शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांचे भाजपला आव्हान

सत्तेची लालसा शिवसेनेला नाही. सेना काय भूमिका घेते याबद्दल वेगवेगळ्या पातळ्यांवर सर्वेक्षण होत आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्यास आम्ही सत्तेतून बाहेर पडून भाजपला पाठिंबा देण्यास तयार आहोत. निवडणुकीच्या काळात स्वीस बँकेतील काळा पैसा प्रत्येकाच्या खात्यावर जमा करतो, अशी घोषणा झाली होती. त्या अनुषंगाने प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर १५ लाख जमा करावेत किंवा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, आम्ही सत्ता सोडण्यास तयार आहोत, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली.

शिवसेनेतर्फे शुक्रवारी येथील वातानुकूलित सभागृहात आयोजित कृषी अधिवेशनात शेती व शेतकऱ्यांशी संबंधित विविध विषयांवर मंथन झाले. अधिवेशनाचा समारोप ठाकरे यांच्या भाषणाने झाला. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्दय़ांवर परखड व अभ्यासपूर्ण मते मांडली होती, आता मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांची भूमिका स्वीकारली असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांचा अद्याप अभ्यास सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला. सत्तातरांद्वारे अडीच वर्षांत केवळ चेहरे बदलले असून प्रश्न तेच आहेत. शिवसेनेची बांधिलकी सत्तेशी नसून सामान्य जनता व शेतकऱ्यांशी आहे. शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे ही सेनेची भूमिका आहे. त्या दृष्टीने पुढील काळात शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत सेना शांत बसणार नाही. कृषिमालास भाव मिळत नाही. इंधन दरवाढीसह सरकारची बदलती धोरणे त्यास कारणीभूत आहेत. सध्या सरकारमध्ये शेतकऱ्यांविषयी बोलणारी दहा तोंडे आहेत. त्यामुळे कोण काय म्हणतेय ते समजत नाही. पिकांचे मापन, सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगितले जाते. त्यातून नेमकी काय माहिती येणार आहे. तूर खरेदीत घोटाळा झाल्याचे सरकार म्हणते. वास्तविक यंदा तुरीचे पीक अधिक राहील, असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता. त्याचा विचार का झाला नाही, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला. पंतप्रधानांवरही त्यांनी शरसंधान साधले. यापुढे एकतर्फी ‘मन की बात’ ऐकणार नसून शेतकऱ्यांना थेट बोलते करणार आहोत. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा काय उपयोग, नोटाबंदीचा शेतकऱ्यांना त्रास झाला. राष्ट्रीयीकृत बँकेतून काळा पैसा पुढे आला तर त्या बँका बंद करणार का? यामुळे अधिवेशनाच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत त्यांच्या व्यथा, प्रश्न मोर्चाद्वारे मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

सेना पदाधिकाऱ्यांच्या ऐश्वर्याचे दर्शन

अधिवेशनानिमित्त राज्यभरातून आलेल्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या ऐश्वर्याचे दर्शन नाशिककरांना झाले. सेनेचे सर्व मंत्री, आमदार, जिल्हाप्रमुख, उपनेते अशा पदाधिकारी अधिवेशनासाठी आले होते. अतिशय महागडय़ा गाडय़ा घेऊन ही सर्व मंडळी नाशिकमध्ये दाखल झाली. त्यातील काही मोटारींच्या किमती ५० लाखहून अधिक आहेत. आलिशान वाहने पाहून शेतकरीही अवाक्  झाले.

सालेम्हणणाऱ्यांची सालपटे सोलून काढणार

अधिवेशनात शेतकरी प्रतिनिधींनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या शब्दप्रयोगाचा समाचार घेतला होता. हा धागा पकडून ठाकरे यांनी आता शेतकरी रडणार नाहीत, तर साले म्हणणाऱ्यांची सालपटे सोलून काढणार असल्याचे बजावले.

शेतकरी गायब !

कृषी अधिवेशन शेतकऱ्यांसाठी होते. अधिवेशनात भोजनाच्या सुट्टीनंतर अध्र्याहून अधिक शेतकरी गायब झाले. यामुळे नंतरच्या सत्रात शेतकरी कमी आणि सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते अधिक अशी स्थिती होती. समृद्धी महामार्ग रद्द करण्याबाबत शिवसेनेने ठोस भूमिका घेतली नाही. पक्षप्रमुखांनी बाधित शेतकऱ्यांसोबत शिवसेना असल्याचे सांगितले. ठोस भूमिका न घेतल्याने बाधित शेतकरी अधिवेशनात अन्नत्याग करून बाहेर पडले.