रिमझिम पावसाचा शिडकावा.. ऊन-पावसाचा लपंडाव.. अशा उत्साहवर्धक वातावरणात लाखो शिवभक्तांनी ‘बम बम भोले.. ओम नम शिवाय..’चा जयघोष करीत त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण केली. दरवर्षीच्या तुलनेत भाविकांच्या संख्येत काही अंशी घट झाली असली तरी भाविकांचे जथे टप्प्याटप्प्याने त्र्यंबक नगरीत दाखल होत असल्याने गर्दीचा माहोल कायम राहिला. देवस्थानने मागील चुका टाळत तिसऱ्या श्रावण सोमवारचे चोख नियोजन ठेवल्याने भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या.

श्रावणातील तिसऱ्या फेरीचे गेल्या काही वर्षांत चांगलेच विपणन झाले आहे. यामुळे तिसऱ्या फेरीला नाशिकसह राज्यभरातून भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होतात. या शिवाय, १२ ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. या प्रदक्षिणेसाठी पाच लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाने बांधला होता. परंतु राखी पौर्णिमा आणि चंद्रग्रहण या कारणांमुळे भाविकांच्या संख्येत मागील वर्षांच्या तुलनेत घट झाली. रविवारी सायंकाळपासून भाविकांनी नाशिकच्या मेळा बस स्थानकात त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. काहींनी पायी वारीला प्राधान्य दिले. या दिवशी खासगी वाहनांना त्र्यंबकेश्वरमध्ये प्रतिबंध असतो. खासगी वाहने नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर आधीच अडविली जातात. यामुळे एसटी बस हा महत्त्वाचा पर्याय असतो. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने ३००हून अधिक जादा बसेस सोडल्या. खासगी वाहनांना त्र्यंबकमध्ये प्रवेश नसल्याने काहींना खंबाळ्यापासून बसेसचा आधार घ्यावा लागला. रविवारी रात्रीपासून कुशावर्त तीर्थावर स्नान करत अनेकांनी परिक्रमेचा रस्ता पकडला तर काहींनी देवस्थान परिसरात दर्शनासाठी रांगा लावल्या. सोमवारी सायंकाळी मंदिरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत भाविकांचे जथे प्रदक्षिणेसाठी जाताना दृष्टीपथास पडले. रात्री प्रदक्षिणेसाठी गेलेले भाविक सकाळी परतु लागले. काहींचा उत्साह टिकून असला तरी काहींना मात्र प्रचंड थकवा जाणवत होता.

रात्रभर पायी चालून दमलेले भाविक ठिकठिकाणी विश्रांती घेताना दृष्टीपथास पडत होते. संततधार सुरू असल्यास पायी मार्गक्रमण करताना त्रास होत नाही. पावसाने उघडीप घेतल्याने माती व दगड पायांना टोचत असल्याचे संबंधितांचे म्हणणे होते.दरम्यान, त्र्यंबकेश्वरप्रमाणे नाशिक शहर परिसरात कपालेश्वर, सोमेश्वर, गोदाकाठावरील निळकंठ मंदिर यासह अन्य शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी करण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा कायम होत्या. कपालेश्वर मंदिर परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी लोखंडी जाळ्या उभारून वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली.

पोलिसांचा बंदोबस्त

प्रदक्षिणा मार्गात कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी या मार्गावर बंदोबस्त ठेवला होता. या शिवाय कुशावर्त तीर्थ, मंदिर परिसर, गावात ठिकठिकाणी गस्त यासाठी एक हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा ताफा सुरक्षेसाठी तैनात होता. अनेक सामाजिक संस्था व संघटनांनी भाविकांसाठी प्रदक्षिणा मार्गावर अल्पोपाहार व चहापाण्याची व्यवस्था केली. देवस्थानने ऊन तसेच पावसाचा त्रास होऊ नये, यासाठी शेड उभारले. नैसर्गिक विधीसाठी फिरते शौचालय उपलब्ध करून देण्यात आले. मंदिर परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. नगरपालिकेने छोटय़ा फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवत अंतर्गत रस्ते मोकळे राहतील याची दक्षता घेतली.