रोषणाईसाठी भारतीय बनावटीच्या साहित्याला मागणी

गणेशोत्सवातील आराशीसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पावले आता बाजरपेठेत वळू लागली आहेत. भारत-चीन संबंधांतील तणावाच्या पाश्र्वभूमीवर यंदा चिनी बनावटीच्या वस्तू खरेदी न करण्याचा निर्णय अनेक ग्राहकांनी घेतला आहे आणि विजेचे दिवे, तोरणे इत्यादींच्या दुकानांत या बहिष्काराचे प्रतिबिंब उमटले आहे. चिनी बनावटीचा माल पडून राहिला असून रोषणाईसाठी ग्राहक भारतीय आणि जर्मन बनावटीच्या माळा, तोरणे आणि दिव्यांना प्राधान्य देत आहेत. अल्पजीवी असल्या, तरी स्वस्त आणि आकर्षक असल्यामुळे चिनी बनावटीच्या माळा आणि तोरणांना गणेशोत्सवाच्या  सजावटीत फार महत्त्व असे, मात्र यंदा विक्रेत्यांनी चिनी बनावटीचे साहित्य खरेदीच केलेले नाही. गेल्या वर्षीच्या शिल्लक राहिलेल्या साहित्याचे काय करायचे, असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे. यंदा बाजारात लेझर मशीन, रोप लाईट, एलईडी माळ, जेली माळ, ड्रॉप लाईट, फोकस लाईट, डमरू माळ, चेरीलाइट आशा विविध प्रकारच्या माळा उपलब्ध आहेत. यामध्ये चायना माळ ६० रुपये ते ८०० रुपये तर भारतीय आणि जर्मन माळ १०० रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत.

यंदा आम्ही चिनी बनावटीच्या वस्तूच खरेदी केलेल्या नाहीत. यंदा भारतीय व जर्मन बनावट साहित्य उपलब्ध आहे. गतवर्षीच्या उर्वरित चिनी मालालाही मागणी नाही.

विनोद पटेल, विक्रेता

चिनी मालावर बंदी आहे. भारतीय बनावटीचे साहित्य अधिक चांगले आणि टिकाऊ असते. चिनी साहित्य स्वस्त असले, तरी लगेच बिघडते. त्याची सहज मोडतोड होते. त्यामुळे आम्ही ‘मेड इन इंडिया’ला प्रधान्य देत आहोत.

अरुण देशमुख, ग्राहक