काचेचे तंतू बनवण्याचे तंत्र फार पूर्वीपासून माणसाला ज्ञात आहे. काचनिर्मितीसाठी कच्चा माल म्हणून सिलिका, वाळू, गारगोटय़ा, चुनखडी यांचा वापर केला जातो. तंतू बनवताना त्यात जरुरीप्रमाणे अ‍ॅल्युमिनियम हायड्रॉक्साइड, सोडियम काबरेनेट, बोरॅक्स इत्यादी पदार्थ मिसळावे लागतात. शिवाय तंतूनिर्मितीची प्रक्रिया त्याच्या उपयोगाप्रमाणे ठरवावी लागते. काचेचे तंतू : अखंड तंतू, आखूड तंतू आणि काच लोकर या तीन स्वरूपात मुख्यत्वे करून उपलब्ध असतात.  
वैशिष्टय़पूर्ण गुणधर्म हे काचतंतूचे सामथ्र्य आहे. हा तंतू पेट घेत नाही आणि पाणीही शोषून घेत नाही. हा तंतू बऱ्याचशा रसायनांना विरोध करतोच, शिवाय हा विद्युतरोधकही आहे. हा तंतू कापसापेक्षा दुप्पट तर लोकरीपेक्षा पाचपट ताकदवान आहे. मात्र ठिसूळपणा आणि कमी लवचीकता हे मोठे दोषही या तंतूत आहेत. नेहमीच्या कपडय़ांसाठी हा तंतू अयोग्य आहे. मात्र काही विशिष्ट क्षेत्रात याला मानाचे स्थान आहे.
या तंतूचा वापर प्रकाशीय तंतू (ऑप्टिकल फायबर) म्हणून केला जातो. यामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आलेले आहेत. अशा तंतूंच्या साहाय्याने हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी संकेत सहजतेने पोहोचवता येतो. शिवाय यातून एकाच वेळी मोठय़ा प्रमाणात संदेशवहन करता येते.   प्लॅस्टिक बनवताना त्यात काचतंतू मिसळले असता प्लॅस्टिकची मजबुती वाढते. अशा प्लॅस्टिकचा उपयोग मोटारगाडय़ांची व जहाजांची बाह्य़ांगे, तावदाने, प्राणरक्षक नौका, विमानांचे काही भाग यामध्ये केला जातो. रसायने, क्ष-किरण, बीटा प्रारण यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी वापरण्यात येणारी वस्त्रे काचतंतूपासून बनवलेली असतात. या तंतूच्या विद्युतरोधक आणि उष्णतारोधक गुणधर्मामुळे विजेच्या तारांची वेष्टने, बॅटरीमधील विभाजक, पाणी तापवण्याची साधने यामध्ये काचतंतूंचा वापर केला जातो. हवा आणि रसायने गाळण्यासाठी वापरली जाणारी गाळण वस्त्रे या तंतूंपासून बनवली जातात. घरे, सभागृहे, विमाने, इत्यादी ठिकाणी ध्वनिशोषक म्हणूनही काचवस्त्रांचा वापर केला जातो.
थोडक्यात, सामान्यांच्या कल्पनेबाहेर असलेला हा असामान्य कृत्रिम खनिज तंतू आहे.
– प्रा. सुरेश द. महाजन, इचलकरंजी, मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – संरक्षित रीवा संस्थान
रीवा राज्यकर्त्यांनी कंपनी सरकारबरोबर संरक्षण करार केल्यावर तेथील महसुली उत्पन्न वाढले, सामाजिक सुधारणा आणि प्रशासकीय शिस्त वाढली. महाराजा विश्वनाथ सिंह याने रीवा संस्थानात सतीची चाल आणि स्त्रीभ्रूणहत्या कायद्याने बंद केली. त्यापुढचे रीवा शासक उच्चशिक्षित आणि साहित्य, कला आणि शिक्षणाचे पुरस्कत्रे होते. महाराजा रघुराज सिंह याने मुत्सद्देगिरीने ब्रिटिशांकडून रीवा संस्थानासाठी अनेक सवलती मंजूर करून घेतल्या. १८५७च्या बंडात तो ब्रिटिशांशी निष्ठावंत राहिल्याने त्यांनी त्याला अनेक गावे इनाम म्हणून दिली.
त्याचा मुलगा रमण सिंह हा विद्वान आणि प्रतिभावंत असा आदर्श राजा म्हणून लोकप्रिय झाला. त्याने उभे केलेले ‘सोळंकी स्क्वाड्रन’ हे सनिकी वायुदल प्रसिद्ध होते. या वायुदलामुळे पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांना मोठी मदत झाली. त्याचा पुढचा शासक हा उत्तम प्रशासक होता, परंतु त्याने एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या खुनाचा कट केल्यामुळे ब्रिटिशांनी त्याला पदच्युत करून भोपाळ राज्यात हद्दपार केले. हद्दपार झालेल्या गुलाब सिंहचा पुत्र मरतड सिंहने रीवा संस्थान स्वतंत्र भारतात विलीन केले. मरतडने आपली सर्व मालमत्ता बनारस हिंदू विद्यापीठाला देणगी म्हणून देऊन टाकली. महाराजा पुष्पराजच्या प्रयत्नाने बांधवगड नॅशनल पार्क हे वाघांसाठी अभयारण्य म्हणून घोषित झाले. १९६७-६८ साली पुष्पराजच्याच प्रयत्नाने बांधवगडात पांढऱ्या वाघांची शिकार करण्यावर बंदी करण्यात आली. पुढील शासकांपकी मरतडसिंग जुदेब, रीवा लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा निर्वाचित होऊन विंध्य प्रदेश प्रांताचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले गेले. महाराजा पुष्पराजसिंह देव हे मध्य प्रदेश विधानसभेवर तीन वेळा निर्वाचित होऊन मध्य प्रदेश सरकारचे शिक्षण आणि नगरविकासमंत्रिपदी नियुक्त केले गेले. सध्याचे युवराज दिव्यराज सिंह हे रीवा जिल्ह्य़ातील सिरमूर मतदारसंघातून भाजपचे आमदार आणि पक्षाचे सक्रिय कार्यकत्रे आहेत. राजकुमारी मोहेनाकुमारी या प्रसिद्ध कथ्थक नर्तिका आणि रचनाकार आहेत.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com