उरण तालुक्यात विविध विकासकामे सुरू असून, त्यात मातीच्या भरावाचे काम जोमाने सुरू आहे. या भरावासाठी उरण पूर्व विभागातील सारडे व वशेणी या दोन गावांतील डोंगर परिसरातून मातीचे डंपर ये-जा करीत आहेत. वाहतूक नियम डावलून होणाऱ्या मातीच्या वाहतुकीमुळे माती व दगड हमरस्त्यात विखुरले गेल्याने या रस्त्यात पसरलेल्या मातीमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील महिनाभरापासून या रस्त्यावर मातीचे असे ढीग पडल्याने येथील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
या संदर्भात उरण सामाजिक संस्थेचे व पेण येथील विनोबा भावे आश्रमाचे कार्यकर्ते विलास गावंड यांनी ३१ मार्च रोजी सारडे वशेणी रस्त्यावरील मातीच्या भरावाचा फोटो काढला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा बुधवारी (२७) लाही त्याच जागेचा फोटो काढला आहे. या दोन्ही फोटोतील माती कायम आहे. त्यामुळे मातीचा भराव करण्यासाठी डंपरवर वाहतुकीवर नियंत्रण करणाऱ्या विभागाचे, कंत्राटदारांचे तसेच वाहनचालकांचेही दुर्लक्ष स्पष्ट होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या अपघाताला कारण ठरणारे हे मातीचे ढीग त्वरित हटविण्याची मागणी गावंड यांनी केली आहे. या संदर्भात उरण वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर जगताप यांच्याशी संपर्क साधला असता अशा वाहनांवर विभागातर्फे कारवाई केली जात असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच रस्ते विभागाला सूचना देऊन लवकरात लवकर माती हटविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.