जिल्हाधिकाऱ्यांमुळे वहाळमध्ये विजयोत्सव
रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले-तेली यांनी वहाळ ग्रामपंचायतीच्या महिलांनी दारूबंदी ठरावाची समस्या मांडताच, प्रत्येक कुंटुबाला भेडसावणाऱ्या या गंभीर प्रश्नाची तड लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:हून पुढाकार घेतला. वहाळमधील महिलांचे जनमत घेण्याच्या सूचना दिल्याने गावातील दारूबंदीच्या निर्णय अमलात आणण्यास मदत झाली. सोमवारी सायंकाळी निवडणूक अधिकाऱ्यांनी गावातील जिल्हा परिषदेच्या विद्यालयात दारूबंदीचा निकाल जाहीर झाला आणि ही घटना वहाळमधील महिलांसाठी गावात जणू विजयोत्सवच ठरला.
पनवेल आणि उरण तालुक्यातील दगडखाण मालकांनी डोंगर फोडून त्यातून नैसर्गिक साधनसंपत्ती मिळविताना सरकारचा महसूल बुडविल्याचा आरोप केला. गेल्या ३० वर्षांत जिल्हाधिकारी उगले यांच्या सूचनेवरून प्रथमच छापा टाकून दगडखाणी बंद करण्यात आल्या. शासनाचा बुडविलेला महसूल द्या अन्यथा कारवाईला सामोरे जा असा सज्जड दम त्यांनी खाणमालकांना भरला. विशेष म्हणजे पनवेल आणि उरणचे सर्व शेठ राजकीय पुढाऱ्यांचा थेट संबंध या दगडखाणीशी असूनही जिल्हाधिकारी उगले यांनी त्याची महसूल गोळा मोहीम व्यवस्थित पार पाडली. अशीच धडाडी उगले यांनी उलवा नोडलगतच्या वहाळ ग्रामपंचायतीमधील महिलांनी सादर केलेल्या दारूबंदीच्या ठरावात घेतली. ग्रामपंचायतीने ठराव घेऊन गावातील दारूबंदी होत नाही. यासाठी संबंधित दारू दुकान हटविण्यासाठी खुले जनमत घ्यावे लागते. त्यानंतर ही दारूबंदी सुरू होते. आठ महिन्यांपासून वहाळ ग्रामपंचायतीमधील महिलांसह राजकीय पुढाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकारी उगले यांच्यासमोर मांडण्यात आला. उलवा नोडसारख्या नवीन वसाहतीसमोर गावातील या महिलांनी दारूबंदीचा प्रस्ताव मांडल्यामुळे प्रथम या महिलांच्या भावना समजावून घेत उगले यांनी याबाबत पोलीस बंदोबस्तात जनमत घेण्याचे आदेश तहसीलदार दीपक आकडे यांना दिले. त्यानंतर सोमवारी याबाबत गावातील ७० टक्क्यांहून अधिक महिलांनी मतदान करून उभ्या बाटलीला आडवी केली. महिलांच्या या दारूविरोधी लढय़ाचे मोठे श्रेय त्या जिल्हाधिकारी उगले यांनाही देत आहेत.
उगले म्हणाल्या, महिलांनी दारूबंदीसाठी कौल दिल्यास गावातून दारूचे दुकान हद्दपार होईल; पण त्यामुळे शासनाचा महसूल बुडेल. महिलांनी प्रस्तावात दारूमुळे कुटुंबाचे, संस्कृतीचे व परंपरेचे नुकसान होत असल्याचे म्हटले आहे. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागतात हे मलाही मान्य आहे. मात्र महसुलाचा विचारही करणे माझे कर्तव्यच आहे.

वहाळ ग्रामपंचायतीमधील महिलांनी दारुबंदीसाठी भरघोस मतदान केले हे सुद्धा लक्षणीय आहे. तहसीलदार दीपक आकडे यांनी ही निवडणूक शांततेत व कायदेशीर पार पडण्यासाठी चांगली भूमिका घेतली. महिलांचे असे सामाजिक प्रश्न सोडविणे मला आवडेल, मुळात हे माझे कामच आहे. दगडखाणींसह बेकायदा वाळू उपसावर महसूल विभागाने सातत्याने कारवाई सुरू ठेवली आहे.
– शीतल उगले-तेली, रायगड जिल्हाधिकारी