* अवैध प्रवासी वाहतूक करणारी इको व्हॅन सेवा बंद
*  रोडपाली ते खारघर रेल्वेस्थानक थेट बससेवा सुरू करण्याची मागणी
दिवाळीपूर्वी अवैध प्रवासी वाहतुकीवर पनवेलच्या प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे रोडपाली नोड ते खारघर रेल्वेस्थानक या दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणारी इको व्हॅन सेवा बंद पडली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेने पोलीस मुख्यालय ते मानसरोवर रेल्वेस्थानक अशी बससेवा या परिसरात सुरू केली आहे, मात्र ती इच्छित स्थळी उशिराने पोहोचत असल्याने प्रवाशांना तिचा उपयोग होत नाही. नवी मुंबई पालिका परिवहनची अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्याची कार्यतत्परता रोडपाली ते खारघर रेल्वेस्थानक या पल्ल्यावर थेट बससेवा सुरू करण्यातही दाखवावी अशी मागणी प्रवाशांनी आरटीओकडे केली आहे.
रोडपाली नोड येथील पोलीस मुख्यालयाच्या पोलिसांना बेलापूर गाठण्यासाठी करावी लागणारी परेड पाहता त्याची गंभीर दखल घेऊन अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एनएमएमटी प्रशासनाने पोलीस मुख्यालय ते मानसरोवर रेल्वेस्थानक ही बससेवा सुरू केली. मात्र ही बससेवा मोठय़ा विलंबाची ठरत आहे. सात मिनिटांचा प्रवासास ही बस ३५ मिनिटे घेत असल्यामुळे प्रवाशांनी खारघर व बेलापूरला जाण्यासाठी अवैध प्रवासी वाहतुकीचा आसरा घेतला आहे. तीन आसनी रिक्षाचालकांकडून येथे मनमानी भाडे आकारण्यात येते. कळंबोली वसाहतीमध्ये रिक्षा मीटरप्रमाणे चालवत नाहीत. त्यावर आरटीओ विभागाचे अधिकारी कोणतीच कारवाई करत नाहीत, अशी प्रवाशांची तक्रार आहे. इको व्हॅन सेवा ही परवडणारी असल्याने प्रवाशांनी तो मार्ग पत्करला होता. मात्र आरटीओच्या इको व्हॅनवरील कारवाईमुळे प्रवाशांना परवडणारी सोय दिवाळीपासून बंद झाली आहे.
रात्रीच्या वेळी या मार्गावर पथदिवे नसल्याने नोकरीवर जाणाऱ्या महिला व ज्येष्ठांचे हाल होत आहेत. प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. मात्र कोणतीही प्रवासी संघटना या प्रवाशांच्या पाठीमागे उभी राहिली नाही, याची खंत प्रवाशांना आहे.

पर्याय म्हणून जीवघेणे प्रवास मार्ग
पाच आसनी प्रवासी क्षमता असलेल्या इको व्हॅनमध्ये तब्बल दहा प्रवासी कोंबले जात असत. रोडपाली नोड ते खारघर रेल्वेस्थानक इको व्हॅनचालक प्रतिप्रवासी दहा रुपये भाडे आकारत होते. ही सोय जिवघेणी असली तरी ती परवडणारी असल्याने प्रवाशांनी तो पर्यायी मार्ग स्वीकारला होता. याच मार्गावर तीन आसनी रिक्षा ८० रुपये भाडे आकारतात. रोडपाली नोड ते पुरुषार्थ पंपापर्यंत पोहोचण्यासाठी हेच भाडे ४० रुपये घेतले जाते. या मार्गावर तीन आसनी रिक्षाचालकांनी ८ रुपयांमध्ये भागीदारी पद्धतीने भाडे आकारणी सुरू करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. तीन आसनी रिक्षासंघटनांच्या प्रतिनिधींनी आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे आरटीओने आपली स्वच्छ प्रतिमा जपण्यासाठी इको व्हॅनचालकांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना रोडपाली नोड ते पनवेल सायन महामार्गावरील पुरुषार्थ पेट्रोलपंपाच्या थांब्यापर्यंत बस पकडण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.

डेपो आहे, पण बसेस नाहीत
सिडकोने रोडपाली नोड येथे भव्य बसडेपोची उभारणी केली. मात्र याच परिसरात बससेवेची कमतरता आहे. येथील प्रवाशांना खारघर व बेलापूर गाठण्यासाठी कळंबोली वसाहत, स्टीलमार्केट, कळंबोली सर्कल, एमजीएम रुग्णालय कामोठे, कामोठे वसाहतीमधून मानसरोवर गाठावे लागते. त्यानंतर मानसरोवर रेल्वेस्थानकातून खारघर व बेलापूर रेल्वेस्थानकात जाण्यासाठी लोकल पकडावी लागते. हा द्राविडीप्राणायाम निव्वळ आरटीओ व एनएमएमटीच्या समन्वय नसल्याने व नियोजनाच्या अभावामुळे सामान्य प्रवाशांच्या नशिबी आला आहे.

आरटीओ विभागाने रोडपालीसह संपूर्ण पनवेलमधील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात कारवाई केली आहे. या कारवाईमुळे काही ठिकाणी प्रवाशांची गैरसोय झाली असल्यास, लवकरच त्या परिसरात संबंधित बससेवा देणाऱ्या प्रशासनाशी समन्वय साधून तेथे प्रवाशांच्या मागणीप्रमाणे नवीन बससेवा सुरू करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू.
-अरुण येवला, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल