महाराष्ट्र पोलीस अकादमीतर्फे सातव्या एल. व्ही. केळकर स्मृती व्याख्यानात गुरुवारी नागालॅण्डचे माजी राज्यपाल तथा गुप्तचर विभागाचे संचालक श्यामल दत्ता हे ‘चेंजिंग डायनॅमिक्स ऑफ पोलीसिंग’ या विषयावर पुष्प गुंफणार आहेत.

त्र्यंबक रस्त्यावरील पोलीस अकादमी येथे सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. एल. व्ही. अर्थात लक्ष्मीकांत विष्णू केळकर यांनी नाशिक पोलीस अकादमीतून (१९३७-३८) पदवीचे शिक्षण पूर्ण केले. या तुकडीत अव्वल कामगिरीबद्दल मानाची तलवार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ३५ वर्षांतील पोलीस दलातील सेवेत केळकर यांनी राज्यातील विविध भागांत काम केले. राज्य पोलीस, गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यासह इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये दक्षता विभागाची जबाबदारी सांभाळली. याशिवाय प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण स्कूलचे प्राचार्य म्हणूनही काम पाहिले. गुन्हे अन्वेषण विभागातून ते उपअधीक्षक पदावरून निवृत्त झाले. सेवाकाळातील उत्कृष्ट कामगिरीत विविध पदकांनी केळकर यांना सन्मानित करण्यात आले. १९९२ साली त्यांचे निधन झाले. केळकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून केळकर कुटुंबीयांतर्फे पोलीस अकादमीत एल. व्ही. केळकर स्मृती व्याख्यानाचे आयोजन केले जाते. या प्रसंगी अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर प्रास्ताविक करणार आहेत. अकादमीचे संचालक नवल बजाज उपस्थित राहणार आहेत.