डॉ. वसंत गोवारीकर हे एक नामवंत शास्त्रज्ञ. पावसाळ्याचा अचूक अंदाज वर्तवणारे त्यांचे ‘गोवारीकर मॉडेल’ प्रसिद्ध आहे. १९९३ ते ९५ या काळात ‘टायफॅक’ (टेक्नॉलॉजी  इन्फम्रेशन फोरकास्टिंग अ‍ॅण्ड असेसमेंट कौन्सिल- भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याची स्वायत्त संस्था) संस्थेच्या ‘रिलूक अ‍ॅट  फर्टलिायजर्स’ या महत्त्वाच्या प्रकल्पात डॉ. गोवारीकरांचा सहभाग होता. तो प्रकल्प अहवाल डॉ. गोवारीकरांनी सादर केल्यावर, अहवालाच्या अनुषंगाने पुढे आलेल्या सूचनांपकी खतांसंदर्भात परिपूर्ण  माहिती देणारा कोश तयार करण्यात यावा, या सूचनेनुसार या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी डॉ. गोवारीकरांकडे सोपवण्यात आली. हा खत-कोश म्हणजे केवळ हस्तपुस्तिका नसून खतांविषयी सखोल माहिती देताना जमिनीचा कस, वनस्पतींची वाढ आणि वाढीसाठी आवश्यक पोषणद्रव्ये, त्यांचे व्यवस्थापन, खतांचे स्रोत व प्रकार, खतांचे रसायनशास्त्र (उदा. त्यातील मूलद्रव्यांचे प्रमाण वगरे), वनस्पतींच्या पेशींची रचना व काय्रे, मातीचे तसेच पाण्याचे प्रकार, सूक्ष्म जीवांचे कार्य यांसह शेतीशी संबंधित संज्ञांच्या माहितीचासुद्धा समावेश आहे. ही माहिती सादर करताना आवश्यक तेथे आकृत्या, छायाचित्रे, समीकरणे, आलेख यांची प्रभावीपणे जोडसुद्धा देण्यात आली आहे. डॉ. गोवारीकरांसह या प्रकल्पात व्ही. एन. कृष्णमूर्ती, सुधा गोवारीकर, माणिक धानोरकर आणि कल्याणी परांजपे यांनी सहकार्य केले.
हा कोश शेतकरी, कृषी क्षेत्रातील विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, अभ्यासक तसेच उद्योजकांना उपयुक्त ठरणारा आहे. सुरुवातीला, युरोपातील आघाडीचे प्रकाशक िस्प्रगर यांचा या कोशाची जगभर विक्री करण्याचा मानस होता खरा, पण प्रत्यक्षात हा कोश पाहून अमेरिकेतील अव्वल क्रमांकाचे प्रकाशक जॉन वायली यांनी त्यात रस दाखवून हा कोश अमेरिका, कॅनडा आणि  युरोपात छापून विकण्याची परवानगी मागितली. खतांविषयी माहितीने परिपूर्ण असणारा हा एकमेव माहितीकोश असल्याचे आंतरराष्ट्रीय कृषितज्ज्ञांचे मत असून युरोप, अमेरिकेतल्या नामवंत प्रकाशकांनी त्याला दुजोरा दिला आहे. शिवाय त्याची निर्मिती डॉ. गोवारीकर आणि त्यांच्या चमूने भारतात केली, याचे महत्त्व नक्कीच आहे. या कोशातील माहिती भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून देशभर पसरलेल्या कृषी महाविद्यालये आणि शेतकी संस्थांमार्फत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यास, अपेक्षित परिणाम निश्चितच साधता येईल.
वॉर अँड पीस  रसायन प्रयोग: चिरतारुण्य व उत्तम आरोग्याकरिता  भाग-४
आयुर्वेदीय रसायन चिकित्सेचे वैशिष्टय़ हे की असे रोग पुन्हा होऊ नयेत म्हणून रसायन प्रयोग रोगलक्षणांनुसार सुचविले जातात. रोगलक्षणांचा अंमल असताना औषधांची संख्या खूप, घेण्याचे काळ वेगळे, प्रकार वेगळे असतात. पण रसायन प्रयोग म्हणून जेव्हा व्याधिनुरूप औषधे सुचविली जातात, त्या वेळेस वैद्य लोकांना एका गोष्टीचे भान ठेवावे लागते. पूर्वी देत असलेल्या औषधांची संख्या कमी करून शक्यतो एकच औषध योजणे रुग्णाच्या दृष्टीने हितकारी असते. विविध व्याधींकरिता औषधे निवडताना दोन प्रकारे विचार करावा लागतो. १) ज्या व्याधींकरिता रसायन प्रयोगाची निवड केली जाते. तो शरीराच्या कोणत्या स्थानात आहे याचा विचार आयुर्वेदीय चिकित्सक नक्कीच करतात. २) चिरकाली व्याधींमध्ये संबंधित अवयवाला पुरेसे बल देण्याकरिताही बल्य, पौष्टिक, रक्तवर्धक, मांसमेदवर्धक औषधे निवडावी लागतात. अरुची व अग्निमांद्य या दोन विकारांत रसायन प्रयोग म्हणून पिंपळीचे महत्त्व असाधारण आहे. अरुचीकरिता आवळा, चित्रक, पिंपळी, सैंधव व हिरडाचूर्णयुक्त आमलक्यादिचूर्ण जेवताना पहिल्या घासाबरोबर घ्यावे. अग्निमांद्य म्हणजे अजिबात भूक नसणे याकरिता त्रिकूटचूर्ण मधाबरोबर किंवा पिंपळीसिद्ध दुधाची योजना करावी. कोणा रडय़ा माणसाला ‘जेएडी’ म्हणजे जाड व्हायचे असते. मग त्याचे ‘एलएडी’ लाड केले तरच चिरकालीन फायदा होतो. कृश व्यक्तींकरिता वैद्यांच्या औषधी कपाटात च्यवनप्राश, धात्रीरसायन, अश्वगंधापाक, शतावरीकल्प, आस्कंदचूर्ण, शतावरीघृत, अश्वगंधाघृत, कंदर्परसायन अशी विविध औषधे असतात. या औषधांच्या पलीकडे जाऊन तुम्हीआम्ही अक्रोड, काजू, खारीक, खोबरे, खजूर, जर्दाळू, पिस्ता, बदाम, बेदाणे, शेंगादाणे, सुके अंजीर यांचे छोटे छोटे तुकडे करून, सुकामेव्याच्या बाटल्या आपल्या लहानग्यांना दिल्या तर जगातले इतर कोणतेच टॉनिक द्यावे लागत नाही. ज्यांना सोपी सुटसुटीत एक वेळा घ्यावयाची औषधे हवी आहेत त्यांनी अश्वगंधारिष्ट, चंद्रप्रभावटी, कुष्मांडपाक, बदामकल्प, वानरीवटी यांच्यातील एकाची निवड करावी.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
जे देखे रवी..      डॉकिन्स आणि डार्विन
डॉकिन्सचे म्हणणे असे की, माणूस उत्क्रांतीत हळूहळू जन्मलेले जनावर आहे, असे जर मान्य केले तर मग सहा दिवसांत देवाने हे जग जन्माला घातले आणि सातव्या दिवशी त्याने विश्रांती घेतली हे जुन्या करारातले (Old Testament) गृहीतक बुडते आणि मग मध्यपूर्वेतल्या धर्माचा पायाच मुळी ढासळतो.
    बौद्धधर्म आणि कन्फुशियसची विचारसरणी यांना तो धर्म मानायला तयार नाही ते पंथ जगण्याची पद्धत या सदरात मोडतात. जैनांचा उल्लेख मला आढळला नाही. उपनिषदांचाही उल्लेख नाही. उत्क्रांतीचे रहस्य डार्विनने उलगडले. सूक्ष्म जिवाणूंपासून सुरुवात होत साध्या रचनांमधली गुंतागुंत वाढत माणूस झाला, असे ते विज्ञान आहे. सूक्ष्म जिवांमध्ये जनुके असतात. जनुके ऊर्जेचे शिक्के असतात. ऊर्जेचे असल्यामुळे बाहेरच्या आणि अंतर्गत घडामोडींमुळे ते शिक्के बदलतात म्हणून निराळे जीव जन्मतात हे जीव अशक्त असतील तर निसर्गात टिकत नाहीत जे सशक्त असतात ते टिकतात. त्यांच्यात बदल होत होत आणखी गुंतागुंतीची रचना असलेले जीव निर्माण होतात. मक्याच्या शेतात त्याची झाडे किंवा कणसे एकाच उंचीची किंवा लांबीची नसतात. काही झाडे बुट्टी असतात त्यांच्या कणसांचे मक्याचे दाणे पेरले तरी पूर्वीसारखीच उंच बुट्टी अशी संख्या दिसते. सतत बुट्टय़ा झाडांची कणसे वापरली तर मग बुट्टय़ा झाडांची पैदास पदरात पडू शकते यात माणूसच कार्यवाही करतो. देव नाही असे त्यांचे म्हणणे. पक्ष्यांच्या बाबतीत जनुकांमधल्या फरकाने मोठय़ा पंखांचे पक्षी निर्माण होतात. हे पक्षी उंच उडून उंच डोंगरात राहू शकतात. तिथे त्यांच्या खाण्यात वाटा घेणारे पक्षी कमी असतात म्हणून मग ते तिथेच राहतात. जनुकांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे पंख बदलतात. उंच डोंगरामुळे किंवा देवामुळे नव्हे. या अब्जावधी वर्षांत घडणाऱ्या अपघाती बदलांमधून उंचावरून दुर्बिणीसारखे बघू शकणारे गरुड निर्माण होऊ शकतात. सुंदर अतिशय सूक्ष्म विणीची दोन पंखांची जोडी घेऊन चतुर नावाचा कीटक इकडून तिकडे बागडतो. भुंग्याच्या पायाला लागणारे पुकेसर स्त्रीकेसर इकडे-तिकडे पसरतात आणि नवी त्याच प्रकारची झाडे तयार होतात. वणव्याचे भडके अनेक वर्षे चालू राहिले किंवा मोठय़ा ज्वाळा ओकणारे डोंगर (ज्वालामुखी) जर अनेक वर्षे प्रचंड भूभागावर बेचिराखी निर्माण करणार असतील तर मग तिथले जीव निसर्गासमोर टेकीला येतात आणि मरतात यात देवाच्या न्याय-अन्याय नसतो. उत्क्रांतीत खंड पडतो एवढेच. पृथ्वीच्या पोटात काय चालले याचे एक शास्त्र आहे. अंतराळात काय चालत आले आहे याचेही शास्त्र आहे, तसेच वनस्पतीच्या संकराचेही शास्त्र आहे. त्याचे सगळ्यांचेच डार्विनच्या उत्क्रांतीशी नाते आहे त्याबद्दल उद्या.
रविन मायदेव थत्ते
आजचे महाराष्ट्रसारस्वत:  १४ ऑक्टोबर
१९३६> कादंबरीकार, विनोदी लेखक सुभाष भेंडे यांचा जन्म. साहित्य संमेलनाचा खर्च भागविण्यासाठी महाकोष उभारण्याची कल्पना त्यांनी मांडली. डिसेंबर २०१० मध्ये त्यांचे निधन झाले.
१९४७ > ‘साहित्यसम्राट’ न. चिं. केळकर यांचे निधन. ‘तोतयाचे बंड’सह १० नाटके, आठ कादंबऱ्या, दोन पद्यसंग्रह, ‘इंग्रज व मराठे’ हे इतिहासकथन, लोकमान्य टिळकांचे त्रिखंडात्मक चरित्र, ‘माझी जीवनयात्रा’ (आत्मचरित्र) आणि स्फुटलेखन मिळून १५ हजार पानी, २४ खंडांचे त्यांचे समग्र साहित्य आहे.
१९५३> कुटुंबनियोजनाचे आद्य महाराष्ट्रीय प्रसारक व या कार्यासाठी ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक चालविणारे रघुनाथ धोंडो कर्वे यांचे निधन. त्यांच्या अप्रकाशित लेखांचे आठ खंड अलीकडेच प्रकाशित झाले.  
१९९० > प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे सात खंड तसेच धर्मप्रतिष्ठा, चिपळूणकर दर्शन, विदर्भाचे मानकरी आदी पुस्तकांचे कर्ते डॉ. अच्युत नारायण देशपांडे यांचे निधन.
२००५>  बुद्धिप्रामाण्यवादी, नवमानवतावादी विचारवंत आणि पत्रकार-संपादक द्वारकादास भगवंत कर्णिक यांचे निधन. मानवेन्द्रनाथ रॉय यांच्या अनेक पुस्तकांचे अनुवाद त्यांनी केले. ‘गांधीवादाचे समर्थन’, ‘संपादकाचे जीवनस्वप्न’, ‘वृत्तसाधना’ ही त्यांची काही पुस्तके.
संजय वझरेकर