तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्याच्या आजच्या वृत्तानंतर मुंढे यांना जोरदार समर्थन देणारे संदेश शुक्रवारी दिवसभर समाजमाध्यमांवर फिरत होते. मुंढे यांचे नागरिकांशी असलेल्या संवाद नात्यामुळे अनेक तरुण-तरुणींनी पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे.

अनेकांनी व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक आणि अन्य माध्यमांवरून नवी मुंबईकरांनी बेलापूर येथील महापालिका मुख्यालयासमोर जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अविश्वास ठरावावरून समाजमाध्यमांवर सर्व बाजूंनी चर्चा करण्यात येत होती. मुंढे हे जर भ्रष्ट आणि लबाड राजकारण्यांना पुरून उरणार असतील तर त्यांना पाठिंबा देणे हे प्रत्येक नवी मुंबईकराचे कर्तव्य असल्याचे म्हटले आहे. प्रत्येकाने एकजुटीने सत्ताधाऱ्यांचा हा कुटिल उधळवून लावण्याचे आवाहन अविश्वास दाखवणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांवर बरखास्तीची कारवाई करण्यासाठी एकजुटीचा प्रयत्न नागरिकांकडून होत आहे.

यासाठी २५ ऑक्टोबरला मुख्यालयाबाहेर जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेचा व्हॉटस अ‍ॅप आणि फेसबुकवर या पोस्ट पसरल्या आहेत.

राजकारण्यांना मुंढेंची भीती का?

*  एक हजार कोटी रुपयांचा मालमत्ता विभागातील घोटाळा झाकण्यासाठी आयुक्तांची बदली करण्याचा डाव.

*  बेकायदा बांधकामे, खोटी प्रमाणपत्रे यामुळे २५ नगरसेवक बडतर्फ होण्याची भीती.

* ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या मार्बलची निविदा रद्द केल्याने नाराजी.

* पाणीमीटरची सक्ती करण्याच्या निर्णयामुळे माफियांना धास्ती.

*  नगरसेवक निधीतील फुटकळ कामांना कात्री लावल्याने आर्थिक कोंडी.

विरोधामागे प्रत्यक्ष सांगितली जाणारी कारणे

* अधिकारी, कर्मचाऱ्यांना कडक वागणूक

* नगरसेवकांना भेट देत नसल्याचा आरोप

* वाशीतील ‘ईटीसी’ केंद्रातील गैरव्यवहाराची पाठराखण.

* सहा महिन्यांत नवीन प्रकल्प नाही

* व्यापारी, प्रकल्पग्रस्तांच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करत असल्याचा आरोप.

आयुक्तांवर अविश्वासाचा ठराव आणणे हे चुकीचे आहे. आयुक्त अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. बेकायदा बांधकामे, फेरीवाले आणि अतिक्रमणांवर त्यांनी अंकुश ठेवला आहे. पालिकेचे आधिकारी सर्वसामान्यांची काम लक्ष देऊन करीत आहेत. नगरसेवकांकडे त्यासाठी खेटे घालावे लागत नाही. त्यामुळे नगरसेवकांनी आयुक्तांच्या वर आणलेला अविश्वासाचा ठराव चुकीचा आहे.

 -सागर कांबळे, नागरिक

आयुक्त तुकाराम मुंढे शिस्त लावत आहे. पालिकेतील भ्रष्टाचार त्यांनी निपटून काढण्याचे ठरविले आहे. नवी मुंबईचा विकास करायचा असेल तर तुकाराम मुंढे सारखेच आयुक्त पाहिजे. 

-दीपक शिंदे , नागरिक