निवडणूक जिंकायचीच या ध्यासाने दोन महिने धावपळ केल्यानंतर उमेदवार गुरुवारी विश्रांती घेण्याऐवजी मतमोजणीची पूर्वतयारी करण्यात गर्क होते. प्रत्येक बुथवर नेमके किती मतदान झाले, याची आकडेवारी घेण्यासाठी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते गुरुवारी झटत होते.

शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडी भारतीय जनता पक्षाचा विजयरथ पनवेलमध्ये थांबवू शकेल का, यावर पनवेलच्या चौकाचौकांत व घराघरांत चर्चा रंगल्या होत्या. कार्यकर्त्यांना सुट्टी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आपल्याला साधारण किती मते मिळाली असतील, याचा घेण्याची जबाबदारी उमेदवारांनी मर्जीतील कार्यकर्त्यांवर टाकल्यामुळे  पक्ष कार्यालयांत मतदानापूर्वी होत असलेले आदरातिथ्य काहीसे लोप पावल्याचा अनुभव कार्यकर्त्यांना आहे.

निवडणूक झाली तरी पक्षबांधणीचे काम सुरूच आहे. अडीच वाजता खारघर येथील मध्यवर्ती शाखेत आलो. चार वाजता शिवसेनेच्या उमेदवारांची बैठक घेतली. त्यामध्ये मतदानाच्या आढावा घेतला, उद्याच्या मतमोजणीचे नियोजन केले. शिवसेना हे एक कुटुंब आहे. यशापयश सुरूच राहते. लवकरच पनवेलचे नवीन शिलेदार शिवसेना वाढविताना नागरिकांचे प्रश्न सोडविताना दिसतील.

– आदेश बांदेकर, शिवसेना

रोजच्या तुलनेत आज ताण कमी होता. आज सकाळी नऊ वाजता कार्यालयात आलो. पक्षश्रेष्ठींनी उमेदवारांची बैठक बोलावली होती. कोणत्या बुथवर किती मतदान झाले, याची आकडेवारी काढण्याचे काम सुरू होते. दुपारनंतर कुटुंबासोबत थोडा वेळ घालवला आणि त्यानंतर पुन्हा उद्याचे नियोजन करून दिले. विश्रांतीचा प्रश्नच नाही. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना खासगी आयुष्य नसते. प्रभाग हेच आमचे कुटुंब!

– संदीप घरत (शेकाप)

रोजप्रमाणे आजही महिला कार्यकर्त्यां घरी आल्या आणि दिवस सुरू झाला. कार्यकर्त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. आईने निवडणुकीसाठी सुट्टी घेतली होती. तिनेही आजपासून कामावर जाण्यास सुरुवात केली. दुपारनंतर मीसुद्धा माझ्या वैयक्तिक कामांना वेळ दिला. उद्याच्या निकालाची अजिबात चिंता नाही. मतदारांचा कौल मतदानयंत्रात कैद झाला आहे. माझ्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सगळ्यांमुळेच मला माझी भूमिका सामान्यांसमोर मांडता आली.

– श्रुती म्हात्रे (काँग्रेस)

काल मतदान झाल्यानंतर कार्यकर्त्यांना बोलावून त्यांनी दोन महिने घेतलेल्या श्रमांबद्दल धन्यवाद व्यक्त केले. रोज सकाळी नऊ वाजता कार्यालयात हजर राहावे लागत होते. आज त्यात थोडी मोकळीक मिळाली. आईच्या हातचा वरणभात खूप दिवसांनी खाल्ला. परीक्षा दिल्यानंतर निकालाची जशी उत्सुकता असते, त्याप्रमाणे माझ्यावर थोडे दडपण आहे.

– शिवानी घरत (राष्ट्रवादी काँग्रेस)

कार्यालयात गेलो. कार्यकर्त्यांशी चर्चा केली. कोणत्या बूथवर किती मतदान झाले याची चाचपणी सुरू होती. दुपारनंतर कुटुंबीयांसोबत थोडा वेळ घालवला. सायंकाळी पुन्हा प्रभागामध्ये काही कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. निवडणुकीदरम्यान जनतेने अपेक्षेपेक्षा जास्त सहकार्य केले.

– रामदास शेवाळे (भाजप)