांच्या भिंतीला तडे गेले तर काही सदनिकांच्या फरशा तुटून जमिनीत दबल्या गेल्या आहेत. पावसाळ्यात गळती होत असल्याने भिंत कोसळण्याची शक्यता असते. काही सदनिकांची अवस्था इतकी बिकट आहे की, दुरुस्ती वा डागडुजी करूनही त्या राहण्यास उपयुक्त ठरणार नसल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे. नाशिकरोडच्या बैठय़ा चाळींची वेगळी स्थिती नाही. ही निवासस्थाने दुरुस्ती करून राहण्यास उपयुक्त नाहीत असेही बांधकाम विभागाने सूचित केले आहे. जुन्या निवासस्थानांची दुरुस्ती व डागडुजीवर आजवर मोठय़ा प्रमाणात खर्च झाला आहे. यामुळे बहुमजली इमारतीच्या प्रस्तावावर निर्णय अपेक्षित असताना गृह विभागाने शासकीय निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी ३५ लाख ९ हजार रुपये खर्चाच्या सुधारीत प्रस्तावाला मान्यता दिल्याचे दिसून येते.

आयुक्तालयाच्या प्रस्तावानुसार बैठय़ा चाळीतील जीर्ण निवासस्थाने पाडून तिथे नवीन चटई क्षेत्राप्रमाणे बहुमजली इमारती बांधल्यास पोलीस मुख्यालयात नवीन बांधकामानंतर अतिरिक्त ३०० सदनिका अधिक उपलब्ध होतील. नाशिकरोड वसाहतीत ही संख्या १२२ वरून २०२ सदनिका नेण्याचे प्रयोजन आहे. विहितगाव येथे प्रस्तावित पोलीस ठाण्याची इमारत व कर्मचारी निवासस्थानासाठी ५० गुंठे जागा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी २० निवासस्थाने उपलब्ध करून देता येतील, असे प्रस्तावात म्हटले आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास कर्मचाऱ्यांना भेडसावणारा निवासस्थानांचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. गृह विभागाने मुख्यालयातील निवासस्थानांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मान्य केल्यामुळे काही सदनिकांच्या दुरुस्तीवर पुन्हा खर्च होणार असल्याचे दिसत आहे

सद्यस्थिती

शहर पोलीस आयुक्तालयात २८० अधिकारी तर ३०३६ कर्मचारी हे मंजूर संख्याबळ आहे. निवासस्थानांची संख्या अधिकाऱ्यांसाठी जेमतेम ११० आणि कर्मचाऱ्यांसाठी १७१५ इतकी आहे. सद्यस्थितीत १३२१ कर्मचारी आणि १७२ अधिकारी या निवासस्थानांपासून वंचित आहेत. यामुळे निवासस्थानाची प्रतिक्षा यादी बरीच मोठी आहे. शासकीय नियमानुसार किमान ७० टक्के कर्मचाऱ्यांना निवासस्थाने उपलब्ध करून देणे आवश्यक असते. निवासस्थानांच्या अपुऱ्या संख्येमुळे तो निकष पूर्ण होत नाही. एकंदर मनुष्यबळ आणि निवासस्थानांचा विचार करता हा निकष पूर्ण होण्यासाठी ४९३ निवासस्थानांची आवश्यकता आहे.