महावितरणचे अधिकारी मात्र अनभिज्ञ

गुढीपाडवा साजरा करण्याची सर्वत्र तयारी सुरू असताना सुमारे अध्र्या उरण तालुक्याला सोमवारची रात्र अंधारात घालवावी लागली. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला रात्री ११ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा तब्बल १२ तासांनी म्हणजेच मंगळवारी सकाळी ११ वाजता पूर्ववत झाला. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यासाठी असलेले दूरध्वनी आणि अधिकाऱ्यांचे दूरध्वनी नेहमीच बंद असतात, अशी माहिती या परिसरातील कार्यकर्त्यांनी दिली.

तालुक्यात उन्हाची काहिली वाढू लागली आहे. उरणमध्ये तपमानाने ४० अंशाची पातळी गाठली आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होत असताना विजेचा लपंडाव सुरूच आहे. वीज देयकांच्या रकमा वाढत आहेत. आता देयकांत १२ टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे वीज दरवाढीचा धक्का रहिवाशांना बसणार आहे. थकबाकी न भरल्यास कारवाईही होत आहे. असे असताना दुसरीकडे अनियमित वीज पुरवठय़ाचा प्रश्नही कायम आहे. उरण तालुक्यातील जासई, धुतूम, रांजणपाडा, चिर्ले, गावठाण, जांभूळपाडा, दादरपाडा, वेश्वी, दिघोडे, कंठवली,बोरखार, धाकटीजुई, भोम, विंधणे, भोम, चिरनेर, कळंबुसरे, मोठीजुई, कोप्रोली, पाणदिवे, पिरकोन, आवरे, वशेणी, गोवठणे, आवरे या गावातील वीज नेहमीच सणाच्या वेळी गायब होते.

पूर्व विभागातील टाकी भोम गावातील सामाजिक कार्यकर्ता अनुज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार वीज गायब झाल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांशी व कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र नेहमीप्रमाणे त्यांचे फोन बंद होते. महावितरणचे अतिरिक्त अभियंता प्रवीण साळी यांच्याशी संपर्क साधला असता वीज गेल्याचे आम्हाला माहीत नाही. तसे असल्यास माहिती घेऊन सांगतो, असे सांगण्यात आले.