सोडतीतील भाग्यवंतांना गृहोपयोगी वस्तू

रथसप्तमीला महिना उलटल्यानंतर भारतीय जनता पक्षाने हळदीकुंकू समारंभ आयोजित केल्यामुळे पक्षाने निवडणुकींचे व्रत घेतल्याची चर्चा शहरात आहे. समारंभ अधिक आकर्षक करण्यासाठी आयोजकांनी टीव्ही, फ्रीज, विजेवर चालणारी शेगडी, अन्न गरम करण्यासाठीचे उपकरण, घडय़ाळ, मिस्कर कूकर अशा वस्तूही सोडतीतील भाग्यवंतांना देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. कळंबोली येथील प्रभाग क्रमांक ७ मधील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी विद्यालयाच्या मैदाना ४ मार्चला हा सोहळा होणार आहे. विशेष म्हणजे आयोजकांनी या सोहळ्याची छापिल आमंत्रणेही घरोघरी पोहोचवली आहेत.

पनवेल महापालिकेच्या पहिल्या सभागृहात जागा पटकावण्याची शर्यत सध्या पनवेल परिसरात रंगली आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून प्रत्येक संधीवर डोळा ठेऊन आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी मकरसंक्रातीला वाणाच्या स्वरूपात घडय़ाळ घरोघरी पोहोचवले होते. त्यामुळे कळंबोली वसाहतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या युवामोर्चाचे अध्यक्ष अमर पाटील यांनी सार्वजनिक हळदीकुंकू सोहळा आयोजित करून महिलावर्गाला आकर्षित केले आहे. प्रभाग क्रमांक सातमधील प्रत्येक महिला मतदारांला निमंत्रणाचा लिफाफा पोहचवण्याची व्यवस्था केली आहे. संक्रांतीनंतर महिनाभराने हळदीकुंकू होत असल्यामुळे निवडणुकीची नांदी मतदारांना ऐकू येऊ लागली आहे.

कळंबोली वसाहतीमध्ये हळदीकुंकू समारंभाच्या नियोजनाची माहिती मला नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असावा. अनेकदा महिलांना एकत्रित आणून विचारांची घेवाण-देवाण करण्यासाठी हळदीकुंकवाचे सोहळे  होतात. यामागे  राजकीय हेतू नाही.

रामशेठ ठाकूर, माजी खासदार, भाजप नेते