राज्यात निर्माण झालेली दुष्काळजन्य स्थिती आणि शहरी भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील कमी पाण्याचा साठा यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांनी पाणीकपात करण्यास सुरुवात केली आहे. त्याची सुरुवात एमआयडीसीने केली असून नवी मुंबईतील औद्योगिक पट्टय़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाण्यावर ४८ तासाचे र्निबध टाकण्यात आले आहे. नवी मुंबई पालिकेच्या खालापूर येथील मोरबे धरणाचा पाणीसाठा केवळ ५५ टक्के शिल्लक राहिल्याने येत्या माहिनाअखेर पालिकाही २५ टक्के पाणी कपात करणार असल्याचे समजते. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचा सल्ला पालिकेने दिला असून दुभाजकांच्या मधील वृक्षसंपदेसाठी वापरण्यात येणारे पिण्याचे पाणी बंद करून सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले सीईटीपीचे पाणी टँकरने पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नवी मुंबईला एकूण ४२० दशलक्ष लिटर पाणी लागत असून त्याची गरज पालिकेच्या मोरबे व एमआयडीसीच्या बारवी धरणातील पाण्याने भागवली जाते. एमआयडीसीने बारवी धरणातील पाण्यात वीस टक्के कपात करण्याचा निर्णय घेतल्याने नवी मुंबईत येणारे पाणी दर बुधवारी रात्री बारा वाजता बंद होणार असून शुक्रवारी रात्री बारा वाजता पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे ४८ तास एमआयडीसीतील गावे, झोपडय़ा आणि कारखाने यांना पाण्यावाचून राहावे लागणार आहे. या दरम्यान पालिका येथील नागरी वसाहतींना टँकरने पाणीपुरवठा करणार आहे. नवी मुंबईसारख्या सायबर सिटीत ऐन नोव्हेंबर महिन्यात पाण्याचे टँकर लोकवस्तीतून फिरताना दिसणार आहेत. नवी मुंबईतील औद्योगिक पट्टय़ात गेल्या वीस वर्षांत इतक्या लवकर करावी लागणारी ही पहिलीच पाणीकपात आहे. एमआयडीसीनंतर नवी मुंबई पालिकेच्या नागरी वसाहतीत पुढील महिन्यापासून ही पाणीकपात होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईला जास्तीत जास्त पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील जलसाठा आजच्या घडीला केवळ ५५ टक्के आहे. आता सुरू असलेल्या पाणीपुरवठय़ाप्रमाणे पालिकेने पाणीपुरवठा केल्यास हा जलसाठा मार्च महिन्यातच संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ती नवी मुंबईसाठी धोक्याची घंटा आहे. २४ तास मुबलक पाण्याची सवय झालेल्या नवी मुंबईकरांना हा मोठा झटका ठरणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून पालिका क्षेत्रातील पाणी जपून वापरण्यासाठी २५ टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय पालिका घेणार असल्याचे खात्रीलायक समजते. ही २५ टक्के कपात केल्यास पुढील वर्षांतील पावसापर्यंत अर्थात जुलैपर्यंत मोरबे धरणातील पाणी नवी मुंबईकरांना पुरण्याची शक्यता आहे.
पाण्याची बचत करण्याच्या दृष्टीने पालिकेने अनेक उपाययोजना केल्या असून सोशल मीडिया व जनजागृती करणाऱ्या फलकांचा खुबीने वापर केला आहे. तरीही नवी मुंबईकर त्याबाबत गांभीर्याने घेताना दिसत नाही. गाडय़ा धुण्यासाठी पाइपचा वापर करणाऱ्या शेकडो रहिवाशांचे पाइप जप्त करण्याची कारवाई मार्निग स्कॉडला करावी लागली आहे तर पाणी जपून वापरा तुमचे बिल जास्त येत आहे, अशी तंबी ४५० सोसायटय़ांना नोटिसा काढून द्यावी लागली आहे. गाडय़ा पाण्याने धुण्याबरोबरच टेरेस, बाल्कनी, थेंब थेंब नळ सुरू ठेवणाऱ्या रहिवाशांवर कारवाई करण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत. (रात्रभर थेंब थेंब नळ सुरू ठेवल्यास एक बादली सकाळी भरत असून ही एक बादलीदेखील दुष्काळग्रस्त बांधवांच्या नशिबी काही जिल्हय़ात नाही) ग्रामीण व झोपडपट्टी भागात घरी नळ नसलेल्या रहिवाशांसाठी सार्वजनिक नळ योजनेद्वारे नळपोस्ट देण्यात आले आहेत. त्या नळांकडे दुर्लक्ष केल्याने धो-धो पाणी वाहणाऱ्या नळपोस्टांना पालिकेने सील ठोकले आहे. पालिकेने मोरबे धरणावर कपातीचा निर्णय घेतल्यास नवी मुंबईकरांना २४ तास पाण्याचे स्वप्न काही काळापुरते विसरावे लागणार असून दिवसातून दोन वेळा येणाऱ्या पाण्याचा आनंद घ्यावा लागणार आहे.

वृक्षसंपदा जगविण्यासाठी प्रक्रियायुक्त सांडपाण्याचा वापर
याशिवाय पालिका रस्ता दुभाजकांच्या मध्ये लावण्यात आलेल्या झाडांना पाणी शिंपण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करीत होती. त्यासाठी त्या ठिकाणी नळजोडण्या देण्यात आलेल्या आहेत. जलसंपन्न पालिकेची ही मस्ती अनेकांच्या नजरेत येणार होती. मोरबे धरणातील पाण्याचा कमी साठा पाहता पालिकेने या दुभाजकांवरील वृक्षसंपदा जगवण्यासाठी उशिरा का होईना, सांडपाणी केंद्रावर प्रक्रिया होणारे पाणी टँकरद्वारे देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पालिकेच्या उद्यानात टँकरने पाणी पुरवठा करता येणार नसल्याने त्या ठिकाणी पालिकेच्या जोडणीद्वारे पिण्याचे पाणी देणे अद्याप कायम ठेवण्यात आलेले आहे. त्यावरही लवकरात लवकर उपाययोजना करावी लागणार आहे.