पनवेल गृहघोटाळ्यातील बालाजी समूहचा मालक महेंद्र सिंग हा अखेर बुधवारी मध्यरात्री खांदेश्वर पोलीस ठाण्यात हजर झाला. ग्राहकांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक केल्याचा महेंद्रवर आरोप आहे. चिपळे, आदई, सुकापूर आणि विहीघर येथील गृहप्रकल्पांत स्वस्त घरांच्या आमिषाने सिंग याने लाखो रुपयांची रक्कम जमा केली होती. पोलीस त्याच्या मागावर होते. दरम्यान, न्यायालयात हजर करण्यात आले असता महेंद्र याला ३ मेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.
सुकापूर येथील बालाजी रेसिडेन्सी, विहीघर येथील बालाजी सिटी, आदई येथील बालाजी कलश आणि चिपळे येथील बालाजी ड्रीम सिटी या गृहप्रकल्पांचे काम अर्धवट अवस्थेत ठेवले होते. महेंद्र सिंग हा अनेक महिन्यांपासून ग्राहकांना गुंगार देत फिरत होता. याप्रकरणी ग्राहकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, बुधवारी मध्यरात्री १ वाजता सिंग पोलीस ठाण्यात हजर झाला.
मूळ उत्तर प्रदेशातील सिंग (वय ४०) याने पोलीस चौकशीत कोणाला फसवले नाही आणि फसवणार नसल्याचे सांगितले. २५ वर्षांपासून बांधकाम व्यवसायात आहोत. १२ वर्षांपासून स्वत:च्या मालकीचा व्यवसाय आहे. बांधकामाच्या ठिकाणी ग्राहकांनी पहिली तक्रार दिल्यानंतर लोकांमध्ये चुकीचा संदेश पसरवला गेला. त्यामुळे इतर बांधकामे ठप्प झाली, असेही त्याने स्पष्ट केले. गृहप्रकल्पातील बांधकाम सुरू असलेल्या चारही ठिकाणची ८० ते ९० टक्के बांधकामे पूर्ण झाली असून मला न्यायालयाने मुदत दिल्यास मी गुंतवणूकदारांना त्यांच्या हक्काचे घर देण्याची माझी तयारी असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. ज्या व्यक्तींना घर नको असेल अशांना मी त्यांची घेतलेली रक्कम परत करीन, असेही त्याने स्पष्ट केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई यांच्यासमोर त्याची चौकशी करण्यात आली. काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांनी महेंद्रच्या नाटय़मयरीत्या हजर होण्याबद्दल संशय व्यक्त केला आहे.