मालेगाव महापालिका निवडणूक

महापालिका निवडणुकीतील अकरा पक्ष व शंभरावर अपक्षांच्या सहभागामुळे रंगलेल्या लढतींमध्ये काही ठिकाणी कडवे आव्हान निर्माण करण्यात यशस्वी झालेल्या अपक्षांमुळे मातब्बर उमेदवारांना चांगलीच धडकी भरल्याचे चित्र आहे. शेवटच्या टप्प्यात पोहोचलेल्या रणधुमाळीत तुल्यबळ बनलेल्या काही अपक्षांमुळे पक्षीय उमेदवारांचे काय होईल, याबद्दल उत्सुकता  आहे.

महापालिकेच्या ८४ जागांपैकी एका जागेवर काँग्रेस उमेदवाराची अविरोध निवड झाली आहे. ऊर्वरित ८३ जागांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, शिवसेना, भाजप, एमआयएम, समाजवादी पार्टी, बसपा, हिंदुस्थान जनता पार्टी, लोकमान्य नवक्रांती सेना व विश्व इंडियन पार्टी अशा ११ पक्षांचे उमेदवार तसेच १०१ अपक्ष असे एकूण ३७३ जण रिंगणात आहेत. शंभरावरील अपक्षांपैकी काहींनी प्रचारात मुसंडी मारली असून त्यांच्याकडे वळणाऱ्या मतांमुळे मातबर पक्षांच्या उमेदवारांची गणिते बिघडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या दोन वर्षांपासून मूलभूत सुविधा, भ्रष्टाचार निर्मुलन,पर्यावरण आदी लोकोपयोगी क्षेत्रात चळवळ उभी करून शहरवासीयांचे लक्ष वेधून घेणाऱ्या आम्ही मालेगाव विधायक संघर्ष समितीतर्फे देवा पाटील यांना नऊ ब क्रमांकाच्या प्रभागातून रिंगणात उतरविण्यात आले आहे. पाटील यांच्या उमेदवारीमुळे ही लढत लक्षवेधी ठरली. समितीने ‘जरा हटके’ पध्दतीने चालविलेला प्रचार चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक एक ड मधील रवींद्र पवार, नऊ अ मधील ज्योती पवार, नऊ ड मधील जयश्री पवार,  अकरा क मधील चंदा महाले आदी अपक्षांनी पक्षीय उमेदवारांची अस्वस्थता वाढविली आहे.