महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढत असून एका घटनेत विवाहितेला विष पाजत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला तर दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. तसेच महिला वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्था भेदत मुलींना घाबरविण्याचा प्रयत्न संशयितांनी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

निफाड येथील केजीडीएम वसतिगृहात शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनी राहतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षारक्षक व मुख्य दरवाजास कडीकोयंडा लावण्यात आला आहे. मात्र ही दुहेरी सुरक्षा व्यवस्था भेदत संशयित रात्री वसतिगृह इमारतीत लोखंडी जाळी चढून गच्चीवर गेला. जिना बंद असताना ड्रेनेजच्या पाइपने खाली येत मुलींच्या खोलीत अनधिकृतपणे प्रवेश केला. अकस्मात घडलेल्या या प्रकाराने अभ्यास करणाऱ्या मुलींनी आरडाओरडा केल्यावर संशयित तेथून निसटला. या युवकाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

सुंदरपूर परिसरात संशयित सोमवंशी कुटुंबीय राहते. याच कुटुंबातील प्रियंका हिला पती दीपक, नानासाहेब (सासरा), आशा (सासू) आणि अमोल (दीर) यांनी जबर मारहाण करत जबरदस्ती विष पाजत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याआधी वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ करत आपणास उपाशी ठेवण्यात आल्याची तक्रार तिने केली आहे. प्रकृती खालावल्याने प्रियंकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिसरी घटना  येवला तालुक्यातील मुखेड येथे घडली. घर बांधण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे या मागणीसाठी सासरच्या मंडळींनी छळ करत पूजा होळकरला घरातून हाकलून देण्यात आले. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून संशयित राहुल (पती), जिजाबाई (सासू), रामचंद्र (सासरा) व अन्य नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सटाणा तालुक्यातील कौतिकपाडे येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी सटाणा येथे घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होती. त्यावेळी संशयित नानाजी ऊर्फ भावसा पवारने (३०, सटाणा) तिला दुचाकीवर सोडण्याची तयारी दर्शविली.

संशयित ओळखीचा असल्याने पीडित मुलगी त्याच्या सोबत जाण्यास तयार झाली. संशयिताने नेहमीच्या रस्त्यावरून न जाता निर्जनस्थळी नेत अश्लील हावभाव, भाषा वापरत तिचा विनयभंग केला.

तसेच घरी कोणाला काही सांगू नको असा दम देत तिला घरी सोडून दिले. या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.