26 March 2017

News Flash

मनमोराचा पिसारा.. डार्विनच्या मनाचं कोडं

मनमोराचा पिसारा.. डार्विनच्या मनाचं कोडं चार्ल्स डार्विनची ओळख शाळेतल्या विज्ञानाच्या पाठय़पुस्तकात झाली. मग मनोविज्ञानाच्या महापुस्तकातून

मुंबई | Updated: November 20, 2012 11:01 AM

मनमोराचा पिसारा.. डार्विनच्या मनाचं कोडं
चार्ल्स डार्विनची ओळख शाळेतल्या विज्ञानाच्या पाठय़पुस्तकात झाली. मग मनोविज्ञानाच्या महापुस्तकातून त्याच्या शोधनिबंधाबद्दल चर्चा वाचली. डार्विनविषयी गूढ कुतूहल मनात रेंगाळत राहिलं. ‘जिगसॉ’ कोडय़ाचे तुकडे जमा करून हळूहळू चित्राला आकार येतो तसं झालं.
विशेष म्हणजे डार्विनला काही काळ पछाडलेल्या आजाराचं स्वरूप किंवा मूळ मानसिक तर नव्हतं ना? असा प्रश्न सोडवावासा वाटला. अशा थोर संशोधक वैज्ञानिकाच्या चरित्राचा अभ्यास केला की, मानसशास्त्राविषयी विलक्षण ओढ वाटते. आपण कॉन्शस मनाच्या पातळीवर घेतलेले निर्णय कितपत जाणूनबुजून घेतो की, आपले अत्यंत महत्त्वाचे निर्णय तर्कावर घासून न घेता केवळ मन:स्फूर्तीच्या जोरावर घेतो? असे अनेक प्रश्न डार्विनने उपस्थित केले. उदा. ‘ओरिजिन ऑफ स्पिशीज्’ हे या पुस्तकाचे हस्तलिखित डार्विनने तब्बल १५ वर्षे प्रकाशित न करता कडीकुलुपात बंद ठेवले. ज्या पुस्तकाने अवघ्या जीवनाची गणितं सोडविली, प्राणी-वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासाला संपूर्ण कलाटणी दिली. धर्मशास्त्रातल्या वचनांना आवाहन केलं. वैज्ञानिक संशोधनाला नवी दिशा, वेग आणि अर्थ दिला. प्रचंड उलथापालथ करणारा सिद्धांत मांडणारे पुस्तक डार्विनने लगेच का प्रसिद्ध केलं नाही? त्याच्या असंज्ञ मनानं त्याला ‘गप्प बस उगीच शानपट्टी करू नकोस!’ असे संदेश देऊन अळीमिळी गुपचळी करायला लावली का? १८३१-३५ पर्यंत बाविशीतल्या चक्रम कॅप्टन फिट्झरॉयबरोबर तो समुद्र सफरीला गेला! का तर म्हणे फिट्झरॉयला जेवताना गप्पा मारायला कोणी तरी दोस्त हवा होता! मग चार्ल्स का? तर म्हणे डार्विनचं नाक त्याला फार आवडलं? मुळात अशा कंपॅनिअनची गरज का पडली? कारण या जहाजावरच्या आधीच्या कप्तानाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. (पुढे फिट्झरॉयनेही तेच केलं!) डार्विनशी तो मनातलं हितगुज वगैरे फारसं बोलला नाही. कारण समुद्रसफर संपल्यावर फिट्झरॉयने आपल्या प्रेयसीशी लग्न केलं, त्याबद्दल डार्विनला तो चकार शब्द बोलला नव्हता. बोटीवरच्या ट्रंका आणि खोकी उतरवून त्यांचं वर्गीकरण करून डार्विनला त्याच्या नोंदवह्या मिळायला दोन र्वष लागली. मग १८४२ साली डार्विननं दोन र्वष खपून आपले निबंध लिहिले आणि त्यावर तो बसून राहिला. पुढच्या १५ वर्षांत त्यानं लग्न करून दहा मुलं पैदा केली आणि जहाजावर जमा होणाऱ्या शेवाळ, प्रवाळ, कॅल्शियम खडीवर अभ्यास करण्यात गुंग झाला. या प्रेरणा कुठून आल्या? मग त्याला विचित्र आजार जडले. चक्कर येणे, अर्धशिशी, प्रचंड थकवा, डोळ्यासमोर विचित्र ठिपके, धाप लागणे. यावर उपाय तितकेच अनाकलनीय. थंड पाण्यात बुडून राहणे. डोक्याला सूक्ष्म विजेचे धक्के, डार्विन कमालीचा एकटा एकटा राहू लागला. कानकोंडा झाला, घरकोंबडा झाला. ओरिजिन ऑफ स्पीशीज प्रसिद्ध करायला विसरला? घाबरला? टाळत होता? याचं उत्तर त्यांच्याच असंज्ञ मनाला ठाऊक. अचानक एका संशोधक मित्राचं पत्र आलं. त्यात डार्विननं मांडलेल्या संशोधनातला विषय होता. मग एकच घाई. पुस्तक प्रसिद्ध करण्याची इतकी की दहाव्या मुलाच्या दफनविधीनंतर त्यानं थेट त्याबद्दल पत्र लिहिली! डार्विननं जगाची कोडी सोडवली, पण त्याच्या मनाचं कोडं अजून सुटत नाहीये. मित्रा, मनाचा अभ्यास असा असतो.. विलक्षण, चक्रावणारा, चकित करणारा, हसवणारा, रडविणारा, पिसारा पुलविणारा!
डॉ. राजेंद्र बर्वे  
[email protected]

कुतूहल : काचेच्या इमारती
एके काळी उघडय़ावर राहणारा माणूस पुढे गुहेत राहू लागला आणि घराला भिंती आल्या. मग पुढे या भिंती बांबूपासून बनवलेल्या कुडाच्या, पत्र्याच्या, विटांच्या व काँक्रीटच्या अशा उक्रांत होत गेल्या. पण भिंत असणे ही गरज हवा, ऊन, पाऊस, जनावरे, पक्षी यांच्यापासून संरक्षण मिळवून देणारी आहे. मात्र संरक्षण मिळवून देत असताना त्याचा उपद्रव होणार नाही हे पाहणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. भिंतीमुळे घरात येणारा उजेड आणि हवा जर बंद झाली तर ते रोगाला दिलेले आमंत्रणच ठरते. म्हणून भिंतींना समोरासमोर खिडक्या हव्यात, त्यामुळे घरात हवा खेळती राहते. वाढत्या लोकवस्तीमुळे दोन इमारतीत पुरेसे अंतर राहत नाही, त्यामुळे अनेक घरांत पुरेसा उजेड पडत नाही व त्यांना रात्रंदिवस दिवे लावावे लागतात. घरात सकाळी पूर्वेकडचे किंवा संध्याकाळी पश्चिमेकडचे ऊन येत राहणे हे फार महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्याला आपोआप जीवनसत्त्व मिळते, शिवाय घरात कृमी-कीटक होत नाहीत.
गेल्या ५० वर्षांत तंत्रज्ञानामुळे हरघडी नवनवीन पदार्थ निर्माण होत आहेत. बांधकाम क्षेत्रातही हे घडले. बांधकामात पूर्वी विपुलतेने लाकूड वापरले जाई. पण आता लाकूड मिळत नसल्याने बांधकामात लाकडाला पर्याय शोधावा लागला. मग नाना प्रकारची फ्लॅस्टिक्स आली, काचेनेही मुसंडी मारली. काच ही पूर्वीही वापरली जात असेच पण ती दारा-खिडक्यांच्या तावदानापुरतीच. मात्र आता गेल्या १५-२० वर्षांत कार्यालयांच्या भिंतीसाठी काचा वापरण्याची एक नवीन पद्धत जगभरात सुरू झाली आहे. अशा भिंती आकर्षक दिसतात पण त्यामुळे काचांवर पडणारी सूर्याची उष्णता इमारतीत कोंडून राहून इमारतीचे हरित गृह बनते. मग इमारत थंड करण्यासाठी विजेचा वापर करून वातानुकूलन करावे लागते. एवढेच नव्हे तर काचेच्या बाहेरच्या भागावर पडलेल्या उन्हाचे परावर्तन होऊन वातावरणातील उष्णताही वाढते. शिवाय या िभती कायमच्या बंद केल्याने आपत्कालीन खिडक्यांना शिडय़ा लावून अग्निशमन दलाला लोकांना वाचवणेही दुरापास्त होते.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२  
[email protected]

इतिहासात आज दिनांक.. २१ नोव्हेंबर
१८४४  रशियन बोधकथाकार क्रिलॉव्ह इव्हान यांचे निधन.
१९६३   उत्तम विनोदकार आणि विद्वान चिंतामण विनायक जोशी यांचे निधन. चिमणराव – गुंडय़ाभाऊ ही ‘चिमणरावाचे चऱ्हाट’मधील त्यांची पात्रे अजरामर आहेत.  ते धर्मानंद कोसंबी यांचे विद्यार्थी. वयाच्या तेराव्या वर्षी हस्तलिखित काढून त्यांनी तीन वर्षे चालविले. बी.ए. (तत्त्वज्ञान) व  एम.ए. (पाली व इंग्रजी) होऊन अमरावती, रत्नागिरी, बडोदे येथे त्यांनी अध्यापन केले. पुढे बडोदा सरकारने त्यांना डायरेक्टर ऑफ अर्काइव्हज नेमले. १९४९ मध्ये ते निवृत्त होऊन पुण्याला परतले. बडोदे विद्यापीठात ते पाली शिकवत. परदेशी नियतकालिकांत संशोधनलेख मॅन्युअल ऑफ पाली, शाक्यमुनी गौतम, बुद्ध संप्रदाय व शिकवण हे ग्रंथ आणि सयाजीराव गायकवाड यांचे चरित्र लिहिले. कर्मवीर परशुराम, चित्रकार पिंपळखरे ही चरित्रे, जातककालीन गोष्टी, बालयोगी ही कादंबरी, वडाची साल पिंपळाला व त्रिसुपर्ण ही नाटके, देवनगरच्या पंचक्रोशीत हे स्थलवर्णन त्यांनी लिहिले. सत्याचे प्रयोग, लग्न पहावं करून, सरकारी पाहुणे हे त्यांचे बोलपट गाजले. उज्जन येथील मध्यभारत साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
१९७० नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे पहिले आशियाई शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. सी. व्ही. रामन यांचे निधन.  प्रकाशविषयक संशोधनासाठी रॉयल सोसायटीने त्यांचा गौरव केला, देशातील १७ विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट प्रदान केल्या. बंगळूरु येथे त्यांनी रामन रीसर्च इन्स्टिटय़ूट (आता इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स) स्थापली.
डॉ. गणेश राऊत  
[email protected]

सफर काल-पर्वाची : क्विओपात्रा आणि सिझर
इजिप्तचा राज्यकारभार क्विओपात्रा सातवी ही पाहात असताना तिकडे रोममध्ये राज्यकर्त्यांचे त्रिकुट (ट्रायंव्हिरेट) तुटले होते. ज्युलियस सिझर त्याचा राजकीय प्रतिस्पर्धी पाँपे याचा काटा कसा काढता येईल, याच्या प्रयत्नात होता. पाँपे आपल्या छोटय़ा सैन्यासह पळून जात असताना इजिप्तमधील राजधानी अलेक्झांड्रियापर्यंत ज्युलियस सिझरने त्याचा पाठलाग केला. तेथे टॉलेमीच्या माणसाकडून पाँपे मारला गेला. त्यावेळी टॉलेमी तेरावा राजे पदावर होता. परंतु प्रत्यक्ष कारभार फिलोपेटर म्हणजेच क्विओपात्रा पाहात होती. आपल्या प्रतिस्पध्र्याचा खून केल्यामुळे ज्युलियस सिझरचा क्विओपात्राशी स्नेह जडला. इ.स. पूर्व ४७ मध्ये सिझरने टॉलेमी तेरावा याच्या सैन्याचा नायनाट करून तिथे क्विओपात्राला राज्यपद मिळवून दिले. नाईल नदीवर क्विओपात्राने हा विजय ज्युलिअस सिझरसमवेत साजरा केला.
रोमन कायद्याच्या बंधनामुळे सिझर व क्विओपात्रा लग्न करू शकले नाहीत. सिझरपासून क्लिओपात्राला एक मुलगा झाला. त्याचे नाव सिझरियन ठेवले होते. क्लिओपात्रा अनेक वेळा रोमला सिझरला भेटायला येऊन गेली. पण सिझरच्या रोमबाहेरील निवासस्थानात राहात असे. इ.स. पूर्व ४४ मध्ये ज्युलिअस सिझरचा खून केला गेला. सिझरच्या इच्छेप्रमाणे त्याचा पुतण्या ऑक्टेव्हीयन हा सिझरचा वारसदार झाला. त्याला पुढे सिझर ऑगस्टस असे नाव पडले. राज्यकारभारासाठी रोमन साम्राज्यात दुसरे ट्रायमव्हीरेट तयार झाले. त्यात सिझर ऑगस्टस, मार्क अँटोनी आणि लेपिडस असे तिघे होते. त्यातील मार्क अँटोनीला आगस्टसविषयी असुया होती.
मार्क अँटनी इजिप्तमध्ये गेला असता त्याचे व क्लिओपात्राचे संधान जमले. क्लिओपात्रा आणि मार्क अँटनीने लग्न केले. क्लिओपात्राने अँथनीला आपल्या सौंदर्याने भुरळ पाडून पूर्णपणे वश करून घेतले होते.
सुनीत पोतनीस  
[email protected]

First Published on November 20, 2012 11:01 am

Web Title: navneet 10