उरण पोलिसांच्या मंडळांना सूचना
गोकुळाष्टमी ते गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक उत्सव मंडळांनी कायद्याचे पालन करूनच तो साजरा करण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. उरण पोलिसांची यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. गोकुळाष्टमीनंतर दहीहंडी फोडण्यासाठी चार थरांना परवानगी देण्यात आली आहे. याच वेळी उच्च आवाजाचे क्षेपण करणारे डॉल्बी, तसेच वाद्य, ध्वनिवर्धकांच्या आवाजावर मर्यादा आणण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यंदा ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांची करडी नजर राहणार आहे. सणांदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाईचेही संकेत देण्यात आले आहेत.
दहीहंडी व त्यातील थरांचा वाद उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. त्यानंतर सणात उत्सवी मंडळांकडून केल्या जाणाऱ्या कायद्यांच्या उल्लंघनामुळे सर्वसामान्यांना त्रास होत असल्याची दखल घेत न्यायालयाने कायद्याचे पालन करीत अपघात टाळण्यासाठी थरांची मर्यादा वीस फुटांवर आणली आहे. त्यामुळे उत्सवी मंडळे तसेच काही राजकीय पक्षांनी आगपाखड केली आहे. असे असले तरी या निर्णयांचे अनेकांनी स्वागतही केले आहे. सण व त्यातील नैसर्गिक स्पर्धाना आता इव्हेंट आणि बाजारीकरणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे कायद्याचे पालन करावे अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाऊ लागली आहे. उरण पोलिसांनी तालुक्यातील दहीहंडी मंडळ तसेच आयोजकांची बैठक घेऊन कायद्याचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी खास योजना आखण्यात आली असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद आव्हाड यांनी दिली. या दिवशी सर्वत्र ध्वनितपासणी यंत्र, थर यांच्याकडे लक्ष देऊन तातडीने कारवाई केली जाईल, असे मतही त्यांनी या वेळी बोलतांना व्यक्त केले. तसेच शहर व तालुक्यात सण शांततेत साजरे करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचेही आवाहन त्यांनी केले.