रायगड जिल्ह्य़ातील मुरुड बीचवर पुण्याच्या महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेला तीन महिने उलटल्यानंतरही सागरी किनाऱ्यावर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावरच सोडण्यात आलेली आहे. तर अशा घटना टाळण्यासाठी शासनाकडून दहा वर्षांपूर्वी काढण्यात आलेल्या शासकीय आदेशाची अमंलबजावणी न होता ती कागदावरच राहिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा घटना घडल्यानंतरच प्रशासन आणि यंत्रणेला जाग येईल का असा सवाल पर्यटकांकडून केला जात आहे.
सध्या शाळांना सुट्टी लागली असून उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना समुद्रकिनाऱ्यावर आनंद लुटण्यासाठी पालक घेऊन जात आहेत. तसेच तरुणाईही समुद्रात पोहून बीचवरील मजा लुटत आहे. १ फेब्रुवारी २०१६ ला अशाच प्रकारची पुण्यातील महाविद्यालयातील विद्यार्थी सहलीला आलेले होते. त्यांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर अनेक चर्चा होऊन सागरी किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याच्या घोषणा करण्यात आलेल्या होत्या.
या संदर्भात पर्यटन विभागाने २००६ मध्येच शासनादेश काढला आहे. यामध्ये समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवनरक्षक, जीवरक्षक टय़ूब, जॅकेट, सर्च लाइट, संपर्क करणारी साधने, गस्तीसाठी वाहन, टेहळणी मनोरे, रात्रीच्या वेळी किनाऱ्यावर विजेची व्यवस्था, सुरक्षेची माहिती देणारे मार्गदर्शक नेमणे, धोक्याची सूचना देणारे फलक लावणे, जागेची माहिती देणारे नकाशे आदी सूचना करण्यात आल्या आहेत.
आवश्यकतेनुसार जीवनरक्षकांची नेमणूक करणे, मोठय़ा पोहण्याच्या जागी संरक्षक जाळी लावणे, वाहनांसाठी वाहनतळ ठरवून देणे, किनाऱ्याची स्वच्छता करण्याची व्यवस्था करावी,अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत. याकरिता स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका,ग्रामपंचायत, पंचायत समिती यांनी याकरिता निधी उलपब्ध करून देण्याचीही सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र असे असले तरी उरणमधील पिरवाडी बीचवर यापैकी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या मे महिन्याच्या सुट्टीत येणाऱ्या व वाढलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे धोका वाढला आहे. यासाठी पोलिसांची गस्त अधिक वाढविण्यात येणार असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येऊन पर्यटकांना सूचना देण्यात येतील असे मत उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. तर सागरी सुरक्षेच्या सूचना देण्यासाठी पिरवाडी येथील स्थानिकांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांनी दिली.