आपल्या सृष्टीतल्या सर्व जीवमात्रांमध्ये कालगणनेची क्षमता असते आणि यामुळे ते दिवसाची लांबी मोजू शकतात. दिवस लहान होऊ लागला की पुढे येणाऱ्या हिवाळ्यात तगून राहण्यासाठी सुप्तावस्थेत जावयाचे ही युक्ती वनस्पतींच्या अनेक जातींप्रमाणेच अनेक वनस्पतिभक्षक कीटकही अवलंबतात.
वनस्पतिभक्षक कीटकांच्या अंडय़ापासून उडत्या प्रौढ कीटकांची अवस्था येण्यास पावसाळ्यात साधारणत ३ आठवडे लागतात, पण दिवस लहान होऊ लागला की कोशावस्थेत गेलेला कीटक पुढच्या पावसाळ्यापर्यंत कोशातून बाहेरच येत नाही.  हिवाळय़ातील या सुप्तावस्थेला कीटकशास्त्रात डायापॉज असे म्हटले जाते. तूर, पावटा, कपाशी, तीळ, ज्वारी इत्यादी अनेक पिकांच्या स्थानिक देशी वाणांना हिवाळ्याच्या सुरुवातीला फुले येतात आणि बी धरण्याची क्रिया हिवाळ्याच्या कोरडय़ा ऋतूत घडते. पूर्वी आजच्यासारखी जालीम कीटकनाशके उपलब्ध नव्हती, त्यामुळे ज्या ऋतूत कीटकांचा त्रास कमी अशा ऋतूत फलधारणा झाल्यास ते शेतकऱ्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरावयाचे. पण कृषितंत्रात रासायनिक कीटकनाशकांनी प्रवेश केल्यावर पावसाळ्याच्या सुरुवातीला बी पेरून पावसाळ्याच्या शेवटी पीक तयार होईल अशी कमी मुदतीची वाणे विकसित करण्यात आली. अशा वाणांना वनस्पतिभक्षक कीटकांचा प्रचंड उपद्रव होतो. उशिरा तयार होणाऱ्या देशी तुरीच्या किंवा वालाच्या पिकावर कीटकनाशकांची फवारणी केली जात नसे, पण आता नव्याने विकसित केलेल्या कमी मुदतीत तयार होणाऱ्या या पिकांच्या सुधारित वाणांवर जर कीटकनाशकांची फवारणी केली नाही तर त्यांच्यापासून फारच कमी उत्पन्न मिळते. परंतु कीटकनाशके हा काही कायमचा उपाय नव्हे, कारण आपण कीटकनाशके वापरू लागलो की कीटकांच्यातही कीटकनाशकांना बळी न पडण्याचा गुण विकसित होतो, आणि आपल्याला दर दोन-तीन वर्षांनी नवीन कीटकनाशक उपयोगात आणावे लागते.
 बी.टी.जनुकामुळे कपाशीत शेतकऱ्याला सध्या थोडा दिलासा मिळाला आहे, पण कीटकांमध्ये बी.टी.च्या विषाला प्रतिरोध करण्याचा गुणधर्म विकसित होणारच नाही याची आपण खात्री देऊ शकत नाही. असे झाल्यास आपल्याला कदाचित पुन्हा उशिरा तयार होणाऱ्या देशी वाणांचीच कास धरावी लागेल.

    

आजचे महाराष्ट्रसारस्वत        २८ फेब्रुवारी
१९०२ > ‘लोकसत्ता’चे पहिले संपादक त्र्यंबक विष्णु पर्वते यांचा जन्म. चिमाजी अप्पांच्या पराक्रमावर ‘मोहरा इरेला पडला’ हे नाटक , तसेच ‘लो. टिळक’,  ‘आगरकर’, ‘नेहरू’, ‘नरसिंह चिंतामण ’ ही चरित्रे त्यांनी लिहिली. त्यांची  ‘सरदारगृहाने पाहिलेले राजकारण’, ‘मी घेतलेल्या मुलाखती’ ही अन्य पुस्तके होत.
१९०९ > ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ ही कवी गोविंद यांची कविता तसेच अन्य ब्रिटिशविरोधी साहित्य प्रकाशित केल्याबद्दल स्वा. सावरकरांचे बंधू गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांना अटक. पुढे त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरून त्यांना काळय़ा पाण्यावर पाठविण्यात आले.
१९२४> ‘अणुयुगातून पलीकडे’ (एकांकिका) व हिरोशिमावर आधारित ‘सूर्यकोटी समप्रभ’ हे नाटक लिहिणारे वसंत वैकुंठ कामत यांचा जन्म. ‘निषाद’, ‘फोन नं. ३३३३३’ ही नाटकेही त्यांची अन्य नाटके.
१९२५ > कवी गोविंद (गोविंद त्र्यंबक दरेकर) यांचे नाशिक येथे निधन.
१९४४ > पत्रकार, संपादक, कादंबरीकार सुरेश जनार्दन द्वादशीवार यांचा जन्म. त्यांच्या ‘शकुनी’ या कादंबरीवर ‘लाल सलाम’ हा चित्रपट निघाला, तसेच स्फुटलेखनाची पुस्तके झाली आहेत.
संजय वझरेकर

वॉर अँड पीस                                                          जळवात- भाग २
या विकारात तळपाय किंवा तळहाताला भेगा असणे एवढेच लक्षण नसते. तळपाय खरखरीत होणे, भेगांतून रक्त येणे, भेगा खूप दुखणे, तळपाय तळहातांना खूप खाज सुटणे; हातापायांची आग होणे, त्यामुळे झोप उडणे; थंडीच्या दिवसांत तडतडणे व कडक उन्हाळ्यांत जळवात वाढणे अशी विविध लक्षणे असतात. तळहात, तळपाय यासह डोळे, त्वचा, डोके यांचे परीक्षण उष्ण स्पर्श, रूक्षता, स्निग्धतेचा अभाव यासाठी करावे. तळहात, तळपायांस नुसते तूप चोळून जेव्हा मूळ विकार बरा होत नाही तेव्हा पित्त व वायू यांची कशी चिकित्सा करावी यासाठी सार्वदेहीक परीक्षण व तारतम्य आवश्यक आहे. रोग खूप जुनाट असल्यास चिखल्या, मज्जाक्षय, पित्तविकार, वातविकार, जुनाट व्रण असाही विचार करावा.
‘सहस्त्रवीर्य विधिभिर्घृतं कर्मसहस्त्रकृत।।’ असे शास्त्रवचन आहे. तुपावर जेवढे आपण संस्कार करू त्याच्या कित्येकपट गुण देऊन ते परतफेड करते. तूप हा विषावरचा उतारा, पित्तावरचे अमोघ औषध. वाताच्या अति रूक्ष गुणांवर हे तीव्र औषध. शरीराची जडणघडण सांभाळणे, संधान करणे हे तुपासारखे, त्यातही शतधौतघृतासारखे कोणालाच जमत नाही. तांब्याचे लख्ख घासलेले ताम्हन व पंचपात्री, पातेलेभर पाणी व १००ग्रॅम चांगले तूप घ्यावे. ताम्हनात थोडे पाणी ओतून त्यात तूप टाकावे. तांब्याच्याच पंचपात्रीने तूप घोटत राहावे. ५ मिनिटांनी पाणी बदलावे. पुन्हा नवे पाणी घेऊन घोटावे असे शंभरदा केल्यानंतर मऊ मेणाहून मृदू, लोण्याहूनही मऊ असे सूक्ष्म स्रोतोगामी, गुणाने खूप थंड शतधौतघृत तयार होते. जळवात, मूळव्याध, तारुण्यपिटिका,  भाजणे, अशा अवघड पित्त व वायूविकारांवर शतधौतघृत उत्तम काम देते. उन्हाळ्यामध्ये हे मलम रात्री करावे. कारण तूप व पाणी दोन्ही पातळ स्वरूपात असल्यास घोटणे नीट जमत नाही. बदलत राहिलेल्या पाण्यात तूप फुकट जाऊ शकते. पोटात घेण्याकरिता प्रवाळ, कामदुधा, चंदनादि प्र. ३ गोळ्या दोन वेळा घ्याव्यात. सकाळी उपळसरी एक चमचा, रात्री त्रिफळा एक चमचा घ्यावे.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      देव काय म्हणत असेल?
मागच्या लेखातली मेंढी जिला नराशिवायच नव्हे तर नराच्या वीर्याशिवाय मुलगी झाली हिची गोष्ट मी लिहिली आणि मनात विचार येऊ लागला, या असल्या भानगडी बघून देव काय म्हणत असेल? माणूस अणूमध्ये डोकावतो आणि अंतराळात झेपा मारतो आणि दुर्बीण लावून माझ्या मर्यादा शोधण्याचा प्रयत्न करतो. क्षणार्धात हजारो-लाखो कोसांवर निरोप पाठवितो. हा माणूस एकाचे हृदय दुसऱ्याला बसवितो. जे डोळ्यांना दिसेना ते हजारो मैल उंच असलेल्या कॅमेरामधून छायाचित्रे काढून सिद्ध करतो. वनस्पतीमधून पेट्रोल करतो, सूर्यप्रकाशातून दिवे लावतो. चौपट पीक येईल अशी बियाणी तयार करतो. फुलपाखराच्या जाती किती इथपासून ते नेपोलियनच्या आईचे माहेरचे नाव काय असल्या प्रश्नांची उत्तरे जवळजवळ क्षणार्धात मिळविण्याची सोय माणूस करू शकला आहे.
लेखाच्या सुरुवातीला वर मूळ प्रश्न देवाला काय वाटत असेल, असा आहे. या प्रश्नाचे उत्तर मात्र माणूस देऊ शकत नाही. याचे कारण आपण देव या गोष्टीची व्याख्याच मुळी तयार केलेली नाही.
देवाची व्याख्या करता येत नाही, असे म्हणून आपण एका अर्थी पलायनच केले आहे. एक काही तरी शक्ती आहे तिला मी देव मानतो, असे उत्तर देणाऱ्या माणसाला ‘म्हणजे गुरुत्वाकर्षण ही शक्ती म्हणजे देव आहे की काय,’ असा थोडा खोचक प्रश्न विचारता येतो. मला देवाची भीती वाटते, असे म्हणणाऱ्याला, ‘ज्याची भीती वाटते त्याची भक्ती कशी करता येते,’ असा प्रश्न विचारता येतो. मी देवाकडे प्रेमापोटी जातो, असे म्हणणाऱ्याला, ‘देवाला तुमच्या प्रेमाचा निरोप पोहोचतो का, की देवाला तुम्ही पाठविलेले पत्र ‘पत्ता सापडला नाही’ असा शिक्का मारून परत येते,’ असे विचारता येते. पूर्वजांचा विश्वास होता म्हणून मीही विश्वास ठेवतो, असे म्हणणाऱ्या लोकांना, ‘तुम्ही पूर्वजांच्या किती गोष्टी अजून शिल्लक ठेवल्या आहेत आणि त्याप्रमाणे वागता का?’ हे विचारणे वावगे ठरत नाही. विश्व नावाच्या कंपनीचा हा मालक आणि चालक आहे, असे म्हणणाऱ्यांना तुम्ही या कंपनीतून राजीनामा देऊ शकता का? हा मालक तुम्हाला ‘व्हीआरएस’ देतो का? आणि जर देत असेल तर यालाच अकाली मरण म्हणायचे का? असा वाद घालता येतो. देवापुढे शरण जाण्यासाठी अहंकारविरहित व्हावे लागते असे म्हणणारे, ‘देवाला आम्ही गेल्या वर्षी केलेल्या दागिन्यांनी मढविले, असे कसे म्हणू शकतात?’
व्याख्या, वर्णन आणि त्याच्या मागचे रहस्य शोधणे याला विज्ञान म्हणतात आणि देव या जगाला जन्माला घालतो, त्याचे पोषण करतो आणि मग त्याचे मरण ओढवून आणतो असे म्हणणे म्हणजे अज्ञान असते.
.. असे मी म्हणत नाही तर इति ज्ञानेश्वर.
रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com