प्रशासनाकडून प्रस्ताव तयार; महिनाभरात अंमलबजावणी

वाशी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न महिनाभरात दूर होणार आहे. येथील घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. बाजार समितीचे उपसचिव जाधव यांनी ही माहिती दिली.  बाजार समितीच्या प्रशासने सीसीटीव्हीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यावर संपूर्ण बाजारात पाहणी  करून प्राथमिक स्वरूपात मुख्य गेट व अन्य महत्त्वपूर्ण ठिकणी कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बाजाराचा विस्तार प्रचंड असून त्यात दिवसभर मोठय़ा प्रमाणात उलाढाल होत असते. त्या तुलनेत बाजाराच्या सुरक्षेसाठी फारशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. प्रत्येक बाजारात सुरक्षारक्षक आहेत. व्यापारी असोसीएच्याशनने  काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र या १७० एकर जागेत पसरलेल्या बाजारासाठी ही सुरक्षा अपुरी ठरत आहे. सुरक्षेत वाढ करण्याची गरज आहे.

या मार्केटला जवळपास १५० वर्षांचा इतिहास आहे. वेगवेगळ्या बाजारांना एकत्र करून त्यांना नवी मुंबईत एकाच ठिकाणी जागा देण्यात आली.  फळ बाजार, धान्य बाजार, भाजीपाला बाजार, मसाला बाजार, कांदा-बटाटा बाजारअसे सगळे बाजार एकाच आवारात सुरू आहेत. या बाजारांमध्ये रोज ६ हजार गाडय़ा वेगवेगळ्या ठिकाणांहून येतात. त्यात वेगवेगळ्या प्रतीचा माल असतो.

या परिसरात लूटमार, चोरी, दरोडा तसेच  आगीच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. त्यामुळे अवैध कारभाराला लगाम बसेल, चोऱ्या दरोडय़ांचे प्रमाण कमी होईल आणि बाजारातीस सर्वच घडामोडींवर २४ तास नजर राहील, असा विश्वस व्यक्त होत आहे.

मोठय़ा प्रमाणात उलाढाली

या मार्केटच्या आवारात ३७०० गोदामे, १५०० व्यावसायिक गाळे, ४ मोठे लिलाव हॉल, ५ मोठे घाऊक बाजार यार्ड आहेत. एवढय़ा मोठय़ा बाजार समितीच्या सुरक्षेची भिस्त केवळ सुरक्षा रक्षकांवर सोपविण्यात आली होती.