रोमन सम्राट निरोच्या मृत्यूनंतर सन ६८ ते ९६ या २८ वर्षांमध्ये एकूण सहा सम्राट झाले. गॅल्वा, अ‍ॅथो, व्हिटेलियन्स, व्हेस्पासियन, टायटस आणि अ‍ॅनिशियन असे दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकात रोमला काही कर्तृत्ववान सम्राट मिळाले. त्यामध्ये हैड्रियन (इ.स. ११७ ते १३८) याचा राज्यकाळ उठून दिसतो. साधेपणाने राहणारा हा सम्राट सुसंस्कृत, कवी, चित्रकार, संगीतज्ञ होता. युद्धाच्या वेळी सनिकांच्या रचनेची फॅलॅक्सची पद्धत राजा फिलिफने सुरू केली होती. त्यात हैड्रियनने सुधारणा करून रोमन फॅलॅक्स सुरू केली. मालकाचा खून झाल्यास त्याच्याकडचे सर्व गुलाम मारून टाकण्याची पूर्वीची पद्धत हैड्रियनने बंद केली. युद्धकुशल हैड्रियनला गणितशास्त्राचेही उत्तम ज्ञान होते. रोमन साम्राज्यात कधी सिनेटचे सम्राटावर वर्चस्व असे, तर कधी सम्राट सिनेटला आपल्या हातचे बाहुले बनवीत असे. कमोडस हा सम्राट तर काही विरोध झाला की सिनेटर्सना सरळ ठार मारीत असे. एक धनवान सिनेटर ज्युलिअ‍ॅनक्सने तर सम्राटपदाचाच लिलाव करण्याची अभिनव योजना तयार केली आणि स्वत:च्या संपत्तीच्या जोरावर तो रोमचा सम्राट बनला. इ.स. २३५ ते २८५ या काळात रोमन साम्राज्यावर जर्मन गॉथ टोळ्यांचे आक्रमण, पíशयन आक्रमण, यादवी युद्धे, प्लेग आणि सेनानींचे आपसात सम्राटपदासाठी लढणे यामुळे रोमन साम्राज्यच नष्ट होतेय की काय, अशी भीती निर्माण झाली. सम्राट डायोक्लेशियन (इ.स. २८५ ते ३०५) हा शूर योद्धा आणि उत्तम प्रशासक होता. रोमन साम्राज्याचा प्रचंड विस्तार झाल्यामुळे त्याने राज्याचे दोन भाग केले. डायोक्लेशियनने त्याचा विश्वासू मित्र मॅक्झिमियन याला पश्चिमेकडचे म्हणजे मूळचे रोमन राज्य देऊन त्याला ‘ऑगस्टस हक्र्युलस’ ही उपाधी दिली. डायोक्लेशियनने स्वत:कडे पूर्वेचे साम्राज्य घेऊन स्वत:ला ‘ऑगस्टस ज्युपिटर’ ही उपाधी लावली.

–  सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

फणस

मे महिना आला की बाजारात ‘जॅकफ्रुट’ म्हणजेच फणस व फणसाचे गरे दिसतात. काही ठिकाणी फणसाची पानेही दिसतात. या पानावर इडली शिजविली की तिला फणसाचा छान वास येतो. फणस हा एक सदाहरित वृक्ष आहे. उष्ण आणि दमट हवामान या वृक्षाच्या वाढीला पोषक असते. समुद्रकिनारपट्टीच्या प्रदेशात या वृक्षाची लागवड असते परंतु इतर ठिकाणी फणसाचे वृक्ष आढळतात. याची उंची २० मीटपर्यंत सहज वाढते. याचे खोड गडद, लाल, तपकिरी दाट, तजेलदार दिसते. याची पाने एकांतरीत, लंबगोलाकार, १० ते २० सेंमी लांब, हिरवी, तजेलदार दिसतात. पाठची बाजू खरखरीत आणि फिकट दिसते.

नरपुष्पे फांद्यांच्या टोकाशी, बाजूला व फांद्यावर असतात. स्त्रीपुष्पे लहान असतात. यांचे गोल झुबके मुख्य खोडावर, मोठय़ा फांद्यावर येतात. फलित झाली की त्यातून फळे बाहेर येतात. ही फळे हळूहळू मोठी होतात. साधारण ३०-९० सेंमी लांब २०-४० सेंमी रुंद, आकाराची लंबगोलाकार असतात. खोडाशी आणि फांद्यांवरतीही लटकत असतात. या फळावर हिरवे काटे असतात. फळ परिपक्व झाले की काटे लाल-पिवळे रुंद होतात. फणस पिकला की त्याचा वास सर्वत्र पसरतो. यामध्ये देठापासून आतमध्ये पाव असते त्याला गोड रसदार गरे लगडलेले असतात. या प्रत्येक गरामध्ये लांबट जाड बी असते. त्याला आठळी असे म्हणतात. गरे सर्वत्र आवडीने खातात. कच्च्या फणसाची व कच्चे गरे वाळवून. नंतरसुद्धा त्याची भाजी करतात. आठळ्या भाजून, उकडून त्याचे पीठ करून वापरतात. फणसामध्ये दोन जाती असतात. एक ‘कापा’, याचा गरा सुका असतो. हाताला चिकटत नाही. दुसरा ‘बरका’ याचा गरा रसदार असतो. काही फणस पिकत नाहीत फक्त भाजी करतात. या झाडाचे लाकूड मजबूत असते. इमारत बांधणीसाठी व फíनचर बनविण्यासाठी वापरले जाते. हा शक्तिवर्धक आहे. रक्तपित्त व अतिसार यावर इलाज करतात. याची लागवड भारतात सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर केली जाते. पश्चिम घाट, आसाम, ब्रह्मदेश, (म्यानमार) येथील जंगलात त्याची वाढ उत्तम होते. या झाडाला वनस्पतिशास्त्रात ‘आटरेकार्पस हिटिरोफायलास’ असे आहे. हा ‘मोरेसी’ म्हणजेच ‘वट’ कुलातील सदाबहार वृक्ष आहे.

अनिता कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org