ज्ञानपीठविजेते  कुरूप यांच्या कवितांवर प्राचीन मल्याळी महाकवी वल्लतोल यांच्या शैलीची छाप सुरुवातीच्या काळात पडलेली असे. पुढे मात्र त्यांची स्वत:ची अशी स्वतंत्र शैली निर्माण झाली. त्यांच्या सुरुवातीच्या कविता पारंपरिक शैलीत होत्या; पण नंतरच्या कविता चिंतनपर आहेत. प्रतीकांचा सुंदर व प्रभावी वापर त्यांनी आपल्या काव्यात केलेला दिसतो. त्यांनी कामात आधुनिक विज्ञान आणि प्राचीन आध्यात्मिक विचारधारा यांचा सुंदर मिलाफ घडवून आणला. नवीन शब्दभांडार, प्रतिमासृष्टी आणि प्रतीकात्मकता यांच्या साहाय्याने मल्याळम साहित्याला नवचैतन्य प्राप्त करून दिले. एवढंच नव्हे तर त्यांनी भारतगौरवाची उज्ज्वल गीते गाऊन राष्ट्रवादी भावनेत नवचैतन्य निर्माण केले. निसर्गप्रेम आणि राष्ट्रीयता हे सुरुवातीच्या काव्यरचनेचे वैशिष्टय़ होते. प्राचीन मल्याळी कवी आणि संस्कृत साहित्य यांची त्यांना पहिल्यापासूनच आवड होती. परंतु आधुनिक मल्याळी साहित्यातूनही त्यांना प्रेरणा मिळाली. उमर खय्यामच्या काव्यकल्पनांचा त्यांच्यावर किशोरावस्थेत खूप प्रभाव होता. रवींद्र साहित्याचाही त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला होता. या साहित्याचा अभ्यास करता यावा म्हणून त्यांनी बंगाली भाषाही शिकून घेतली. फ्रेंच काव्याची धाटणीही त्यांना विशेष आवडत असे. जुन्या आशयाच्या विश्लेषणाचा  आणि तंत्राचा असा एक वेगळाच मेळ त्यांच्या काव्यात दिसतो. त्यामुळे कुरूपजींचे काव्य सर्व थरातील वाचकांना आवडते. कवी कालिदास, भास, उमर खय्याम, रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्याचे त्यांनी मल्याळमध्ये अप्रतिम अनुवाद केले आहेत. ‘गीतांजली’चा मूळ बंगालीमधून  मल्याळी भाषेत १९५८ मध्ये त्यांनी अनुवाद केला. साहित्य अकादमीच्या सूचनेवरून त्यांनी  टागोरांच्या  निवडक १०१ कवितांचा अनुवाद केला आहे.  गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल त्यांना अतिशय आदर होता. ‘श्यामची आई’ आणि साने गुरुजींच्या मुलांसाठी असलेल्या साहित्याबद्दल त्यांच्या मनात अपार आदर होता.  केरळातील निसर्गाचं चित्रण त्यांच्या कवितेत प्रामुख्याने दिसते. तसेच त्यांच्या क्रांतीकविता, गूढप्रतीकात्मक कवितांमधून त्यावर पडलेली मार्क्‍सवादाची छापही स्पष्टपणे दिसते.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

 

भारतीय संख्यागणन

भारतात अनेक प्रकारच्या गणन पद्धती होत्या. त्या स्वतंत्र होत्या. वैदिक जैन, बौद्ध  अशा या पद्धतीमध्ये काही साम्य होते. विशिष्ट शब्दांच्या साहाय्याने खूप मोठमोठय़ा संख्या दर्शवल्या जात.

प्रथम दशगुणोत्तर संख्या – यात नंतरची संख्या पहिल्या संख्येपेक्षा दहापट अधिक. (यजुर्वेद संहिता १७ वा अध्याय) त्यातील अनुक्रम असा. एक, दश, सहस्र, अयुत, नियुत, प्रयुत, अर्बुद, न्यर्बुद, समुद्र, मध्य, अन्त्य आणि परार्ध. परार्ध म्हणजे १०१२  म्हणजेच दहा खर्व.

द्वितीय दशगुणोत्तर संख्या – पहिल्या संख्येच्या नंतरची संख्या, पहिल्या संख्येपेक्षा १०० पट असते. ‘ललित विस्तार’ या बौद्ध ग्रंथातील गणितज्ञ अर्जुन व बोधिसत्त्व यांच्या संवादातून शतगुणोत्तर संख्येचे वर्णन येते ते असे, शंभर कोटी = एक अयुत, शंभर अयुत = एक नियुत, शंभर नियुत = एक कंकर, शंभर कंकर = एक विवर याप्रमाणे कोटी, अयुत, नियुत, कंकर, विवर, क्षोम्य, निवाह, उत्संग, बहुल, नागबल, तितिलंब, व्यवस्थान प्रज्ञप्ति, हेतुशील, करहू, हेत्वद्रिय, समाप्तसलभ्य, गणनागति, निरवदा, मुद्राबाल, सर्वबल, विषज्ञागति, सर्वज्ञ, विभुतंगमा व  तल्लक्षणा अशा क्रमाने संख्यांना नावे आहेत. या पद्धतीने  तल्लक्षणाचे मूल्य येते १०५३.

तृतीय कोटी गुणोत्तर संख्या – कात्यायनाच्या पाली प्रकरणात सूत्र ५१-५२ मध्ये याचा उल्लेख येतो. नंतरची संख्या पहिलीच्या एक कोटीच्या पटींनी मोठी. जैन ग्रंथ अनुयोगद्वार यात याचे वर्णन आहे.

कोटी, पकोटी, कोटय़पकोटी, नहुत, त्रिनहुत, अम्खोभिनी, िबदू, अण्बुद, मिरण्बुद, अहह, अब्रब, अतत, सोगन्धिक, उत्पल, कुतुर, पुण्डरिक, पद्म, कथान, महाकथान व असंख्येयची याचा अर्थ असंख्येयची याची किंमत १०१४० (एकावर १४० शून्य) इतकी आहे.

अनेक गणिती प्रक्रिया प्राचीन काळापासून प्रचलित होत्या. त्यात १. संचालन (बेरीज) २. व्यकलन (वजाबाकी) ३. गुणन (गुणाकार) ४. भाग (भागाकार) ५. वर्ग (वर्ग करणे) ६. वर्गमूळ  ७. घनमूळ (घनमूळ काढणे) ८. घन (घन करणे) या येतात. त्रराशिक, पंचराशिक, सप्तराशिक आणि नवराशिक यांचीही ओळख त्यांना होती.

डॉ. क. कृ. क्षीरसागर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई -२२ 

office@mavipamumbai.org