शहरासह जिल्ह्य़ात मंगळवारी विविध प्रश्नांवर धरणे, रास्ता रोको, निदर्शने अशा प्रकारे आंदोलनांची राळ उठल्याचे दिसून आले. काही आंदोलनांमध्ये राज्य व केंद्र शासनाला लक्ष्य करण्यात आले. शहरात तर जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर जणूकाही आंदोलनाचे केंद्र बनला होता. लागोपाठच्या आंदोलनांमुळे पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.
हिंसाचाराच्या घटनांचा डाव्या, पुरोगामी संघटनांतर्फे निषेध
डावे व लोकशाही पक्ष, पुरोगामी, परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने अ‍ॅड. गोविंद पानसरे यांचा जन्मदिन असहिष्णुता दिन म्हणून पाळण्यात आला. यानिमित्त दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असहिष्णुता व हिंसाचाराच्या निषेधार्थ धरणे धरण्यात आले. या वेळी विविध घटनांचा जाहीर निषेध करण्यात आला. त्यात जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अनास्थेचाही निषेध झाला. संपूर्ण देशात असहिष्णुता, हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. देशात सध्या जात्यंध शक्ती हिंसा भडकवत आहेत. दलितांवरील अत्याचार वाढत आहे. याचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डावे, पुरोगामी कार्यकर्ते व नेते एकवटले होते. आंदोलनकर्त्यांनी डॉ. दाभोलकर, अ‍ॅड. पानसरे, प्रा. कुलबर्गी यांच्या खुन्यांना व त्यामागील सूत्रधारांना अटक करावी, भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे, अशी मागणी केली. असहिष्णुतेविरोधात केंद्र व राज्य शासनाचे पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांना या वेळी पाठिंबा दर्शविण्यात आला. तसेच पत्रकारांना पोलीस उपायुक्ताकडून मारहाण झाल्याने त्यांना त्वरित निलंबित करण्याचीही मागणी करण्यात आली. जिल्ह्य़ात दोन महिन्यांत ५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा न देणाऱ्या पालकमंत्र्यांचा निषेध करण्यात आला. आंदोलनात भाकपचे जिल्हा सचिव राजू देसले, माकपचे शहर सचिव अ‍ॅड. वसुधा कराड, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सचिव अ‍ॅड. मनीष बस्ते, जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) एकनाथ येवले आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.