वाहतूक पोलिसांची मोहिम परिणामशून्य

बेदरकार चालकांना निदान रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या काही दिवसांत शहाणपण येईल, हे वाहतूक शाखा पोलिसांचे स्वप्नही अधुरे राहिल्याचे पुरावे शहरात ठिकठिकाणी छोटय़ामोठय़ा अपघातांनी दिले आहेत.
कितीही शिकवा, आम्ही सुधारणार नाही, असा उलट संदेश वाहनचालकांनी पोलिसांना दिला आहे. गेले पंधरा दिवस रस्ते सुरक्षा अभियान सुरू आहे. यात सर्वच वाहनचालकांना अपघात टाळण्यासाठीची माहिती सचित्र देण्यात आली; परंतु त्यातील अनेकांनी चित्रे पाहिली आणि माहिती डोक्यातून काढून पुन्हा बेशिस्तीचा रस्ता धरला आहे. यात दुचाकीस्वार आघाडीवर आहेत. ते सर्रास दुचाकी बेदरकारपणे चालवत आहेत. सिग्नल तोडण्याच्या घटनांमध्ये वाढ आहेच, पण प्रवासात दुचाकीवर मोबाइलवर बोलण्याची एकही संधी बेशिस्तांनी सोडलेली नाही. याशिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये भरधाव दुचाकी चालवणे वा स्टंट करण्याची चढाओढ लागली असल्याचे निरीक्षण वाहतूक विभागाच्या पोलिसांनी नोंदवले आहे.
शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या खासगी गाडय़ांनी तर कहर केला आहे. ऑटोरिक्षा तसेच इतर तीन किंवा चार चाकी वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरश: कोंबून शाळेत नेले जात आहे. शाळा महाविद्यालय परिसरात विद्यार्थी बेफिकिरीने दुचाकी चालवत आहेत. वाहतूक पोलिसांच्या कारवाईने काहीजण वठणीवर येतील, अशी अपेक्षा मध्यंतरी होती; परंतु त्यालाही काही नियम उल्लंघणाऱ्या बहाद्दरांनी दाद दिलेली नाही. अशा न बधणाऱ्या चालकांविरोधात आता अधिक कडक कारवाई हाती घेण्याची वेळ आल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
जानेवारी ते डिसेंबर २०१५ पर्यंत वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या ९६८८ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून १ कोटी ७७ लाख ७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे,
नवी मुंबईत वाहने पार्किंगसाठी रस्त्याच्या बाजूला सम-विषम पार्किंगसाठीच्या पाटय़ा लावण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानकाबाहेर ‘पे अँड पार्क’ची योजना करण्यात आली असताना वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वर्षभरात कारवाईमधून १ कोटी ७७ लाख ७ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. अवैध प्रवासी वाहतूक, लायसन्स न हाताळणे, नो पार्किंमध्ये गाडी पार्किंग करणे, इंग्रजी, मराठी फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा वापरणे, विनाहेलेम्ट दुचाकी चालवणे आदी नियम तोडणाऱ्यावर वाहतूक पोलिसांवर कारवाई करण्यात आल्या आहेत. वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसाकडून सुरक्षा अभियानच्या माध्यामातून जनजागृती करण्यात येते. पंरतु वाहनचालक यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर येत आहे. हेल्मेटविषयी मोटारसायकलस्वरांमध्ये मोठय़ा प्रमाणात उदासीनता असल्याचे निदर्शनास आले असून हेल्मेट न घालणाऱ्यांवर वर्षभरात ५५ हजार ७२९ दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली असून ५१ लाख १५ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे, तसेच पार्किंगचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर ७० हजार ७५६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. काळ्या काचा लावणाऱ्यावर ३४८५ जणांवर कारवाई करण्यात आली असून बिगर लायसन्स वाहन चालवणाऱ्या ९६८८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती वाहतूक पोलीस उपआयुक्त अरविंद साळवे यांनी दिली.