सन २०१३ करिता कुतूहल सदरासाठी ‘शेती’ हा विषय निवडण्यात आला आहे, हे लक्षात आल्यावर अनेकांकडून शंका व्यक्त झाली. सुरुवात चांगली आहे; पण शेतीवर लिहिण्यासाठी तज्ज्ञ उपलब्ध होतील का, लोक वर्षभर लेख वाचतील का, लेखांना प्रतिसाद मिळेल का वगरे, असे प्रश्न उपस्थित होणं साहजिक होतं. कारण शहरी वाचकांच्या रोजच्या आयुष्याशी शेती निगडित नाही. त्यांच्यासाठी हा विषय तेवढा जिव्हाळ्याचा नाही. या सदराद्वारे शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती घडून येईल, अशी अवास्तव अपेक्षाही नव्हती. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण वर्गाच्या अभिरुचीचा सुवर्णमध्य साधून प्रत्येक लेख किमान वाचनीय होईल, या दृष्टीने प्रयत्न केला.
शेती विषयाचा मोठा आवाका लक्षात घेता त्यातील सर्वच उपविषयांवर लेख प्रसिद्ध करायचे ठरवले तर एकाही उपविषयाला योग्य न्याय देता येणार नाही हे लक्षात आले. म्हणून काही ठरावीक उपविषयांवरच लक्ष केंद्रित केले. अर्थात त्यामुळे सदर अपुरे वाटण्याचा धोका पत्करावाच लागला.
पहिल्या सहा महिन्यांत आठवडय़ातील सहा दिवस सहा उपविषय अशी लेखांची विभागणी केली. दुष्काळाने तीव्र स्वरूप धारण केल्यावर पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘पाणी’ विषयाशी संबंधित लेख प्रसिद्ध केले. पुढील सहा महिन्यांत शेतीपूरक व्यवसायांवर प्रकाश टाकणाऱ्या लेखांची मालिका प्रसिद्ध केली. नवउद्योजकांना प्रेरणा मिळण्याच्या दृष्टीने शेतमालावर प्रक्रिया करून तयार केलेले अन्नपदार्थ यांवरही लेख प्रसिद्ध केले. शेतीबाबत (आणि शेतजमिनींबाबत) राज्यात असलेले काही महत्त्वपूर्ण कायदे, शोभिवंत बॉनसाय यांवरील लेख शहरी वाचकांनाही उपयोगी ठरतील असे होते. यशस्वी प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव इतरांसाठी आशेचे किरण ठरावेत, त्यातही महिला शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर केलेली मात स्त्रियांसाठी प्रेरणादायी ठरावी, हीच अपेक्षा ठेवली.
महाराष्ट्रातील निम्म्यापेक्षा जास्त जिल्ह्यांतील शेतीतज्ज्ञांनी कुतूहलसाठी लिखाण केले. अनेकांनी लिखाणासाठी इच्छुक असल्याचे स्वत:हून कळवले. मात्र लेखांची संख्या आवश्यकतेपेक्षा जास्त झाल्याने निवडक लेखांनाच प्रसिद्धी देण्याचा निर्णय घ्यावा लागला.   
कोणतेही काम आणखी अधिक चांगले होऊ शकले असते, असे म्हणण्यास नेहमीच वाव असतो.
 त्यामुळे शेतीसदर अत्युत्कृष्ट झाले असे म्हणणे धाडसाचे ठरेल. परंतु मिळालेल्या प्रतिसादांवरून निष्कर्ष काढल्यास सदर निकृष्ट झाले नाही, एवढे मात्र निश्चित!
-प्रतिनिधी ,मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

वॉर अँड पीस – सांसर्गिक रोग : आयुर्वेदीय उपचार भाग- ६
डोळे येणे-  या साथीच्या जंतूंचे आगमन आफ्रिका, अर्बस्तान, दक्षिण अमेरिका येथून झाले, अशी किवदंता होती. डोळे आलेला एक माणूस दुसऱ्या निरोगी माणसाबरोबर पाच-दहा मिनिटे जरी संपर्कात आला, तरी निरोगीचा तो नेत्ररुग्ण क्षणात होत असे. बस स्टँड, रेल्वे, सिनेमा थिएटर, सार्वजनिक हॉल, लग्न मुंज, लग्न समारंभ येथे नित्य मोठय़ा संख्येने, पब्लिक एकमेकांच्या संपर्कात येत असते. डोळे आलेल्या एका माणसाच्या क्षणभराच्या संपर्काने हा रोग झपाटय़ाने शंभरपट, हजारपट वाढत जातो. उपाय सोपे आहेत. १) डोळे आलेल्या व्यक्तीने किमान एक दिवस स्वत:ला एकटे कोंडून घ्यावे. २) बोरीक पावडरपासून तयार केलेल्या नेत्रबिंदूंचे दोन थेंब वारंवार डोळ्यात सोडावे. प्रवाळ, कामदुधा, मौ.भस्म यांचा वापर खूप त्रास देणाऱ्या विकारात अवश्य करावा. आळणी जेवावे.
 ताप- संतापो देह मानस:। या विकारात शरीरात ताप असतोच. मनही तापते. घरातली माणसेही ताप आलेल्या माणसापासून चार हात लांब राहतात. जगभर नाना प्रकारचे ताप रोगाचे पोटभेद, मनुष्यमात्रांना डॉक्टर मंडळींना, हॉस्पिटलवाल्यांना सतत काळजीत ठेवतात. या सगळ्या संसर्गजन्य तापांची, जगाच्या प्रारंभापासून चलती आहे. तो पुन्हा पुन्हा म्हणून पुढील स्वरूपाची काळजी घ्यावी : १) तुळशीची पाने मिरपुडीबरोबर खाणे, २) पुदिना ओली हळद मनुका यांचा सुयोग्य वापर,  ३) घाम येईल असे गरम गरम पाणी पिणे, ४) मीठ, हळद, गरम पाण्याच्या गुळण्या, ५) त्रिभुवनकीर्ती, ज्वरांकुश, लक्ष्मीनारायण, लमावसंत यांचा नेमका वापर, नागरादिकषाय, वासापाक यांची मदत, ६) शक्य असल्यास एक दिवस पूर्णपणे लंघन, ७) गंडमाळा, राजयक्ष्मा, थायराइड ग्रंथीची फाजील वाढ यांवर अमरकंद व सुधाजल लाइमवॉटर चुन्याच्या निवळीचा काही काळ वापर, ८) गोवर- कांजण्यातील सांसर्गिक तापाकरिता गुलाब द्राक्षासव, परिपाठादि काढा, बाहवा, मनुका, गुलाबकळी, एरंडमूळ यांचा एकत्रित काढा, यापैकी उपलब्धतेनुसार निवड, तापावर मात करा.     (समाप्त)
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जिने देखिले रवीला
हल्ली ‘लोकसत्ता’त लिहायला लागल्यापासून आमच्याकडे पहाटे पाचच्या ऐवजी साडेतीन वाजता दिवे लागतात (!) मनन, चिंतन करावे लागते. मग सूर्यनमस्कार, इतर व्यायाम. मग न्याहारी. माझ्या लग्नाच्या पन्नास वर्षांत याच्या पन्नास प्रकारच्या न्याहाऱ्या मी सांभाळल्या आहेत. मग सकाळी सात-सव्वासात वाजता माटुंगा रोडला याला सोडावे लागते. कारण सार्वजनिक वाहतुकीचा याला मोठा सोस आहे. महात्मा गांधींना गरिबीत ठेवण्यासाठी इतरांना कष्ट झाले त्यातलाच हा प्रकार. हा पोटापाण्यासाठी जेमतेम दोन-तीन तासच काम करतो, मग याचे सार्वजनिक आयुष्य सुरू होते.
लोकसत्तामुळे आठ-दहा   e-mail  येत. त्यांना तत्पर उत्तरे दिली जात. त्यातल्या अध्र्या बायका असत. ज्ञानेश्वरी वाचून हा साधूसंत झाला आहे असा समज पसरला आहे. त्यामुळे धार्मिक वृत्तीचे लोक घरी भेटायला येतात. मला मोठे विचित्र वाटते. माझ्या माहेरी देवघर तरी होते. थत्त्यांच्याकडे देवाची बात नसते, तरी हे. वीस वर्षे शेजारच्या बागेचा लढा झाला. दहा वर्षे टिळक रुग्णालयाची साफसफाई झाली. सहा वर्षे ज्ञानेश्वरीचे इंग्रजी भाषांतर झाले. आता प्लास्टिक सर्जरीचे पुस्तक सुरू आहे. दुपारी सहा वर्तमानपत्रांचे वाचनही असते. मी आठवडय़ातून तीन दिवस दुपारी काम करते. याच्याशी बोलायचे तरी कधी? उकार, हुंकार, ओंकार, होकार एवढीच उत्तरे मिळतात. अगदी क्वचित नकार. त्यावर चर्चा करावी म्हटले तर, ‘तुला पाहिजे ते कर,’ असे उत्तर मिळते. संभाषणप्रक्रिया शून्य. उलट हा सर्वत्र भाषणे ठोकतो तेव्हा वाचाळ असतो.  ‘माझ्या आईने मला भरपूर दिले आहे,’ असे मी एकदा चुकून बोलून गेले त्याचे याने भांडवल केले आहे. अगदीच हट्ट केला तर एकदम चेकबुकच समोर ठेवतो. दागिन्यांच्या दुकानात चेकबुक कसे नेणार? लहानपणी याची आई, मावशी किंवा काकू जसा स्वयंपाक करत तसाच व्हायला हवा असा हट्ट. चायनीज, पिझा किंवा इतर तत्सम पदार्थ बघितल्यावर हा अशी तोंडे करतो की मलाच ते खाण्याचा संकोच होतो. दुकानात आला तर जन्मठेपेच्या आरोपीसारखा केविलवाणा असतो.
एक मात्र खरे की, याने मी कसे वागावे या बाबतीत कधीही एकही फतवा काढलेला नाही. माणूस  म्हणून चांगला (!) असेलही, त्याच्या व्यवसायात त्याचे नावही बऱ्यापैकी असणार; परंतु नवरा म्हणून अळङळ किंवा काठावरच पास. ‘‘मी तुला त्रास देत नाही. तू स्वत:ला त्रास करून घेतेस,’’ असे याचे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे. शहाण्याने याच्याशी पंगा घेऊ नये हेच खरे. असू दे. पन्नास वर्षांचा सहवास आणि मस्त मैत्री आहे तेव्हा ‘टेढा है लेकिन मेरा है’ हेच खरे!
– आशा रविन थत्ते  (rlthatte@gmail.com)
‘जे देखे रवी’ या सदराचा रविन थत्ते यांनी लिहिलेला समारोप सोमवार, ३० डिसेंबररोजी प्रसिद्ध झाला आहे.      (समाप्त)

आजचे महाराष्ट्रसारस्वत  – ३१ डिसेंबर
१८८८> ‘अप्रबुद्ध’ तथा विष्णू केशव पालेकर यांचा जन्म. तत्त्वचिंतक आणि विचारवंत असणाऱ्या अप्रबुद्ध यांचे हिंदू कोशचे कृष्णकारस्थान, ऐक्याचे खरे शत्रू व सनातन्यांचे भवितव्य  हे निबंधसंग्रह, तसेच मराठेशाहीचा आदिसन्त, भारतीय विवाहशास्त्र, दोन साम्यवाद, पांतजली योगसूत्रे  इ. पुस्तके त्यांची.
१९२६> ख्यातनाम इतिहास संशोधक आणि मराठी भाषा, राजकारण व प्राचीन विवाहसंस्था यांच्या संशोधनाचे कार्य करणारे विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचे निधन. मराठय़ांच्या इतिहासाचे २२ खंड त्यांनी सिद्ध केले. ज्ञानेश्वरी, महिकावतीची बखर, राधामाधविलासचम्पू आदी ग्रंथांना त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना तसेच मराठी धातुकोश, नामादिशब्दव्युत्पत्तिकोश असे त्यांचे काम त्यांच्या प्रचंड आवाक्याची साक्ष देते. त्यांचा समग्र लेखसंग्रह ३ खंडांत उपलब्ध आहे.
२००५> तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, ‘आजचा सुधारक’ या मासिक पत्रिकेचे संपादक दि. य. देशपांडे यांचे निधन. ‘अर्वाचीन- पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, प्रज्ञावाद, अनुभववाद, ‘कांट आणि विवेकवाद’ या पुस्तकांसह पाश्चात्त्य तत्त्वज्ञ जी. ई. मूरच्या निबंधांचा मराठीत अनुवाद केला.
(समाप्त) – संजय वझरेकर