जेएनपीटीमधील चौथ्या बंदराच्या शिलान्यासासाठी येथे रविवारी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान त्यांच्या स्वागताचे व निषेधाचे नाटय़ चांगलेच रंगले. जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांचा साडेबारा टक्केचा प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी करीत प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन केले. भाजपा वगळता सर्वपक्षीय संघर्ष समितीने करळ फाटा येथे काळे झेंडे लावून पंतप्रधानांचा निषेध केला, तर भाजपने जेएनपीटी परिसरातील पीयूबी येथे सभा घेऊन पंतप्रधानांचे जाहीर स्वागत करीत निषेधाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधान मोदींचा निषेध करण्यात शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार मनोहर भोईर, सचिव आदेश बांदेकर, जिल्हाप्रमुख दिनेश पाटील हे सहकारी पक्षाचे लोकप्रतिनिधी सहभागी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे, तर शेकापचे माजी आमदार विवेक पाटील, महादेव घरत, काँग्रेसचे श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, मनसेचे अतुल भगत, उत्कर्ष समितीचे गोपाळ पाटील यांच्यासह कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
दुसरीकडे भाजपने माजी खासदार रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे नगरसेवक महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांच्या स्वागतासाठी दोनशेपेक्षा जास्त तरुणांची मोटर सायकल रॅली काढून पीयूबीजवळ सभा घेतली. या दोन्ही कार्यक्रमांदरम्यान शांततेचा भंग होऊ नये, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
सकाळी करळ फाटा येथे सर्वपक्षीय संघर्ष समितीने मोदींच्या निषेधार्थ लावलेले काळे झेंडे पोलिसांनी हटविले. मात्र दुपारी निषेधासाठी आलेल्या प्रकल्पग्रस्तांनी काळ्या झेंडय़ांसह दाखल होऊन त्याला उत्तर दिले. मोदींच्या हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने उड्डाण केल्यानंतर पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.