वाहनावर बनावट नंबरप्लेट लावून दोन वेगवेगळय़ा वाहनांची बनावट कागदपत्रे बाळगणाऱ्या तरुणाला कोपरखरणे पोलिसांनी अटक केली आहे. रमाशंकर सिंग असे या आरोपीचे नावे असून पोलिसांनी या तरुणाच्या ताब्यात असलेली इनोवा कार तसेच दोन वाहनांची बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत.
कोपरखरणे पोलिसांकडून बुधवारी दुपारी घणसोली भागात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू होती. या वेळी पोलिसांनी कोपरखरणेच्या दिशेने जाणारी डीएल ६ सीएल ४४०१ या क्रमांकाची गाडी अडवून तिच्या कागदपत्रांची तपासणी केली असता डीएल ६ सीजे ४४०१ या क्रमांकाची पीयूसी, विम्याची कागदपत्रे आढळून आली. त्या वेळी चालक रमाशंकरला ताब्यात घेऊन वाहनाची कसून तपासणी केली असता गाडीत एमएच ०४ सीपी ९९४० या क्रमांकाच्या गाडीचे आरसीबुक, विमा, परवाना आदी बनावट कागदपत्रे आढळली. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २८ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

 
कर्जदारांना लुबाडणाऱ्या चौकडीविरोधात गुन्हा दाखल
प्रतिनिधी, नवी मुंबई;
बँकेकडून कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देऊन गरजू नागरिकांकडून प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली लाखो रुपयांची रक्कम उकळून त्यांची फसवणूक करणाऱ्या संतोष कांबळी आणि त्याच इतर तीन साथीदारांवर कोपरखरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौकडीविरोधात १८ लाख रुपये उकळल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी या चौकडीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या चौकडीविरोधात यापूर्वी फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल झाले आहेत.
संतोष कांबळी, किशोर गायकवाड, तेजस जाधव आणि नितेश सोनवणे अशी या चौघांची नावे असून यातील संतोष कांबळी आणि किशोर गायकवाड कर्ज मिळवून देण्याची जाहिरातबाजी करीत असत. कर्ज मिळवण्यासाठी प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली हे सर्व जण १ ते २ लाख रोख रक्कम उकळत असत. अशा प्रकारे या चौकडीने अनेकांकडून लाखो रुपयांची रक्कम उकळली. फसवणूक झालेल्या काही नागरिकांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या चौकडीचा शोध सुरू केला आहे.