ज्वारी व मक्याचे खासगी बाजारात भाव पडत असल्याने नोव्हेंबरपासून राज्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. चिंचोली येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

या वेळी भाजपचे उपजिल्हाध्यक्ष प्रभाकर पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय घुगे आदी उपस्थित होते. काही वर्षांपासून कांदा भावात चढउतार होत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक वर्षी तीन लाख कांद्याच्या चाळी तयार करण्याचे शासनाचे नियोजन असल्याचे खोत यांनी स्पष्ट केले. जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे गावातील पाणी गावातच जिरविणे दृष्टिपथास आले. निवडणुकीआधी भाजपने दिलेला शब्द पाळला आणि आपल्यासारख्या फाटक्या माणसाला मंत्री केले. जिल्ह्य़ात परतीच्या पावसामुळे ज्वारी काळी पडली आहे.

मक्याचे उत्पादनही यंदा चांगले झाले आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जिल्ह्य़ात १ नोव्हेंबरपासून ज्वारी व मका खरेदी केंद्र सुरू केले जाईल, असे त्यांनी नमूद केले. कांदा उत्पादकांचा प्रश्न सोडवण्यासाठी कांद्याची साठवण क्षमता वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील काही वर्षांत १५ लाख कांदा चाळी उभारण्यात येणार असल्याची घोषणा खोत यांनी केली.